“खरीप पिकातील प्रमुख तणांचे रासायनिक पद्धतीने नियंत्रण “
खरीप हंगामातील ज्वारी बाजरी मका, तूर,मूग,उडीद आणि सोयाबीन पिकात काही विशिष्ट तणांचा प्रादुर्भाव होतो ज्यामुळे पिकाच्या उत्पादनात घट येते. या तणांचे पीक व तणे उगवण्यापूर्वी रासायनिक पद्धतीने खालील प्रमाणे नियंत्रण करावे.
ज्वारी, मका, आणि बाजरी – या पिकातील गवतवर्गीय रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी अट्रॅझीन ५०% डब्लुपी किंवा अलाक्लोर ५०% इसी 80 ग्रॅम /मिली,१० लिटर पाण्यातून फवारावे. ज्वारी पिकातील लव्हाळा, कुंजरू ,दुधनी व रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी २,४ -डी इथाईल ईस्टर ३८% इसी,६०मिली,१० लिटर पाण्यातून पेरणीनंतर २५-३० दिवसांनी फवारावे.
मका पिकातील लव्हाळा गवताच्या नियंत्रणासाठी २,४-डी डायमेथील अमाईन क्षार ५८% इसी, १७ मिली, दहा लिटर पाण्यातून पेरणीनंतर ३०-३५ दिवसांनी फवारावे तर हंगामी गवतवर्गीय व काही रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी डायरॉन ८०% डब्ल्यूपी किंवा टोपरॅमेझोन ३३.६ % एससी,२० ग्रॅम मिली पाण्यातून पेरणीनंतर १८-२५ दिवसांनी फवारावे.
तूर, मूग व उडीद- या पिकातील गवतवर्गीय व रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी अलाक्लोर ५०% इसी किंवा पेंडीमेथॅनील ३०% इसी ८० मिली १० लिटर पाण्यातून पीक पेरणीनंतर, पीक व तणे उगवण्यापूर्वी फवारावे. गवतवर्गीय तणांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी क्यूझ्यालोफॉप इथाईल ५% इसी १५ ते २० मिली १० लिटर पाण्यातून फवारावे.
सोयाबीन – सोयाबीन पिकातील लव्हाळा व काही गवतवर्गीय रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी मेटोल्याक्लोर ५० % इसी किंवा फल्युझीकॉपपी ब्युटील १३.४ % इसी ४० मिली १० ली. पाण्यातून अनुक्रमे पीक व तणे उगवण्यापूर्वी आणि पेरणीनंतर १८ ते २० दिवसांनी फवारावे.
पाखड व चिमणतारा तणाच्या नियंत्रणासाठी क्यूझ्यालोफॉप इथाईल ५% इसी १५ ते २० मिली १० ली पाण्यातून पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी फवारावे.
कुंजरु , केना, माठ, घोळ या तणांच्या नियंत्रणासाठी पेंडीमेथॅनील ३०%+ इमॅझाथॅपर २% इसी (वेलोर -३२,) ५० ते ६० मिली १० लि. पाण्यातून पीक पेरल्यानंतर पीक व तण उगवण्यापूर्वी फवारावे.
केला व पांढरी फुले यांच्या नियंत्रणासाठी अनिलोफॅास 30 % इसी ८० ते १०० मिली १० लिटर पाण्यातून पीक व तणे उगवण्यापूर्वी फवारावे.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .