“उन्हाळी पिकास दिलेल्या पाण्याचा कार्यक्रम वापर करण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना”
उन्हाळी हंगामात जास्तीचे उष्णतामान, कोरडे हवामान, सोसाट्याचा वारा, इ. कारणांमुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असते. त्यामुळे इतर हंगामाच्या तुलनेत जमिनीतील ओल खूपच लवकर कमी होते. पिकास वरचेवर पाणी द्यावे द्यावे लागत असल्याने पाण्याच्या एकूण पाळ्या जास्त द्याव्या लागतात.
जमिनीच्या प्रकारानुसार तिची जलधारणा शक्ती वेगवेगळे असते. हलक्या जमिनीची जलधारणा शक्ती कमी असल्यामुळे पिकास पाणी खूप लवकर द्यावे लागते. याउलट मध्यम आणि भारी जमिनीची जलधारणा शक्ती जास्त असल्यामुळे हलक्या जमिनीच्या तुलनेत अशा जमिनीत घेतलेल्या पिकांना उशिरा पाणी दिले तरी चालते. त्याकरिता उन्हाळी पिकासाठी शक्यतो मध्यम ते भारी जमीन निवडावी अशी शिफारस आहे.
पाण्याची बचत करण्याच्या दृष्टीने तसेच पिकास दिलेल्या पाण्याचा कार्यक्षरमरित्या वापर करण्याच्या दृष्टीने आच्छादनाच्या वापराला उन्हाळी हंगामात अतिशय महत्त्व आहे. उन्हाळी हंगामात उष्णता जास्त असते, हवाही कोरडी असते, त्याचप्रमाणे वाराही अतिशय वेगाने वाहत असतो. त्यामुळे पाण्याची बाष्पीभवनाची क्रियाही जोरात होत असते आणि त्यामुळे जमिनीतील ओलही लवकर निघून जाते. पाण्याच्या बाष्पीभवनाची क्रिया कमी करण्यासाठी उन्हाळी हंगामात घेतलेल्या पिकासाठी आच्छादनाचा वापर करणे फायदेशीर ठरते. यासाठी शेतात उपलब्ध होणारे टाकाऊ पदार्थ म्हणजेच काडीकचरा, गव्हाचा
भुसा, उसाचे पाचट, पिकांची धसकटे यांचा वापर करावा. प्लास्टिक कागदाचा देखील आच्छादन म्हणून चांगला उपयोग होतो. उन्हाळी हंगामात घेतलेल्या पिकात आच्छादनाचा वापर केल्याने पिकाची पाण्याची गरज सुमारे २५ ते ३० टक्क्याने कमी होते तसेच पिकात तणांचा प्रादुर्भावही कमी होतो.
पिकाच्या शरीरातून पानांच्याद्वारे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पर्णोत्सर्जनावर
नियंत्रण आणण्यासाठी केओलीन सारख्या पदार्थाचा वापर करता येतो. यासाठी केओलिन पावडर ८ टक्के (१० लिटर पाण्यात ८०० ग्रॅम) या प्रमाणात पिकावर फवारल्यास पिकाच्या पानावर चुन्यासारखा पांढरा थर तयार होतो. या पांढऱ्या रंगामुळे उन्हाळी हंगामातील प्रखर अशी सूर्यकिरणे परावर्तित होतात आणि त्यामुळे पानांचे तापमान कमी होते. उष्णतामान कमी झाल्याने पानाद्वारे होणाऱ्या पर्णोत्सर्जनाचा वेग कमी होऊन पाण्याचा अपव्यय कमी होतो आणि जमिनीतील ओल जास्त काळ टिकून ठेवण्यास मदत होते.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .