हरभऱ्याच्या सुधारित जातीं
“हरभऱ्याच्या सुधारित जातींची मुबलक उपलब्धता आणि हरभरा पिकास अन्नद्रव्यांची अत्यल्प गरज”
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कडधान्य प्रकल्पाने हरभरा पिकाच्या अनेक जाती शेतकरी बांधवांना उपलब्ध करून दिल्या आहेत. विविध वैशिष्ट्ये असलेल्या या जाती प्रामुख्याने मर रोगास प्रतिकारक असून उत्कृष्ट व्यवस्थापनास प्रतिसाद देऊन भरघोस उत्पादन देणाऱ्या आहेत.
देशी हरभऱ्याचे विजय, विशाल, दिग्विजय, फुले विक्रम फुले विक्रांत आणि फुले विश्वराज हे वाण मर रोग प्रतिकारक्षम असून जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य आहेत. काबुली हरभऱ्याचे विराट, पीकेव्ही -२ (काक -२) ,पीकेव्ही -४ आणि कृपा हे वाण अधिक उत्पादन देणारे आहेत. यापैकी विजय, दिग्विजय, फुले विक्रम आणि फुले विश्वराज हे देशी वाण कोरडवाहू साठी अतिशय चांगले आहेत. पाण्याची उपलब्धता असेल तर खत मात्रा व पाण्यास ते चांगले प्रतिसाद देतात. याशिवाय फुले विक्रांत हा वाण बागायती लागवडीसाठी उपयुक्त आहे. विराट हा टपोऱ्या दाण्यांचा वाण आहे. विराट हा काबुली वाण अधिक उत्पादनशील व मर रोगाला प्रतिकारक्षम आहे. फुले विक्रम हा नवीन वाण यांत्रिक पद्धतीने काढणी करण्यासाठी प्रसारित केला आहे. तेव्हा ज्या परिसरात हरभरा काढणी यंत्र उपलब्ध असेल तेथील शेतकरी बांधवांनी हा वाण आवर्जून लागवडीसाठी वापरावा.
विजय, फुले विक्रम व फुले विश्वराज हरभऱ्याचे हेक्टरी ६५ ते ७० किलो तर विशाल, दिग्विजय ,विराट किंवा काक -२ या वाणांचे हेक्टरी १०० किलो बियाणे वापरावे. पीकेव्ही -४ व कृपा वाणांकरीता प्रति हेक्टरी १२५ ते १३० किलो बियाणे वापरावे. टोकण पद्धतीने लागवड केल्यास प्रचलित लागवड पद्धतीच्या तुलनेत केवळ ६० टक्के बियाणे वापरावे लागते.
हरभऱ्याला हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाशची आवश्यकता असते.त्यासाठी १२५ किलो डीएपी व ५० किलो म्यूरेट ऑफ पोटॅश पेरणीच्यावेळी बियाणालगत पडेल या पद्धतीने दुचाडी पाभरीने पेरून द्यावे ,खत विस्कटून टाकू नये.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .