“लागवडपश्चात मका पिकाची घ्यावयाची काळजी”
मका पिकामध्ये एकरी ५० ते ५५ क्विंटल धान्योत्पादन देण्याची क्षमता आहे. या व्यतिरिक्त जनावरांसाठी चारा उत्पादन मिळते ते वेगळे. अर्थात मका पिकाचे भरघोस उत्पादन घ्यायचे असेल तर त्यासाठी योग्य प्रकारे पीक व्यवस्थापनही करणे गरजेचे असते. कुठल्याही पिकाच्या व्यवस्थापनात जमिनीची पूर्व मशागत, दर्जेदार बियाणांचा वापर, बीज प्रक्रिया, हेक्टरी बियाणे वापराचे योग्य प्रमाण, पेरणी अंतर, संतुलित खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, तण नियंत्रण, कीड व रोग नियंत्रण आदी बाबींचा समावेश होतो. मका पीक हे हरभरा पिकासारखेच व्यवस्थापनास अति संवेदनशील असे पीक आहे. याचाच अर्थ असा की या पिकांसाठी आवश्यक असलेले घटक जर व्यवस्थितपणे वापरले तर या पिकाचे त्या प्रमाणात उत्पादन मिळते.
मका पिकाला शिफारस केलेली खते एकूण तीन हप्त्यात देण्याविषयीची सविस्तर माहिती मागच्या मकाविषयक लेखात दिलेली आहेच. रब्बी हंगामात मका पिकाची पाण्याची एकूण गरज ४० – ४५ सें.मी. एवढी असते. हे पाणी मका पिकास लागवडीच्या वेळेचे एक पाण्याव्यतिरिक्त एकूण ४ पाण्याच्या पाळ्यातून द्यावे. त्यासाठी पहिले पाणी पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी रोप अवस्थेत, दुसरे पाणी पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी तुरा बाहेर पडताना, तिसरे पाणी पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी पीक फुलोऱ्यात असताना आणि चवथे पाणी पेरणीनंतर ७५ ते ८० दिवसांनी दाणे भरण्याच्या वेळी द्यावे.
मका पीक दुधाळ अवस्थेत असताना पक्षी कणसे फोडून दाणे खातात अशावेळी पक्षापासून पिकाची राखण करणे गरजेचे असते.
“तण काही धन” या ऊक्तिप्रमाणे मका पिकातील तणांचे नियंत्रण करण्यासाठी अॅट्राझिन, ५० टक्के हेक्टरी २ ते २.५ किलो,५०० लिटर पाण्यात मिसळून समप्रमाणात जमिनीवर पीक पेरणी संपताच फवारावे. तसेच पुढे तणांच्या प्रादुर्भावानुसार मका वाढीच्या सुरुवातीच्या काळात एक ते दोन खुरपण्या करून गरजेनुसार एक ते दोन कोळपण्याही कराव्यात.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .