एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब-चिंतन
मागच्या आठवड्यात मी शेतकरी बांधवांना एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावयाचे सुचवले होते. यावर कुठल्याही शेतकरी बांधवांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही. याचा अर्थ त्यावर विचार करण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही असा नकारात्मक घ्यायला माझं मन तयार होत नाही. मात्र आजच्या काळात ही शेतीपद्धती अवलंबनं सहज शक्य नाही असं बहुतांश शेतकरी बांधवांना वाटत असावं असं दिसतंय. साधारणपणे ३०-३५ वर्षांपूर्वीची आणि आत्ताची शेती याची तुलना केली तर लक्षणीय फरक दिसून येतोय. निसर्गाची साथ, मनुष्यबळाची उपलब्धता, जमीनधारणा, बाजारभावाची शाश्वती या शेती व्यवसायाला पूरक असलेल्या बाबींमध्ये कमालीचा फरक झालाय. निसर्ग त्याहीवेळी लहरी होता, आता तर तो कमालीचा बेभरवशाचा झालाय. पडणाऱ्या पावसातली अनियमितता वाढली आहे, थंडीच्या प्रमाणात घट झाली आहे अर्थातच तापमानातही वाढ झाली आहे. एकंदरीतच शेतीचे हंगामही पुढे सरकलेत. मोठ्या प्रमाणातील शहरीकरणामुळे शेतात काम करणारे मनुष्यबळ खूपच कमी झाले आहे, जे काही उरले आहेत त्यांची कार्यक्षमता व मानसिकता हा एक अभ्यासाचा विषय बनला आहे. जमिनीची वेगवेगळ्या कारणांनी विभागणी होऊन अत्यल्प भूधारकांची संख्या पूर्वीच्या तुलनेत अनेक पटीने वाढली असून तुकड्यातुकड्यात शेती विभागली गेली आहे. तुकडे वाढले पण शेती करणाऱ्यांची संख्या मात्र कमी झाली. दरम्यान शेती तंत्रज्ञान प्रगत झाले. उत्पादन देणाऱ्या वाणांची निर्मिती झाली, उत्पादनतंत्र विकसित झाले, शेतीत यांत्रिकीकरण वाढले, त्यामुळे आधुनिकतंत्राने शेती करत शेतकरी बांधवांचे विविध पिकाचे दर एकरी उत्पादन वाढले. सर्व शेतकरी बांधव एकच प्रकारचे पीक घेत असल्याने आणि सगळ्यांचेच उत्पादन एकाचवेळी बाजारात आल्याने बाजारभाव कोसळण्याचे प्रकार वारंवार घडायला लागले. शेती उत्पादनाचे भाव कमी होण्यासाठी इतर अनेक कारणेही आहेत. एकुणच एकीकडे बाजारभावाचा अशाश्वतता आणि दुसरीकडे मजुरी व निविष्ठा यांच्या दरात वाढ अशा आर्थिक कोंडीत शेतकरी कायम अडकत आला आहे.शेतीचं व्यवस्थापन करताना ठरल्याप्रमाणे सर्वच गोष्टी पार पडतात असं होत नाही. पीक लागवडीपासून काढणीपर्यंत अनेक आव्हाने समोर उभे राहतात. खरिपात वेळेवर पाऊस पडतोच असं नाही तर तो आवर्जून एखादा महिना उशिरा पडायला लागलाय. त्यामुळे बहुतांश पिकांची पेरणीची वेळ साधता येत नाही. येनकेन प्रकारे पेरणी झाली तर पावसात महिना-दीड महिना पुन्हा खंड पडतो. एवढं कमी झालं की काय, अनेकवेळा खरिपाची पिकं काढायच्यावेळी अतिवृष्टी होऊन हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो.रब्बी हंगामाची गतही काहीशी अशीच असते. आपल्या महाराष्ट्रात जेमतेम १८ ते २० टक्के बागायत क्षेत्र आहे. या क्षेत्रात हंगामी रब्बी पिकांचं चांगल्याप्रकारे व्यवस्थापन केलं की भरघोस उत्पादनही मिळतं पण अवकाळी पाऊस, किड-रोगांचा प्रादुर्भाव यासारख्या संकटामुळे अलीकडे रब्बी हंगामही जोखमीचा झाला आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतीत घेत असलेल्या पिकांबरोबरच त्याला जोड म्हणून एखादा-दुसरा जोडधंदा केला तर आर्थिक स्थैर्यासाठी फायद्याचं ठरतं या उद्देशाने एकात्मिक शेती प्रारूप विकसित केलेले आहे. आज अनेकांच्या शेतात शेततळे आहेत, विक्रीची सोय असेल तर मत्स्यपालन करता येते, फार मोठ्या प्रमाणात नाही तर कमी संख्येत कुक्कुटपालन/शेळीपालन करणेशक्य आहे, छोटेसे शेडनेट उभारून त्यात रोपवाटिका विकसित होऊ शकते त्यासाठी पॉलिहाऊस उभारले पाहिजे असं काही नाही. घरातल्या घरात दाळमिलही सुरू करता येऊ शकते.असे छोटे छोटे जोडधंदे करण्यासाठी जास्त मनुष्यबळाची आवश्यकता नसतें असे शेतीबरोबर व्यवसाय केल्याने शेतकरी बांधवांना आर्थिक पाठबळ मिळते एवढे नक्की.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .