“पिकांना पाणी किती, केव्हा व कसे द्यावे?”
पीक उत्पादन वाढीच्या निरनिराळ्या घटकांपैकी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. पिकास गरजेपेक्षा जास्त किंवा कमी पाणी दिल्यास त्याचा पीक वाढीवर, पर्यायाने उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. त्याकरिता पाण्याच्या गरजेनुसार आणि जमिनीच्या प्रकारानुसार योग्य मात्रेत, योग्य अंतराने आणि पीक वाढीच्या विशिष्ट अवस्थेत पाणी देऊन पाण्याचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे असते. पाण्याचे नियोजन करण्याची तीन मूलभूत तत्वे म्हणजे एखाद्या पिकास नेमके किती पाणी द्यावे म्हणजेच पाण्याची एकूण गरज किती आहे आणि पिकाची पाण्याची ती विशिष्ट गरज भागवण्यासाठी प्रत्येक पाळीत किती पाणी द्यावे, दुसरे म्हणजे हे पाणी केव्हा आणि किती पाळयांमधून द्यावे आणि तिसरे म्हणजे हे लागणारे पाणी कसे द्यावे? यात पाणी देण्यासाठीच्या रानबांधणीचा समावेश होतो.
१. पिकांना पाण्याची गरज किती असतेः
पाण्याची गरज ही पीक घेतलेला हंगाम, पिकांचा प्रकार व जात, वाढीच्या अवस्था आणि पीक तयार होण्यास लागणारा एकूण कालावधी यावर अवलंबून असते. उदा. रब्बी ज्वारीची पाण्याची गरज ही उन्हाळी ज्वारीच्या पाण्याच्या गरजेपेक्षा कमी असते. सीएसएच-५ या हायब्रीड जातीची पाण्याची गरज ४५ सेंटीमीटर एवढी असते तर सीएसएस-१ या जातीची पाण्याची गरज ४० सेंटीमीटर एवढी असते. पिकाच्या बाल्यावस्थेत पाण्याची गरज कमी असते तर पिकाच्या मुख्य वाढीच्या अवस्थेत पिकाची पाण्याची गरज जास्त असते. तसेच पिकाचा कालावधी जास्त असेल तर पाण्याची गरजही निश्चितच जास्त असते, उदा. उसाचा कालावधी 12 ते 18 महिने एवढा असतो, त्यामुळे उसाची पाण्याची एकूण गरज २०० ते ३०० सेंटीमीटर एवढी असते. याउलट हरभरा पिकाचा कालावधी ३.५ ते ४ महिने असतो. त्यामुळे त्यास ३० सेंटीमीटर पाणी पुरेसे होते.
२. पिकास पाणी केव्हा द्यावेः
जमिनीतील उपलब्ध ओलावा, पिकाची अवस्था व हवामानानुसार द्यावयाच्या दोन पाण्याच्या पाळयातील अंतर ठरवता येते. जास्तीत जास्त उत्पादनाच्या दृष्टीने तसेच दिलेल्या पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी गरजे एवढे पाणी देणे आवश्यक असते. दररोजची पाण्याची गरज भागविण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत वापरणे फायदेशीर ठरते.एकूण पाण्याची गरज खालील मार्गाने भागवता येते.
अ. ठराविक दिवसाच्या अंतरानेः
या पद्धतीत पेरणी पासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत ठराविक दिवसाच्या अंतराने पाणी दिले जाते.
पाण्यातील अंतर हे पीक घेतलेला हंगाम तसेच जमिनीचा पोत यानुसार बदलते, उदा. उन्हाळी भुईमुगासाठी दोन पाळयातील अंतर हे खरीप हंगामात घेतलेल्या भुईमुगापेक्षा कमी ठेवावे लागते. तसेच काळ्याभोर भारी जमिनीपेक्षा हलक्या जमिनीत घेतलेल्या पिकास लवकर पाणी द्यावे लागते.
ब .जमिनीतील ओलावा पाहूनः
जमिनीचा प्रकार व खोली विचारात घेऊन जमिनीतील उपलब्ध ओलाव्यापैकी ५० टक्के ओलावा उडून गेल्यावर पिकास पाणी देणे हितावह ठरते. यापेक्षा जास्त ओलावा नाहीसा झाल्यास मात्र उत्पादनात घट येते.
क. हवामानानुसार पिकास पाणीः
पाण्याची गरज ही पीक घेतलेल्या ठिकाणच्या हवामानावर म्हणजे तापमान, सूर्यप्रकाश, हवेतील आर्द्रता, वाऱ्याचा वेग, इत्यादीवर अवलंबून असते. या पद्धतीत जमिनीची जलधारण क्षमता व दररोज होणारे पाण्याचे बाष्पीभवन लक्षात घेतले जाते. दररोज बाष्पीभवन पात्रातून जेवढे पाणी बाष्पाच्या स्वरूपात उडून जाईल तेवढेच अथवा थोडे कमी पाणी पिकाच्या व जमिनीच्या माध्यमातून उडून जाते असे गृहीत धरले जाते. त्यानुसार जमिनीतील उपलब्ध ओलाव्याच्या प्रमाणाानुसार द्यावयाची पाण्याची मात्रा ठरवली जाते. उदाहरणार्थ ७० ते ७५ मिलिमीटर बाष्पीभवन झाल्यावर पाणी द्यावयाचे ठरवले तर उन्हाळ्यात १० ते १२ दिवसांनी, पावसाळ्यात पाऊसमानानुसार १५ ते २० दिवसांनी आणि हिवाळ्यात २० ते २५ दिवसांनी सुमारे ७ सेंटीमीटर उंचीचे पाणी द्यावे लागेल.
३. पिकास पाणी कसे द्यावेः
रानबांधणी करून (सारे, वाफा, सरीवरंबा, इत्यादी) पिकास पाणी दिल्यास सर्व ठिकाणी समप्रमाणात पाणी बसते, पाण्याचा अपव्यय व जमिनीची धूप टाळता येते आणि त्यामुळे पिकाची वाढ चांगली होते.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .