जमिनीच्या मगदूराप्रमाणे कापसाच्या लागवडीचे अंतर ठरवावे लागते. भारी जमिनीत कापसाच्या सुधारित वाणांसाठी अंतर ९०x६० सेंटिमीटर एवढे ठेवावे लागते. तर संकरित वाणांसाठी भारी जमिनीत १२०x९० सेंटीमीटर व मध्यम जमिनीत ९०x९० सेंटीमीटर पर्यंत लागवडीचे अंतर वाढवावे लागते. प्रचलित कापूस लागवडीच्या पद्धतीनुसार प्रत्येक ओळीसाठी एक उपनळी व प्रत्येक झाडासाठी एक तोटी वापरणे खर्चिक असल्याने जोडओळ ठिबक सिंचन पद्धतीत कापसाची लागवड करावी.
मध्यम जमिनीसाठी शिफारस केलेले प्रचलित पद्धतीतील दोन ओळीतील अंतर ९० सेंटीमीटर कमी करून जोड ओळीत ६० सेंटिमीटर ठेवावे. असे केल्याने दोन जोड ओळीत १२० सेंटीमीटर एवढे अंतर राखले जाते. या पद्धतीत प्रत्येक जोड ओळीच्या मधोमध एक उपनळी वापरावी व उपनळीवर दोन समोरासमोरील झाडांमध्ये ९० सेंटीमीटर अंतरावर एक तोटी बसवावी. दोन उपनळयात १८० सेंटीमीटर अंतर या पद्धतीत राखले जाते.
भारी काळया जमिनीत कापसासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करताना प्रचलित लागवड पद्धतीतील दोन ओळीतील अंतर (१२० सेंटीमीटर) कमी करून जोड ओळीत ते ९० सेंटीमीटर ठेवावे. या पद्धतीत दोन जोड ओळीत १५० सेंटीमीटर व दोन उपनळयात २४० सेंटीमीटर अंतर राखले जाते. ९० सेंटीमीटर वरील दोन समोरासमोरील झाडांमध्ये एका तोटीचा वापर करावा. दोन्ही प्रकारच्या जमिनीत दोन जोड ओळीमधील मधल्या पट्ट्याचा उपयोग कापसावर औषध फवारणी करण्यासाठी तसेच कापूस वेचणीसाठी करता येतो.
कापूस पिकासाठी त्याच्या एकूण कालावधीत प्रचलित पद्धतीचा म्हणजे प्रवाही पद्धतीचा अवलंब केला असता सुमारे ८० ते ९० सेंटीमीटर पाणी लागते व ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला तर केवळ ४५ सेंटिमीटर पाणी लागते. म्हणजे ४५ टक्के पाण्याची बचत होते शिवाय कापसाच्या उत्पादनातही वाढ होते. ठिबक सिंचन पद्धतीत कापसाची दररोजची पाण्याची गरज विशिष्ट सूत्राने काढता येते.
ठिबक सिंचन पद्धतीत कापसाची महिनावार लागवडीनुसार त्या त्या महिन्यातील पाण्याची दररोजची गरज महात्मा फुले कृषी विद्यापीठाने काढलेली आहे. राज्यातील इतर भागातील शेतकऱ्यांनी त्यांच्या भागातील बाष्पीभवनाच्या आकडेवारीनुसार ही पाण्याची गरज थोडीफार कमी जास्त करावी.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .