उगवत्या सूर्याला रामराम घालणाऱ्या व्यवस्थेत हरवलेले व्यक्तित्व
राजकरणात कुणी कुणाचे शत्रू नसते. पण मित्रही नसते. आपले परके असे कुणी नसते. असते ती फक्त संधी आणि ती ज्याना चोरता येते ते कुशल राजकारणी. ही व्याख्या निरंतर लागू पडणारी आहे. आणि आता तर राजकारण म्हणचे मी आणि माझे कुटुंब एव्हढेच मर्यादित झाले आहे. देशभर हीच अवस्था आहे. ज्यांनी भाजपा वाढवली. घरोघरी हिंदुत्व आणि कमळ चिन्ह पोहचवण्यासाठी जीवन भर पक्ष शिस्त ,निष्ठा जपली ते व्यक्तित्व कालप्रवाहात खूप दूरवर वाहून गेले आहे. याची प्रचिती या निवडणुकीत पदोपदी अनुभवला येत आहे.
आता राज्याच्या निवडणुकीत भाजपला आपल्या पाया असलेल्या नेत्यांचा विसर पडला आहे. यामागे आयराम गायराम भाजपा कार्यपद्धती ही कारणीभूत असावी. फुटलेल्या , तोंडलेल्या , फोडलेल्या अन्य पक्षाचे नेत्यांची चाकरी आपल्या निष्ठावान कार्यकर्त्याना करवून सत्ता हाती ठेवणारी भाजपा जुन्या कर्मठ कार्यकर्ते नेते यांना विसरणारच. असेच हे तीन नेते ज्यांच नाव राज्याच्या राजकारणात होते. उत्तर नगर जिल्ह्यात होते. कोपरगावात तर यांचे चांगले प्रस्त होते.
आजच्या निवडणुकीत भीमराव बडदेंचे नाव सामान्य लोकांच्या चर्चेत आल्याने थोडा आढावा घेतला तर ही तीन नावे समोर येतात की ज्यांनी भाजपासाठी आयुष्य वेचले त्यांचे कुटुंबीयांचे राजकीय अस्तित्व कुठे आहे ? आता बदललेल्या भाजपात त्यांना स्थान मिळणे अपेक्षित आहे. कारण आता राष्ट्र प्रथम नाही तर सत्ता व कुटुंब प्रथम ही संकल्पना सोबत घेऊन भाजपा राजकारण करताना दिसत आहे.

अभ्यासू व्यक्तिमत्त्व प्रा. ना. स. फरांदे सर…
प्रा. ना. स. फरांदे सर यांचे भारतीय जनता पक्षासाठी मोठे योगदान राहिले आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील राहाता, कोपरगांव तालुक्यात त्यांना ओळखणारा मोठा जनसमुदाय आजही आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून काम करतांना त्यांना विधानपरिषदेचे सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी भाजपा पक्षाचे काम पुढे नेले. त्यांनी त्यांचा निधी दुर्गम भागाचा विकास, वाचनालय-ग्रंथालय यासाठी वापरला.उत्तम अभ्यासू वक्ता म्हणून त्यांची ओळख कायम राहिली आहे.

लढवैय्या गोरगरिबांचा लोकनेता भिमराव बडदे ( नाना )
संघर्ष भिमरावांच्या पाचवीला पुजलेला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या भिमराव नाना बडदे यांचे सार्वजनिक योगदान मोठे राहिले आहे. पतितपावन संघटनेचे ते संस्थापक होते. आणिबाणी सारख्या कठीण काळात अख्खे बडदे कुटुंबाने १९ महिने बंदिवासात यातना भोगल्या. (अख्खे बडदे कुटुंब म्हणजे एकही पुरुष घरी नाही. संपूर्ण जेल मध्ये बंदिवासात) प्रत्येकाच्या कठीण प्रसंगी वेळी-अवेळी धावून येणारा गोरगरिबांचा आजही आठवतो.भाजपाचे अहिल्यानगर(संपुर्ण अहमदनगर मिळून एकच जिल्हाध्यक्ष )जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले. तरुणांचे संघटन उभे केले. भाजपाचे कमळ घरोघरी उमलावे म्हणून झटून काम केले. “धर्मयुद्ध” नावाची जीप गाडी आजही अनेकांना आठवते. अटलजींच्या अल्पकालीन सरकार मध्ये नानांना जनतेने खासदार केले. पुण्याच्या फर्ग्युसन काॅलेज पासून पतितपावन संघटनेत स्व. गोपीनाथजी मुंढे जिवाभावाचे मित्र आणि कार्यकर्ते ही……नगर जिल्ह्यातील धाडसी आणि लढवैय्या नेता म्हणजे भिमराव नाना बडदे.

निष्ठावान कर्मठ , अत्यंत शिस्तप्रिय सूर्यभान वहाडणे पाटील ( आण्णा )
पुणतांबा येथे बालपण गेलेले , स्वकर्तुत्व , शिस्तीच्या जीवन पद्धतीने संघाचे काम करणारे “आण्णा ” भाजपचे खासदार राहिले सुमारे वीस,बावीस वर्ष ते खासदार , विधान सभेचे उपाध्यक्ष , भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशा जबाबदारीच्या पदावर राहिले. त्यांच्या शिस्तप्रिय व तत्वनिष्ठ जीवन पद्धतीने फक्त आणि फक्त भाजपासाठी , संघासाठी जीवन अर्पण केले. कोपरगाव येथे निवास केला. आणीबाणीत , स्वतंत्र लढ्यात जेल मध्ये राहिले. ते 1996 ते 2002 या काळात राज्यसभेचे सदस्य होते. यापूर्वी ते 1982 ते 1994 या काळात महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते आणि 1988 ते 1994 पर्यंत त्यांनी उपसभापती म्हणून काम पाहिले होते. 1994 मध्ये पक्षाच्या राज्य युनिटचे अध्यक्ष होते.


आज महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका सुरु आहे……दुर्देव पहा भाजपाच्या जडणघडणीत अहिल्यानगर जिल्ह्यात विशेषकरून उत्तरेत होणाऱ्या महायुतीच्या प्रचार पत्रक, फलकावर किमान भाजपचे चिन्हावर निवडणूक होते आहे तिथे भाजपाचे अभ्यासू नेते प्रा. ना. स. फरांदे आणि लोकनेते भिमराव नाना बडदे ,निष्ठावान कर्मठ , अत्यंत शिस्तप्रिय सूर्यभान वहाडणे पाटील ( आण्णा ) या दिवंगतांचे फोटो नाही.त्यांच्या कुटुंबातूनही कोणी म्हणणार नाही…….स्वर्गातून ते पहात असतील तेव्हा हाच विचार करत असतील, “हाच तो पक्ष आम्ही खस्ता खावून , एक भुक्त राहून ,तळमळीने उभा केला.” की आज तो आयाराम गयारामच्या ताब्यात आहे . आणि आपला विसर पडला सगळ्यांना……