“पडणारे पावसाचे पाणी भु-गर्भात साठवा”
जमिनीच्या उताराला आडवी खोल नांगरट करावी. नांगरटीमुळे तयार झालेल्या सरीसदृश्य जमिनीत पावसाचे पाणी साचून राहते व जमिनीत सावकाश मुरते. उतार नसलेल्या सखल जमिनीवर छोट्या आकाराचे बांध घालावेत. या बांधामुळे पावसाचे पाणी अडवले जाते तसेच पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहून जाण्याची प्रक्रिया थांबवता येते. परिसरातील नाल्याच्या आकारमानानुसार ठिकठिकाणी बांध घालून नालाबंदिस्तीची कामे केल्यास पाण्याचा साठा होऊन जमिनीच्या आतील भू-गर्भाची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.
उताराच्या टेकडीवर उताराला आडवे समपातळीतील चर काढावेत. जमिनीच्या अंतर्गत भागातील भूमिगत पाण्याचे प्रवाह माहीत करून जमिनीखाली बंधारे बांधल्याने भूजल साठा वाढण्यास मदत होते. शेताच्या कडेला अथवा शेतात असलेल्या नाल्यामधून वाहून जाणारे पावसाचे पाणी शेतातच मुरवावे. सामूहिक किंवा व्यक्तिगत प्रयत्नाने पाझर तलाव, शेततळी, विहीर/ विंधन विहिरीत पावसाचे पाणी साचवावे.
शेतात वाहून येणारे पाणी, विहिरीजवळ आसपास साठणारे पाणी किंवा विहिरीजवळून वाहणाऱ्या आओहोळातील पाणी विहिरीत साठवण्याच्या तंत्रास विहीर पुनर्भरण असे म्हणतात. त्यासाठी विहिरीपासून काही अंतरावर ८ फूट लांब, ६ फूट रुंद व ६ फूट खोलीचा खड्डा खणावा. या खड्ड्याच्या उताराकडे विहिरीच्या दिशेस सुमारे १० फूट अंतरावर दुसरा एक ४ फूट लांब, ४ फूट रुंद व ६ फूट खोल खड्डा खणावा आणि या खड्ड्यामध्ये दगड, खडी, वाळू व कोळसा यांचे थर भरावेत. पहिला व दुसरा खड्डा एक चर खोदून एकमेकास जोडावेत. दुसऱ्या खड्ड्याच्या तळापासून १५ सें.मी. आणि उंचीवरून एक पाईप विहिरीत सोडावा. खड्ड्याच्या आतल्या बाजूला कचरा विहिरीत जाऊ नये म्हणून या पाईपास जाळी बसवावी. उतारामुळे वाहत येणारे पाणी पहिल्या खड्ड्यात येऊन साठते. पाण्याबरोबर काही प्रमाणात गाळही येतो व तो खड्ड्यात खाली बसतो. या खड्ड्यात पाणी भरल्यानंतर ते पाणी दुसऱ्या खड्डात येते. हा दुसरा खड्डा शोष खड्ड्याच्या तत्त्वानुसार तयार केला असल्याने त्यात येणारे पाणी पाईप द्वारे गाळून विहिरीत पडते. जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहणारे पाणी विहिरीत आल्याने विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते. तसेच भू-गर्भातील पाणीसाठा वाढविण्यासही मदत होते.
विंधन विहीर किंवा कुपनलिकाच्या आजूबाजूला ६मिटर व्यासाचा व १.५ मिटर खोलीचा खड्डा खोदावा. खड्ड्यातील उंची एवढा केसिंग पाईप कापून घेऊन त्यावर ३ ते ४ सें.मी. अंतरावर सर्व बाजूने ८ ते १० मि.मी. आकाराची छिद्रे पाडावीत. या छिद्रांवर नारळाची दोरी गुंडाळावी. हा पाईप खड्ड्यात उभा करून केसिंगला जोडावा. खड्ड्यात खालच्या १/३ भागात गोटे, त्यानंतरच्या १/३ भागात खडी आणि सर्वात वरच्या १/३ भागात गाळलेली वाळू भरावी. अशा प्रकारे रेतीच्या थरातून आणि नारळाची दोरी गुंडाळलेल्या गाळणीतून स्वच्छ पाणी कूपनलिकेत जाऊन पुनर्भरण होते.
छतावर पडणारे पाणी विहीर, कूपनलिका किंवा साठवण टाकीमध्ये सोडण्यापूर्वी ते गाळून घेणे गरजेचे असते. त्यासाठी छतावरून पाणी खाली आणणाऱ्या पाईपास १५ सें.मी. व्यासाची गाळणी लावावी. या गाळणी खाली फिल्टर जोडावा. फिल्टर साठी जास्त व्यासाचा पाईप वापरावा. पाईपच्या सर्वात खालील ३० सें.मी.च्या थरात बारीक वाळू, मधल्या १० सें.मी. च्या थरात चुना व वरील १० सें.मी. च्या थरात लाकडाचा कोळसा भरून फिल्टर तयार करावा. फिल्टरच्या खाली टी लावून एका बाजूस ड्रेन व्हॉल्व ठेवावा, तर दुसरी बाजू विहीर/ कुपनलिका /साठवण टाकी यांना जोडावी. ज्यावेळी पाण्याचे पुनर्भरण करावयाचे असेल त्यावेळी या ड्रेन व्हॉल्वमधून जास्तीचे पाणी बाहेर सोडता येते.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .