“बागायती कपाशीसाठी ठिबक”
राज्यात उन्हाळी बागायती कापसाची लागवड एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यांपर्यंत केली जाते. अलीकडे बीटी कापसापासून भरघोस उत्पादन मिळत असल्यामुळे आणि कापसालाही चांगला बाजार भाव मिळत असल्यामुळे कापूस लागवड क्षेत्रातही दरवर्षी वाढ होत आहे. उन्हाळी बागायती कापसाची लागवड ही उन्हाळी हंगामात उपलब्ध असलेल्या पाण्यावर अवलंबून असते आणि ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची उपलब्धता कमी आहे त्यांनी उन्हाळी बागायती कापसासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा.
ठिबक सिंचन संचाचा सुरुवातीचा भांडवली खर्च जास्त असल्याने ही पद्धत आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी कापसाच्या प्रचलित लागवड पद्धतीत बदल करून जोडओळ पद्धतीत कापसाची लागवड करावी. मध्यम जमिनीसाठी शिफारस केलेले प्रचलित पद्धतीत दोन ओळीतील ९० सें.मी. अंतर कमी करून ६० सें.मी. एवढे ठेवावे. असे केल्याने दोन जोड ओळीत १२० सें.मी. एवढे अंतर राखले जाते. प्रत्येक जोड ओळीसाठी एक उपनळी व उपनळीवर दोन झाडांसाठी ९० सें.मी. अंतरावर एक तोटी वापरावी. अशा प्रकारे उपनळयात १८० सें.मी. म्हणजे सहा फूट अंतर राखले जाते. भारी जमिनीत कापसासाठी प्रचलित पद्धतीत शिफारस केलेले १२० सें.मी. अंतर कमी करून ९० सें.मी. ठेवावे. अशा पद्धतीत दोन जोड ओळीत १५० सें.मी. व दोन उपनळयात २४० सें.मी. म्हणजे आठ फूट अंतर राखले जाते. जोड ओळीतील ९० सें.मी. अंतरावरील समोरासमोरील झाडांकरता एकाच तोटीचा वापर करावा.
ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करताना ऑनलाईन प्रकारची उपनळी वापर करायला हरकत नाही. त्यामुळे जोड ओळीतील संपूर्ण पट्टा ओला होतो.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .