पावसाळा लांबवल्यास लागवड करावयाची खरिप पिके
गेल्या काही वर्षात पुर्वीप्रमाणे ७ जूनला महाराष्ट्रात पावसाला सुरवात होतच नाही. उलट साधारणपणे प्रत्येक हंगाम किमान एक महिन्याने पुढे सरकला आहे. म्हणजे शेतकरी बांधवांना आता जुलै महिन्यात खरिप पिकांची लागवड करण्याची सवय लावून घ्यावी लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मागील लेखात म्हंटल्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय शेतकरी बांधवांनी पावसाच्या पाण्यावर घ्यावयाच्या खरिप पिकांची लागवड करु नये आणि दुबार-तिबार पेरणीचे तसेच बियाणे-खतांवरील खर्चाचे होणारे संभाव्य नुकसान टाळावे.
यावर्षीही जूनच्या शेवटच्या आठवडयात पावसाला सुरवात झालेली असली तरी महाराष्ट्राच्या बहुतांश भागात तो पुरेशा प्रमाणात पडलेला नाही. पुरेसा पाऊस पडल्यानंतर नेमकी कोणती पिके घ्यावीत याविषयी शेतकरी बांधवांच्या मनात संभ्रम असतो. जुलै महिन्यात पुरेशा प्रमाणात पाऊस पडला तर बाजरी, भुईमूग, तूर, हूलगा, राळ, एरंडी किंवा सोयाबीन ही पिके घ्यावीत. याशिवाय बाजरी पिकात तुरीचे आंतरपिक घेतल्यास निश्चितचं फायदेशीर ठरते. मात्र मूग-उडीद ही कडधान्याची पिके जुलै महिन्यात घेवू या पिकांची उशिरा पेरणी केल्यास यांच्या उत्पादनात घट येते.
