“खरीप पिकांच्या पाणी देण्याच्या संवेदनक्षम अवस्था भाग-२”
मागच्या भागामध्ये आपण खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या मूग/उडीद,खरीप ज्वारी,कापूस आणि मका या पिकांच्या पाणी देण्याच्या संवेदनक्षम अवस्थाबाबत माहिती घेतली. आज आपण उर्वरित खरीप पिकांच्या संवेदनक्षम अवस्थांविषयी जाणून घेऊ यात.
बाजरी पिकाची खरीप हंगामात पाण्याची एकूण गरज २५ ते ३० सें.मी. एवढी असते. ही गरज २ पाण्याच्या पाळयांमधून भागवावी लागते. बाजरी पिकाच्या फुटवे फुटण्याची अवस्था (२५ ते ३० दिवस) आणि फुलोरा अवस्था (५० ते ५५ दिवस) या पाणी देण्याच्या दृष्टीने संवेदनक्षम अवस्था आहेत.
भुईमूग पिकाची खरीप हंगामात एकूण पाण्याची गरज ४० ते ५० सें.मी. एवढी असते आणि भुईमूग पिकास लागणारे हे पाणी ३ पाळयांमधून दिले गेले पाहिजे. भुईमूग पिकाच्या फांद्या फुटणे (२५ ते ३० दिवस), जमिनीत
आ-या उतरण्याची अवस्था (४० ते ४५ दिवस) आणि शेंगा
भरणे अवस्था (६५ ते ७० दिवस) या संवेदनक्षम अवस्था आहेत.
खरीप हंगामात घेतलेल्या सूर्यफुल पिकाची पाण्याची एकूण गरज ३० ते ३५ सें.मी. एवढी असते. सूर्यफूल पिकास खरीप हंगामात एकूण चार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. या पाळ्या रोपावस्था (१५ ते २० दिवस), फुलकळ्या लागणे (३० ते ३५ दिवस), फुलोरा अवस्था (४५ ते ५० दिवस) आणि दाणे भरण्याची अवस्था (६० ते ६५ दिवस) या महत्वाच्या अवस्थांमध्ये पाणी द्यावे.
तूर पिकाची एकूण पाण्याची गरज ४० ते ४५ सें.मी. असते. तूर पिकासही खरीप हंगामात एकूण चार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.त्यासाठी तूर पिकाच्या फांद्या फुटण्याची अवस्था (३० ते ३५ दिवस), फुलोरा अवस्था (६० ते ६५ दिवस), शेंगा भरणे (९० ते ९५ दिवस) या महत्त्वाच्या अवस्था आहेत. तुरीचा खोडवा ठेवताना २ वेळा पाणी देणे गरजेचे असते.पहिले पाणी खोडवा ठेवल्यानंतर २० दिवसांनी म्हणजे पुन्हा फुले येताना आणि दुसरे पाणी त्यानंतर २० दिवसांनी,शेंगा भरताना द्यावे.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .