“भाजीपाला पिकांसाठी ठिबक सिंचन पद्धत फायदेशीर- भाग १”
भाजीपाल्याला मिळणारा बाजारभाव लक्षात घेता भाजीपाला पिकांना नगदी पिके संबोधने चुकीचे होणार नाही. भाजीपाला पिकास गरजेपेक्षा जास्त अथवा कमी पाणी दिल्यास पिकांच्या वाढीवर आणि पर्यायाने पीक उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. जास्त पाणी दिल्याने पिकांच्या मुळांची वाढ खुंटते, मुळे कुजतात, पाने पिवळी पडतात आणि गळतात, झाडे सुकतात, फळांची व फुलांची मोठ्या प्रमाणात गळ होते तसेच रोग आणि किडींचा प्रादुर्भावही वाढतो. याउलट गरजेपेक्षा कमी पाणी दिले तर पिकांची वाढ खुंटते आणि पिकांपासून उत्पादन कमी मिळते. बहुतेक भाज्यांमध्ये फुले लागणे, फळधारणा न होणे, फळांची वाढ आणि फळे तयार होणे किंवा पिकणे या वाढीच्या विशिष्ट अवस्था पिकास पाणी देण्याच्या दृष्टीने संवेदनक्षम असतात. या संवेदनक्षम अवस्थेत पिकास योग्य प्रमाणात पाणीपुरवठा केला गेला नाही तर उत्पादनात लक्षणीय घट येते. पाणी देण्याच्या प्रचलित पद्धतीत पाण्याचे नियोजन योग्य प्रकारात होईलच असे नाही. मात्र ठिबक सिंचन पद्धतीने भाजीपाला पिकाच्या वाढीच्या संवेदनक्षम अवस्थेनुसार आणि योग्य प्रमाणात पाणी देणे सहज शक्य आहे. ठिबक सिंचन संचाचा सुरुवातीचा भांडवली खर्च जास्त असतो मात्र केंद्र तसेच राज्य शासन ठिबक संचाच्या वापरासाठी अनुदान देत असल्याने भाजीपाल्यासारख्या नगदी पिकांसाठी या पद्धतीचा वापर आर्थिकदृष्ट्या फायद्याचा ठरतो.
भाजीपाला पिकांना पारंपारिक पद्धतीने पाणी देताना जमिनीचे संपूर्ण क्षेत्र भिजवले जाते परंतु ठिबक सिंचन पद्धतीत मात्र पिकाच्या मुळांच्या कार्यक्षेत्रातच पाणी दिले जात असल्याने पाण्याची सुमारे ४० ते ६० टक्के बचत होऊन पिकांची वाढही जोमदार होते आणि पर्यायाने पिकापासून भरघोस उत्पादन मिळते. या पद्धतीत पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी ठराविक क्षेत्रच भिजवले जात असल्याने आंतरमशागतीवरील खर्च कमी होतो, खतात जवळपास २५ टक्के बचत होऊन उत्पादनातही किमान १५ ते २० टक्के वाढ होते तसेच कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी असल्याने उत्पादित मालाची प्रत चांगली मिळते. भाजीपाला पिकांची लागवड प्रामुख्याने सरी-वरंबे, सपाट वाफे, गादीवाफे, रुंद सरी-वरंबे किंवा आळे तयार करून केली जाते. सरी-वरंब्यावर टोमॅटो, मिरची, वांगी, भेंडी, बटाटा, घेवडा, इत्यादी भाज्या घेतात. सपाट वाफ्यामध्ये कमी अंतरावरील भाज्या उदा. कांदा, लसूण, पालेभाज्या, कोबी, फुलकोबी, इत्यादी लावल्या जातात तर आळे किंवा रुंद सरी-वरंब्यावर कारली, दोडकी, दुधीभोपळा, काकडी, वाल या भाज्या आणि टरबूज व खरबूजाची लागवड केली जाते. कमी अंतरावरील भाज्यांकरता सूक्ष्म फवारासिंचन पद्धतीचा तर जास्त अंतरावरील भाज्यांसाठी तोट्यांची अथवा सूक्ष्म नळ्यांची ठिबक सिंचन पद्धत फायदेशीर ठरते.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत