“बदलत्या परिस्थितीत करा एकात्मिक शेती पद्धती अवलंबाचा विचार”
अलीकडच्या सातत्याने बदलत चाललेल्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेती व्यवसाय हा कमालीचा अशाश्वत होत चालला आहे, असे अनुभवी शेतकरी बांधव बोलून दाखवत आहेत. हवामानाबरोबरच शेती उत्पादनाला मिळणाऱ्या बाजारभावातही सातत्याने चढउतार होत असल्याने प्रत्येक हंगामापूर्वी नेमकं कुठलं पीक घ्यायचं याबाबत शेतकरी संभ्रमावस्थेत असतात. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा एकात्मिक शेती पद्धतीचा आवर्जून अवलंब करण्याची वेळ आली आहे. जेणेकरून शेती व्यवसायापासून आर्थिक शाश्वतता मिळणं बऱ्याच अंशी शक्य होऊ शकतं. एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प, राहुरी यांनी गेली काही वर्षे सातत्याने विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर व काही निवडक शेतकऱ्यांच्या शेतावर संशोधनपर प्रयोग राबवून वेगवेगळ्या परिस्थितीसाठी, ठराविक क्षेत्रासाठी एकात्मिक शेती पद्धतींच्या प्रारूपांची शिफारस केली आहे.
त्यानुसार २ हेक्टर बागायती क्षेत्रासाठी सुचवलेले प्रारूप पुढीलप्रमाणे आहे. हंगामी पीक क्षेत्र १.५० हेक्टर (७५ %), फळबाग ०.४० हेक्टर (२० %), पशुपालन व कुक्कुटपालनासाठी ०.०५ हेक्टर क्षेत्र (२.५० %) आणि शेततळे व मत्स्य शेतीसाठी ०.०५ हेक्टर क्षेत्र (२.५० %) वापरावे.
महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण विभागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पुढील प्रमाणे शेती पद्धती प्रारूप वापरण्याची शिफारस केलेली आहे. खरिपात चवळी व रब्बी
हंगामात ज्वारी प्रत्येकी ०.३० हेक्टर (३० %), खरीपात चाऱ्यासाठी मका व रब्बीत चाऱ्यासाठी ज्वारी प्रत्येकी ०.१० हेक्टर (१० %) आणि रब्बी हंगामात हरभरा ०.१० हेक्टर (१० %) असे एकूण ०.५० हेक्टर क्षेत्र (५० %) पीक पद्धतीसाठी वापरावे. कोरडवाहू फळझाडांची ०.४० हेक्टर (४० %) क्षेत्रावर लागवड करावी. या फळझाडांमध्ये सुरुवातीची काही वर्षे खरीप हंगामात बाजरी + तूर (२:१) या प्रमाणात आंतरपीक घ्यावे. पशुपालनासाठी ०.०५ हेक्टर (५ %) क्षेत्र तर शेततळ्यासाठी ०.०५ हेक्टर (५ %) क्षेत्राचा वापर करावा.
एकात्मिक शेती पद्धतीत पशुपालन, कुक्कुटपालन व मत्स्य शेती या जोडधंद्याकडे शेतकरी बांधवांना वळावे लागेल म्हणजे त्यांच्या हातात सतत पैसा येत राहील.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .