उन्हाळी हंगामात भाजीपाल्याचे पीक घेताना हमखास पाण्याची सोय असणे अत्यंत महत्त्वाचे असते. वेगवेगळ्या वर्गातील उन्हाळी हंगामात घेता येण्याजोगी भाजीपाला पिके खालील प्रमाणे आहेत.
वेलवर्गीय भाज्याः काकडी, कारली, दुधी भोपळा, दोडका, वाल, इ.
फळभाज्याः वांगी, हिरवी मिरची, गवार, भेंडी, इ.
पालेभाज्याः पालक, मेथी, कोथिंबीर, राजगिरा, करडई, इ.
उन्हाळी हंगामात घेतलेल्या भाजीपाल्याच्या पिकांचा कालावधी इतर पिकांच्या तुलनेत कमी असतो. मात्र पिकाच्या संपूर्ण कालावधीत जमिनीत सतत ओलावा राखणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे तापमान, हवेतील आर्द्रता, वाऱ्याचा वेग, बाष्पीभवनाचा वेग, इ. बाबींचा विचार करून पिकास पाणीपुरवठा करणे गरजेचे असते.
उपलब्ध पाणी व जमिनीचा प्रकारः हलक्या जमिनीची पाणी धारण क्षमता ही भारी जमिनीपेक्षा अतिशय कमी असते. त्यामुळे हलक्या जमिनीत पिकास वरचेवर पाणी द्यावे लागते आणि भारी जमिनीत घेतलेल्या पिकास उशिरा पाणी दिले तरी चालते, म्हणून उन्हाळी हंगामात भाजीपाल्याच्या पिकासाठी शक्यतो भारी जमीन निवडावी. कारण अशा जमिनीत ओलावा जास्त काळ टिकतो. पिकांना पाण्याचा ताण बसत नाही. जास्त अंतराने पाणी दिल्याने पाण्याचा अपव्यय टाळून पिकापासून अपेक्षित उत्पादन मिळणे शक्य होते. एकंदरीत उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करता येतो.
रानबांधणी व पाणी देण्याची पद्धतः उन्हाळी हंगामात उपलब्ध पाण्याचा कार्यक्षमरीत्या वापर करण्यासाठी पिकास योग्य प्रकारे रानबांधणी करणे आवश्यक असते. उन्हाळी हंगामात असलेली पाण्याची कमतरता लक्षात घेऊन पाणी हे जमिनीस न देता पिकास दिले गेले पाहिजे या दृष्टिकोनातून पिकांच्या दोन ओळीतील व दोन रोपातील अंतर लक्षात घेऊन सारे, सरी-वरंबा, रुंद सरी किंवा आळे पद्धतीचा अवलंब केल्यास पिकास योग्य पाण्याची मात्रा आवश्यक त्यावेळी देऊन पिकापासून अधिक उत्पादन मिळवणे शक्य होते. # पालेभाज्याः सपाट वाफे अथवा सारे
(सा-याची
रुंदी कमी असावी)
वेलवर्गीय भाज्याः रुंद सरी-वरंबा (रुंदी दुधी भोपळा २.५ मीटर, कारली-दोडका १.५ मीटर, काकडी १.० मीटर)
फळवर्गीय भाज्याः सरी-वरंबा पद्धती
ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंबः ठिबक सिंचन पद्धतीत प्लास्टिकच्या रुंद नळीने तोट्यांमार्फत पिकांच्या मुळांच्या कक्षेत गरजेएवढेच पाणी पिकास दररोज अथवा एका दिवसाआड दिले जाते. या पद्धतीत पाण्याची कार्यक्षमता सुमारे ९० टक्क्यापेक्षा जास्त मिळत असल्याने उपलब्ध पाण्यात उन्हाळी हंगामातही चांगले पीक घेता येते. या पद्धतीच्या वापराने पीक घेतलेल्या जमिनीत हवा, पाणी व माती यांचे योग्य संतुलन राखले जाऊन पीक वाढीसाठी अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने पीक जोमाने वाढते व पर्यायाने पिकाचे भरघोस उत्पादन मिळते. विशिष्ट क्षेत्रातच ओलावा असल्याने तणांची वाढही तेवढ्याच भागात होते व तण काढणीचा खर्च कमी होतो. मध्यम, काळ्याभोर जमिनीत उन्हाळी हंगामात घेतलेल्या भाजीपाल्याच्या पिकास सर्वसाधारणपणे ५ ते ६ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे लागते. प्रचलित पद्धतीने पिकास पाणी देताना पाटपाणी संपूर्ण जमिनीवर दिल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. जमिनी खराब होतात. पाण्याचा कार्यक्षमरित्या वापर होत नाही. पर्यायाने उत्पादनातही घट येते. या सर्व बाबी लक्षात घेऊन उन्हाळी भाजीपाल्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर निश्चितच फायदेशीर दिसून आला आहे. याव्यतिरिक्त कमी अंतरावरील व कमी उंचीच्या भाजीपाला पिकांना फुलोऱ्याचा काळ वगळतात तुषार सिंचनाने पाणी दिल्यासही उत्पादनात वाढ दिसून आली आहे.
या लेखाचे लेखक डॉ कल्याण देवळाणकर हे सेवा निवृत्त कृषी शास्त्रज्ञ आहेत.