वाढीच्या अवस्थांनुसार उसाला द्या योग्य प्रमाणात पाणी
कुठल्याही पिकासाठी पाण्याचे व्यवस्थापन करताना पिकाच्या वाढीच्या अवस्थांनुसार पिकास शास्त्रीयदृष्ट्या पाणी किती, केव्हा तसेच कशा पद्धतीने द्यावे या बाबी विचारात घेणे गरजेचे असते.
जमिनीच्या प्रकारानुसार हलक्या जमिनीत ४ ते ६ सें.मी., मध्यम जमिनीत ६ ते ८ सें.मी. व भारी जमिनीत ८ ते १० सें.मी. उंचीचे पाणी प्रत्येक पाळीत दिले पाहिजे. त्याचप्रमाणे पिकाच्या पाणी देण्याच्या संवेदनक्षम अवस्थेत पिकास पाणी दिल्याने पिकाच्या उत्पादनात वाढ होते. पिकास योग्य मात्रेत, समप्रमाणात पाणी देण्यासाठी सरी-वरंबा, सारे, वाफे, रुंद गादीवाफे किंवा आळे या वेगवेगळ्या रानबांधणीचा पिकानुसार तसेच जमिनीच्या उतारानुसार वापर करावा लागतो. सहसा ऊस लागवडीसाठी शेतात ३ फूट अथवा १ मीटर अंतरावर सरसकट सऱ्या पाडल्या जातात. मध्यम ते भारी जमिनीत या
स-यांमधे
ऊसाला प्रत्येक पाण्याच्या पाळीत ३० ते ४० सें.मी. उंचीचे पाणी दिले जाते. वास्तविक कुठल्याही पिकाला एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी देण्याची अजिबात आवश्यकता नसते.
ऊस पिकाला उगवण अवस्थेत सुरुवातीचे दोन महिने ६ सें.मी., त्यानंतर फुटवे फुटण्याच्या अवस्थेपासून ते जोमदार वाढीच्या अवस्थेपर्यंत (दुसऱ्या महिन्यापासून दहाव्या महिन्यापर्यंत) ८ ते १० सें.मी. व शेवटी पक्वतेच्या काळात ७ ते ८ सें.मी. उंचीचे पाणी प्रत्येक पाळीत देण्याची शिफारस आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त दिलेल्या पाण्यामुळे जमिनीची धूप होते, जमिनी पाणथळ किंवा क्षारयुक्त बनतात, अशा जमिनीत पिकाची वाढ योग्य होत नाही तसेच सोडियम क्षारामुळे पिकांची मुळे जळण्याचा प्रकारही होतो. त्याचबरोबर जास्त दिलेल्या पाण्यामुळे पिकास योग्य प्रमाणात प्राणवायू मिळत नाही, पिकाची अन्नद्रव्ये शोषण करण्याची क्षमता कमी होते, पिकास अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूंची क्रिया मंदावते, जमिनीचे तापमान घटल्यामुळे जमिनीत पिकाच्या वाढीसाठी अनुकूल तापमान राहत नाही तसेच पिकावरील कीड रोगांचे प्रमाण वाढते. हे सर्व दुष्परिणाम लक्षात घेऊन ऊस पिकाला प्रत्येक पाळीत शिफारस केलेल्या मात्रेत पाणी देणे जास्त उत्पादनाच्या दृष्टीने गरजेचे असते.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .