“भाजीपाला पिकांसाठी ठिबक सिंचन पद्धत फायदेशीर-भाग २”
ठिबक सिंचन पद्धत आर्थिकदृष्ट्या किफायतशीर व्हावी यासाठी भाजीपाला पिकांच्या प्रचलित लागवड पद्धतीत बदल करून जोडओळ पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे असते. कमी उंचीच्या व कमी अंतरावरील भाज्यांसाठी सूक्ष्मतुषार पद्धत वापरताना लागवड पद्धतीत बदल केला नाही तरी चालतो मात्र सूक्ष्म
फवा-याचा ताशी वेग किती आहे यावरून दोन उपनळयांमध्ये नेमके किती अंतर ठेवावे हे ठरवावे लागते. फवाऱ्याचा प्रवाह किंवा पाणी बाहेर फेकण्याचा वेग ताशी ३० लिटर असेल तर दोन उपनळया तसेच दोन फवाऱ्यांमध्ये १.५ मीटर अंतर असावे तसेच फवाऱ्याचा प्रवाह ताशी ५० लिटर असल्यास दोन उपनळयात २.५ मीटर आणि दोन फवाऱ्यांत १.५ मीटर अंतर ठेवावे. सूक्ष्मतुषार सिंचन पद्धतीवर कांदा, फुलकोबी, लसूण, कोबी आणि बटाटा या भाजीपाला पिकांची लागवड करता येते. दोन ओळीत जास्त अंतर असणाऱ्या आणि उंच वाढणाऱ्या उदा. कारली, दोडका, दुधी भोपळा, काकडी टरबूज, खरबूज, वाल, टोमॅटो, वांगी, मिरची, इ. भाजीपाला पिकांच्या प्रत्येक ओळीसाठी एक उपनळी न वापरता हेक्टरी झाडाची संख्या कायम राखून पिकांची जोडओळ करून दोन ओळीच्या मध्ये एक उपनळीचा वापर केल्यास उपनळया व तोट्या अथवा सूक्ष्मनळयांच्या खर्चात सरसकट ५० टक्के बचत होते. मात्र यापैकी कारली व दुधी भोपळ्याची लागवड २ ते ३ मीटर अंतरावर केली जात असल्याने या पिकाच्या प्रत्येक ओळीसाठी एक उपनळी वापरणे योग्य ठरते.
ठिबक सिंचन पद्धतीत भाजीपाल्याच्या दोन ओळीत, दोन झाडात व दोन उपनळयात ठेवायचे अंतरः
टोमॅटो पिकाचे प्रचलित लागवड अंतर ६०x६० सें.मी. एवढे आहे. त्यासाठी दोन जोडओळीतील अंतर ४५ सें.मी.आणि दोन झाडातील अंतर ६० सें.मी. असे ठेवून दोन जोड ओळीतील सुटलेला पट्टा हा ७५ सें.मी. असतो आणि दोन उपनळयातील अंतर हे १२० सें.मी. राखले जाते.
वांगी या पिकाचे प्रचलित लागवड अंतर ६०x४५ सें.मी. आहे. दोन जोडओळीतील अंतर ४५ सें.मी. ठेवून दोन झाडातील अंतरही ४५ सें.मी. ठेवावे. यामध्ये दोन जोडओळीतील सुटलेल्या पट्टा हा ७५ सें.मी.चा असतो आणि दोन उपनळयातील अंतर हे १२० सें.मी.राखले जाते.
मिरची पिकाचेही प्रचलित लागवडीचे अंतर ६०x४५ सें.मी. एवढे आहे आणि दोन जोड ओळीतील अंतर हे ४५ सें.मी. आणि दोन झाडातील अंतर हे सुद्धा ४५ सें.मी. ठेवावे. यामध्ये दोन जोडओळीतील सुटलेल्या पट्ट्याचे अंतर ७५ सें.मी. आणि दोन उपनळयातील अंतर हे १२० सें.मी. एवढे राखले जाते.
काकडी पिकाचे प्रचलित लागवड अंतर हे १५०x५० सें.मी. आहे. यामध्ये दोन जोडओळीतील अंतर हे ६० सें.मी. आणि दोन झाडातील अंतर हे ५० सें.मी. ठेवून दोन जोडओळीती सुटलेला पट्टा हा २४० सें.मी.एवढा असतो आणि दोन उपनळयातील अंतर हे 300 सें.मी. राखले जाते.
टरबूज या पिकाचे प्रचलित लागवड अंतर हे २००x५० सें.मी. एवढे असते आणि जोडओळीतील अंतर ७५ सें.मी. आणि दोन झाडातील अंतर५० सें.मी. ठेवून दोन जोडओळीतील सुटलेला पट्टा ३२५ सें.मी. आणि दोन उपनळयातील अंतर हे ४०० सें.मी. राखले जाते.
वाल या भाजीपाला पिकाचे प्रचलित लागवड अंतर ७५x४५ सें.मी. असून दोन जोडओळीतील अंतर ६० सें.मी. आणि दोन झाडातील अंतर ४५ सें.मी. ठेवून दोन ओळीत सुटलेला पट्टा ९० सें.मी.चा आणि दोन उपनळयातील अंतर हे १५० सें.मी. राखले जाते.
प्रत्येक भाजीपाल्यासाठी वेगळा संच बसविण्याऐवजी त्यात किरकोळ बदल करून त्याच संचाचा विविध भाजीपाला पिकांसाठी वापर करता येतो. उदा. टोमॅटो, वांगी, मिरची यांचा संच त्यातील एक आड एक नळी बंद करून कारली किंवा दुधी भोपळ्यासाठी वापरता येतो. एवढेच नाही तर उसाचा संच काकडी किंवा टोमॅटो पिकासाठी आणि कांदा लसूण पिकासाठी वापरलेली सूक्ष्मतुषार पद्धत कोबीवर्गीय पिकांसाठी वापरता येते.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .