आत्मा मालिक गुरुकुल शैक्षणिक संस्थेत शारदीय नवरात्रोत्सव कार्यक्रम…
भारताची अतिप्राचीन संस्कृती मोहेंजोदडो आणि हडप्पा ही शहरे वास्तूरचना सोबत स्वच्छतेच्या दृष्टीने उपाययोजना असणारी होती.तत्कालीन कालखंडात स्वच्छतेत भारताचे स्थान विश्वगुरु समान होते.सद्यस्थितीत सर्वांचा व्यापक लोकसहभागातून सुरु असलेला भारताचा स्वच्छतेचा प्रवास सकारात्मक असून स्वच्छतेत विश्वगुरुसाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन स्वच्छतादूत व वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांनी केले.
कोपरगांव तालुक्यातील कोकमठाण येथे आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल आणि मिलिटरी सेमी शैक्षणिक संस्थेत शारदीय नवरात्रोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात ६ व्या माळेच्या निमित्ताने स्वच्छता आणि पर्यावरण विशेष कार्यक्रमात स्वच्छतादूत व वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्री. घोडके पुढे म्हणाले,शालेय विद्यार्थ्यांनी अंगिकारलेली वैयक्तिक स्वच्छता कौतुकास्पद असून ओला, सुका, घरगुती घातक, प्लास्टिक कचरा वर्गीकरण आणि त्यांची शास्रोक्त विल्हेवाट यावर व्यापक जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. वृक्षारोपण आणि पर्यावरणाचा समतोल महत्वाचा असल्याचे सांगितले. आत्मा मालिक शैक्षणिक संस्थेत संस्कार, संस्कृती आणि सांस्कृतिकचा सुंदर मिलाफ कार्यक्रमात अनुभवल्याचे सांगत विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेचे कौतुक केले.
शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी,प्राचार्य निरंजन डांगे यांचे मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर विभाग प्रमुख रविंद्र देठे, रमेश कालेकर, सुनील पाटील, नितीन अनाप, गणेश कांबळे उपस्थित होते.
या प्रसंगी अंजू वाघ या विद्यार्थीनीने कात्यायनी देवीची वेशभूषा आणि रंगभूषा केली. तसेच महिषासूरमर्दिनी स्तोत्र,समुह नृत्य, दांडिया सादरीकरण केले.
सुत्रसंचालन राजश्री चाळक, संचिता मेटे, प्रिया जाधव यांनी केले. राज्यगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.