“पिकांसाठी करा तुषार सिंचन पद्धतीचा वापर”
पावसाळ्यात राज्याच्या काही भागात अतिवृष्टी होऊन खरीप पिकांचे नुकसान होते तर काही भागात अपुरा पाऊस पडतो. काही ठिकाणी जूनच्या सुरुवातीला खरीप पिकांसाठी पेरणीयोग्य पाऊस पडल्यानंतर पुढे पावसात मोठा खंड पडतो तर काही ठिकाणी पावसास उशिरा सुरुवात होते. परिस्थिती कुठलीही असली तरी पुढच्या पावसाचा काय भरोसा म्हणून बहुतेक शेतकरी खरीप पिकाची लागवड करतात. पिकाची उगवण होते, रिमझिम पावसाने पिके वाढतात मात्र नेमक्या फुलोऱ्याच्या काळात दाणे भरण्याच्या अवस्थेत जमिनीतील ओल कमी पडते. कुठल्याही पिकाच्या या दोन महत्त्वाच्या अवस्था पिकास पाणी देण्याच्या दृष्टीने नाजूक अथवा संवेदनक्षम अशा समजल्या जातात. या अवस्थांमध्ये पिकास एखादे-दुसरे संरक्षित पाणी दिले गेले तर त्या पिकापासून निश्चितच अपेक्षित उत्पादन मिळते, परंतु नेहमीच्या प्रचलित पाटपाणी पद्धतीने हे पाणी द्यायचे ठरविले तर तेवढ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध नसते, अशा वेळी कमी अंतरावरच्या, कमी उंचीच्या पिकांसाठी (उदा. खरीप भुईमूग, मूग, उडीद, सोयाबीन) तुषार सिंचन पद्धतीचा वापर निश्चितच फायदेशीर ठरतो. या पद्धतीने काही शेतकऱ्यांनी कापसासारख्या जास्त अंतरावरच्या पिकासही पाणी देऊन चांगले उत्पादन मिळविले आहे. त्याचप्रमाणे याच पद्धतीचा आधुनिक प्रकार म्हणजे रेनगनचा वापर उसासारख्या पिकासाठी करण्याकडे अनेक शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. उसासाठी रेणगनचा वापर केल्याने अलीकडे उसावर येणाऱ्या पांढऱ्या लोकरी माव्याचे काही प्रमाणात नियंत्रण होते असाही शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
तुषार सिंचन पद्धतीत पाण्याची जवळपास ३० ते ३५% बचत होते. तुषार सिंचन संच हाताळण्यास अगदी सोपा असून शेतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजासहजी हलवता येतो. त्यामुळे शेतातील पिकाचे एकूण क्षेत्र टप्प्याटप्प्याने भिजविता येते आणि केवळ एकाच संचात शेतकरी पिकाचे फार मोठे क्षेत्र भिजवू शकतात. मात्र त्यासाठी ठिकठिकाणी पाईपलाईनचे जाळे शेतात पसरून जास्तीत जास्त ठिकाणी सायफन काढणे जरुरीचे असते. सायफनच्या ठिकाणी तुषार संचाचे पाईप जोडले की त्या ठिकाणच्या पीकक्षेत्रात ओलीत करणे सहज शक्य होते.
तुषार सिंचन पद्धतीची ठिबक सिंचन पद्धतीशी तुलना करायची झाल्यास तुषार सिंचन पद्धत वापरावयास सोपी असून केवळ एकाच संचात पाण्याच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त पीक क्षेत्र भिजवले जाऊ शकते. पाण्याच्या बचतीच्या बाबतीत ठिबक सिंचन पद्धत निश्चितच सरस असून ठिबक पद्धतीत पिकाच्या मुळाच्या कार्यक्षेत्रात पाणी दिले जाते व ठराविक क्षेत्राचेच ओलीत केले जाते, मात्र तुषार सिंचन पद्धतीत तोटीतून पडणारे पाणी सर्व क्षेत्रावर समप्रमाणात पडत नसल्याने काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी आवश्यकतेपेक्षा पाणी कमी पडते आणि त्यामुळे पिकाची वाढही कमी जास्त होऊन त्याचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याकरिता शक्यतो सकाळच्या वेळी वारा शांत असताना तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. त्याचप्रमाणे तुषार तोटीतून पावसाच्या थेंबाच्या स्वरूपात पिकाच्या पानांवर सारखे पाणी पडून व वातावरणातल्या आर्द्रता निर्मितीमुळे पिकांवर रोग व किडीचा काही प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्याकरिता पिकास एकाच वेळी जास्त प्रमाणात पाणी न देता पिकाच्या आवश्यकतेएवढेच पाणी देणे गरजेचे असते. तुषार सिंचन पद्धतीत पावसाच्या स्वरूपात पिकावर पाणी पडत असल्याने पिकाचा फुलोरा घुऊन जाण्याची शक्यता असते, त्याकरिता फुलोरा सुरू होण्याअगोदरच तुषार सिंचनाने विकास पाणी द्यावे, पिकाच्या फुलोऱ्याच्या काळात पिकास पाणी देणे शक्यतो टाळावे. तुषार सिंचन पद्धतीत पिकास पाणी देताना जमिनीचा प्रकारही लक्षात घ्यावा लागतो. कारण हलक्या जमिनीत पाणी जास्त वेगाने मुरत असल्याने या पद्धतीतून जास्त प्रमाणात पाणी दिले गेल्यास दिलेले पाणी वेगाने जमिनीत मुरून मुळांच्या कक्षेच्या खाली निघून जाते व पाण्याचा अपव्यय होतो. हलक्या जमिनीत त्याकरिता तुषार सिंचन पद्धतीतून थोड्या प्रमाणात, कमी अंतराने पाणी देणे आवश्यक असते. मध्यम व भारी जमिनीत घेतलेल्या पिकांच्या पाण्याच्या गरजेनुसार पाण्याच्या उपलब्धतेनुसार विशिष्ट अंतराने तुषार सिंचन संचातून पाणी द्यावे. खरीप पिकांसाठी तुषार सिंचन पद्धतीचा वापर करताना वरील सर्व बाबी विचारात घ्याव्यात.
या लेखाचे लेखक डॉ कल्याण देवळाणकर हे सेवा निवृत्त कृषी शास्त्रज्ञ आहेत.