“जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची लागवड “
जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची खोली कमी-जास्त असल्यामुळे जमिनीच्या खोलीनुसार जमिनीची ओलावा साठवून ठेवण्याची क्षमताही कमी-जास्त असते. भारी काळया जमिनीत उपलब्ध ओलावा १५० मि.मी. मध्यम जमिनीत ४० ते ६० मि.मी., तर हलक्या जमिनीत उपलब्ध ओलावा केवळ १५ ते २० मि.मी.एवढा असतो. खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या निरनिराळ्या पिकांना पाण्याची आवश्यकता कमी जास्त प्रमाणात असते, त्याचप्रमाणे प्रत्येक पिकाची वाढ त्याला योग्य अशा जमिनीतच चांगल्या प्रकारे होत असल्याने जमिनीची खोली म्हणजेच जमिनीचा प्रकार, तसेच त्या जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचे प्रमाण लक्षात घेऊन योग्य त्या पिकांची निवड करणे गरजेचे असते. जमिनीच्या खोलीनुसार त्यातील चिकण मातीचे, सेंद्रिय कर्बाचे, अन्नद्रव्यांचे प्रमाण ठरत असते. अर्थातच भारी काळया जमिनीत या सर्वांचे प्रमाण निश्चितच जास्त असल्याने अशा जमिनीत घेतलेल्या पिकांची वाढ ही चांगली होते. त्याकरिता खरीप हंगामातील जास्त कालावधीच्या पिकांसाठी भारी काळी जमीन निश्चितच योग्य ठरते.
७.५ सें.मी. पेक्षा कमी खोलीच्या जमिनीत उपलब्ध ओलाव्याचे प्रमाण केवळ १५ ते २० मि. मी. असल्याने अशा जमिनी कुठल्याही हंगामी पीक घेण्यासाठी योग्य नसतात. त्यामुळे या जमिनी वेगवेगळ्या प्रकारची गवते, वनशेती किंवा कोरडवाहू फळझाडासाठी निवडाव्यात. ७.५ ते २२.५ सें.मी. दरम्यान खोलीच्या जमिनीत उपलब्ध ओलाव्याचे प्रमाण ३० ते ३५ मि.मी. एवढे असते.
अशा जमिनीत गवत, वनशेती, फळबागांबरोबर सूर्यफूल, बाजरी, तूर यासारखी पिके किंवा बाजरी + हुलगा किंवा मटकी (२:१ ), एरंडी + गवार (१:२), तसेच एरंडी + दोडका मिश्र पिकांसाठी योग्य असते. २२.५ सें.मी. ते ४५ सें.मी. दरम्यान खोलीच्या जमिनीत उपलब्ध ओलाव्याचे प्रमाण ४० ते ६५ मि.मी. एवढे असते. अशा जमिनीत सलग सूर्यफूल, बाजरी, तूर याबरोबरच बाजरी + तूर, सूर्यफूल + तूर, गवार + तूर( २:१), तूर + गवार, एरंडी + गवार(१:२) व एरंडी + दोडका (३:१) यापैकी अंतरपीक पद्धती राबवावी. ४५ ते ६० सें.मी. दरम्यान खोलीच्या म्हणजे भारी काळी कसदार जमिनीत कापूस पिकांची लागवड करावी. अशा जमिनीत कापसाव्यतिरिक्त घेतलेल्या कुठल्याही कमी कालावधीच्या खरीप पिकानंतर खरीपातील उपलब्ध ओलाव्यावर रब्बी हंगामातील ज्वारी, करडई ही पिके घेता येतात सोयाबीन पिकांसाठी मध्यम ते भारी, लालसर, तसेच पोयट्याची जमीन योग्य असते.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .