“खरिप हंगामात घेतलेल्या पिकांसाठी करावयाचे पाणी व्यवस्थापन”
सर्वसाधारणपणे असा समज आहे की, खरीप हंगामात येणारी पिके पावसाच्या पाण्यावर विनासायास येतात. कोरडवाहू क्षेत्रात पिकास पाणी देण्यासाठी दुसरे काही साधनही उपलब्ध नसते मात्र ज्या ठिकाणी पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त खरीप हंगामात घेतलेल्या पिकांना पाणी देण्याची काही प्रमाणात सुविधा उपलब्ध असेल अशा ठिकाणी पिकांना योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी देऊन पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळविणे गरजेचे असते. तसे पाहिले तर रब्बी हंगामात घेतलेल्या पिकापेक्षा खरीप हंगामातील पिकाची पाण्याची गरज जास्तच असते. साधारणपणे पिकाची पाण्याची गरज ही ते पीक आपल्या माध्यमातून वातावरणाच्या गरजेनुसार किती पाणी वातावरणात सोडते यावर अवलंबून असते. हिवाळी हंगामाच्या तुलनेत पावसाळ्यात वातावरणाची पाण्याची गरज निश्चितच जास्त असते. स्वाभाविकपणे खरीप हंगामात बाष्पीभवनाचा वेग ही जास्त असतो. त्याचप्रमाणे रब्बी हंगामात घेतलेली बहुतांश पिके खरीप हंगामात पडलेल्या पावसाच्या पाण्यावर, हा पाऊस जमिनीत मुरल्यानंतरच्या ओलाव्यावर घेतली जातात. त्याकरीता रब्बी पिकांचे नियोजन खरिपात पडलेल्या पावसानुसार केले जाते मात्र खरीप पिकांच्या बाबतीत असे होत नाही. बरीचशी खरीप पिके ही जून महिन्यात पडलेल्या पहिल्या, दुसऱ्या पावसावर घेतली जातात आणि नंतर निसर्गाच्या लहरीनुसार त्या पिकांना नियमित स्वरूपात पाणीपुरवठा होईलच याची शाश्वती नसते. म्हणूनच खरीप हंगामातील पिकांसाठी ही पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे ठरते.
पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी विविध घटकांपैकी पाणी हा घटक अत्यंत महत्त्वाचा असून पिकाची पाण्याची गरज भागविण्यासाठी पिकास नेमके कधी पाणी द्यावे यासाठी खालील चार महत्त्वाचे निकष ठरवण्यात आले आहे.
१. विकास ठराविक दिवसाच्या अंतराने पाणी देणे
२. जमिनीतील ओलावा 50 टक्के उडून गेल्यानंतर पिकास पाणी देणे
३. बाष्पीभवन पात्रातून पाण्याचे होणारे बाष्पीभवन लक्षात घेऊन पिकास पाणी देणे आणि
४. पिकाच्या संवेदनक्षम अथवा नाजूक अवस्थेत विकास पाणी देणे पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत म्हणजे उगवण, पीक वाढीची सुरुवातीची अवस्था या वेगवेगळ्या काळात पिकाची पाण्याची गरजही वेगवेगळ्या प्रमाणात असते. पिकाची पाण्याची गरज भागवण्याचे जे चार निकष ठरवले गेले आहेत त्या प्रत्येक निकषाला निश्चितच महत्त्व आहे. पिकास ठराविक दिवसाच्या अंतराने पाणी देणे व जमिनीतील ५० टक्के ओलावा उडून गेल्यानंतर विकास पाणी देणे हे दोन निकष पडणाऱ्या पावसाचा अनियमितपणा पाहता खरीप हंगामातील पिकांना तंतोतंत लागू पडत नाहीत.खरिप हंगामात दररोजचे बाष्पीभवन सरासरी सहा ते आठ सेंटीमीटर एवढे असते. एखाद्या पिकास १० ते १२ दिवसाच्या अंतराने पाणी देणे आवश्यक असते मात्र मधल्या कालावधीत पाऊस झाला व तोही कमी जास्त प्रमाणात झाला तर हाही निकष पाळणे शक्य होत नाही. मात्र चौथा व शेवटचा, पिकाच्या संवेदनक्षम अथवा नाजूक अवस्थेत पिकास पाणी देणे हा निकष खरीप पिकांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा आहे.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .