वालदेवी नदीत मृत अवस्थेतील माशांचा खच
धक्कादायक प्रकाराने नागरिक संतप्त
नाशिक| टीटाईम वृत्तसेवा| : नाशिकच्या वालदेवी नदीत लाखो मासे मृत अवस्थेत आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ड्रेनेज लाईन फुटल्याने नदीत दूषित पाण्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. याप्रकरणी नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे.
नाशिकरोड भागात वालदेवी नदीत मासे मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. नदीत दोन किलोमीटरच्या परिसरात लाखो मासे मृत्युमुखी पडल्याचे चित्र पहायला मिळाले. नदीच्या पाण्याची पातळी तशी कमी होती, मात्र या ठिकाणी हिरवेगार दूषित पाणी सर्वत्र दिसून आले. त्यावर मृत मासे तरंगत असल्याचे बघायला मिळाले. या ठिकाणी असलेली ड्रेनेज लाईन फुटल्याने दूषित पाण्यामुळे हे मासे मृत्युमुखी पडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. नागरिकांनी घटनेनंतर संताप व्यक्त केला.