पिकाची पाण्याची गरज ही पीक वाढीचा कालावधी, मुळांची खोली, पानांचा आकार, पानावरील छिद्रांची
संख्या यावर अवलंबून असते. या सर्व बाबींचा विचार करून पैदासकरांनी उपलब्ध करून दिलेल्या कमी पाणी लागणाऱ्या जातींचा पीक पद्धतीत समावेश करावा.
पिकांची लागवड पद्धतः पीक लागवड पद्धत आणि पाण्याच्या कार्यक्षमतेचा जवळचा संबंध आहे. त्याचप्रमाणे लागवड पद्धतीनुसार सूर्यप्रकाशाचा उपयोग आणि बाष्पीभवनाचा दरही बदलतो. पिकातील दोन ओळीतील व दोन रोपातील अंतर कमी असल्यास पिकाची घनता जास्त असते. पिकाची घनता जास्त असल्यास सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहचू शकत नाही, जमिनीवरून होणाऱ्या बाष्पीभवनाचा दर कमी होतो तसेच तणांची वाढही मर्यादित राहते, पर्यायाने पाण्याची कार्यक्षमता जास्त मिळते. साधारणपणे कमी उंचीच्या जाती कमी अंतरावर पेरल्यामुळे पाण्याची कार्यक्षमता वाढलेली आणि उंच जाती जास्त अंतरावर पेरल्यामुळे पाण्याची कार्यक्षमता कमी झालेली आढळून आलेली आहे.
पेरणीची वेळः कोणत्याही पिकाची पेरणी शिफारशीच्यावेळी केल्यास पिकाची उगवण चांगली होते, पिकाच्या संपूर्ण वाढीच्या काळात त्याला अनुकूल हवामान तसेच ओलावा मिळतो, त्याचप्रमाणे पिकांच्या मुळांची चांगली वाढ होऊन ओलाव्याबरोबरच जमिनीतील अन्नद्रव्ये शोषण केल्याने पिकाचे भरघोस उत्पादन मिळते. मात्र पेरणीस उशीर झाल्यास गव्हासारख्या पिकाचे उत्पादन ३० ते ४० टक्के घटल्याचेही दिसून आले आहे.
पिकातील तणांचे नियंत्रणः पिकातील तणे पाणी आणि सूर्यप्रकाशासाठी पिकाशी स्पर्धा करीत असतात. त्यांची पाण्याची गरज ही पिकापेक्षा जास्त असते. त्यामुळे निरनिराळ्या मार्गाने तणांचा बंदोबस्त केल्यास तणे शोषण करणार असणारे पाणी पिकास उपयोगी पडून पाणी वापराची कार्यक्षमता वाढविण्यास मदत होते.
पिकावरील कीड व रोगांचे नियंत्रणः पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यास पिकाच्या उत्पादनात घट होते. पिकाचे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी कीड व रोगांचा बंदोबस्त करणे किंवा त्यांना बळी न पडणारी जात वापरणे हे पाण्याच्या कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने गरजेचे असते.
जमिनीची मशागतः जमिनीच्या मशागतीमुळे पिकांची उगवण चांगली होऊन रोपांची वाढही चांगली होते. मशागतीमुळे जमिनीची पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत होते व जमिनीत साठविलेल्या पाण्याचा उपयोग पीक वाढीसाठी करता येतो, पर्यायाने पाणी वापराची कार्यक्षमताही वाढवता येते.
लाभक्षेत्रात दिला जाणारा एक क्युसेकचा प्रवाह दोन किंवा तीन सरी अथवा साऱ्यांत विभागून द्यावा
पाणीटंचाईच्या काळात उसास एक सरी आड पद्धतीने पाणी द्यावे
फळझाडांसाठी आत व बाहेर अशी दोन आळी तयार करून केवळ बाहेरच्या आळ्यात पाणी द्यावे
बाष्पीभवनाद्वारे होणारा पाण्याचा नाश टाळण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा व खुरपणी/कोळपणी करून जमिनीतील भेगा बुजवाव्यात
विहिरीतील गाळ काढावा. थारोळयात पडलेल्या खड्ड्याच्या ठिकाणी दगडाचे अस्तर तयार करावे. पाणी वाहून नेणारा पाट सरळ करावा व त्याला योग्य तो ढाळ द्यावा. त्याचप्रमाणे पाटातील गवतामुळे पाणी वाहण्यास अडथळा निर्माण होत असल्याने पाट स्वच्छ ठेवावेत.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .