“कापसासाठी ठिबक सिंचन पध्दतीतून विद्राव्य खत व्यवस्थापन”
कापूस पिकास शिफारस केलेल्या खतांचा कार्यक्षम वापर करण्यासाठी खते जास्तीत जास्त हप्त्यात ठिबक सिंचनातून विद्राव्य स्वरुपात देता येतात. ठिबक सिंचनातून देता येण्यासारखी वेगवेगळ्या प्रमाणात नत्र, स्फुरद व पालाश असलेली विद्राव्य खते बाजारात उपलब्ध आहेत. बागायती संकरीत कापसासाठी शिफारस केलेली नत्र, १०० किलो, स्फुरद, ५० किलो व पालाश, ५० किलो प्रति हेक्टरी मात्रा एकूण ७ हप्त्यात खालीलप्रमाणे विभागून दयावी.
रासायनिक खताचा पहिला व दुसरा हप्ता अनुक्रमे पेरणीच्यावेळी व पेरणीनंतर १० दिवसांनी एकूण शिफारशीत खत मात्रेच्या ५ टक्के म्हणजेच प्रत्येकी ५ किलो नत्र, २.५ किलो स्फुरद व २.५ किलो पालाश प्रति हेक्टरी दयावा.
रासायनिक खताचा दुसरा आणि तिसरा हप्ता पेरणीनंतर अनुक्रमे २० व ३० दिवसांनी एकुण शिफारशीत खताच्या १५ टक्के म्हणजेच प्रत्येकी १५ किलो नत्र, ७.५ किलो स्फुरद व ७.५ किलो पालाश प्रति हेक्टरी दयावा.
रासायनिक खताचा पाचवा, सहावा व सातवा हप्ता पेरणीनंतर अनुक्रमे ४०,५० व ६० दिवसांनी एकुण शिफारशीत खताच्या २० टकके म्हणजे प्रत्येकी २० किलो नत्र, १० किलो स्फुरद व १० किलो पालाश प्रति हेक्टरी दयावा.
बीटी वाणासाठी शिफारशीत खतमात्रेपेक्षा २५ टक्के जास्त रासायनिक खतमात्रा ( १२५ किलो नत्र, ६५ किलो स्फुरद व ६५ किलो पालाश प्रति हेक्टर ) दयावी.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .