“ठिबक सिंचन पद्धतीचा फळझाडांसाठी करा प्राधान्याने वापर”
फळझाडांची बहुदा कोरडवाहू क्षेत्रात लागवड केली जाते मात्र फळपिकांच्या महत्त्वाच्या अवस्थेत पाणीपुरवठा केल्यास चांगले उत्पादन मिळवता येते. फळझाडांची लागवड जास्त अंतरावर केली जात असल्याने इतर पिकांच्या तुलनेत ठिबक सिंचन पद्धतीचा खर्च कमी येतो. फळझाडांसाठी तोट्या, सूक्ष्मनळ्या तसेच सूक्ष्मतुषार या ठिबक सिंचन पद्धती उपयुक्त आहेत. त्याचप्रमाणे मडका सिंचन हा ही ठिबक सिंचनाचा प्रकार असून तो तुलनेने स्वस्त व किफायतशीर आहे. तोट्यांची ठिबक सिंचन पद्धत फळझाडांसाठी वापरताना झाडाच्या वयाप्रमाणे तोट्यांची संख्या वाढवावी लागते. सुरुवातीला झाड लहान असताना त्याला मुळे कमी असतात तेव्हा केवळ एक तोटी पुरेशी होते. मात्र दुसऱ्या वर्षी दोन तोट्या व झाडांची वाढ पूर्ण झाल्यानंतर चार तोट्या बसवणे आवश्यक असते. झाडाच्या खोडापासून एक ते दीड फूट अंतरावर चारही दिशेस चार तोट्या बसवाव्यात. त्यासाठी दोन तोट्या उपनळीवर बसवाव्यात व राहिलेल्या दोन तोट्या कमी व्यासाच्या नळीने उपनळीला जोडून दोन विरुद्ध दिशेने मांडाव्यात. सूक्ष्म नळ्या किंवा मायक्रोट्यूबचा वापर व मांडणी फळझाडांसाठी अशाच पद्धतीने करावी.
ठिबक सिंचन पद्धतीतील वेगवेगळ्या प्रकारची तुलना करता फळझाडांना तोट्या किंवा सूक्ष्मनळ्यांपेक्षा सूक्ष्मतुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे अधिक फायदेशीर ठरते. सूक्ष्मतुषार सिंचन पद्धतीत वापरण्यात येणाऱ्या लहान फवारा यंत्रास इंग्रजीत “मायक्रोस्प्रिंकलर” असे म्हणतात. सूक्ष्मतुषार पद्धतीतील लहान फवारा यंत्राने दिलेल्या पाण्याने सुमारे दीड ते दोन मिटर क्षेत्र भिजू शकते. म्हणजेच फवाऱ्याचा एकूण व्यास तीन ते चार मीटर एवढा असतो. हा व्यास फळझाडाच्या मुळाच्या संपूर्ण कक्षेत पाणी समप्रमाणात पोहोचण्यासाठी पुरेसा असतो. सूक्ष्मतुषारने फळझाडांना पाणी दिल्याने फळझाडांची मुळे ही झाडाच्या सभोवती समप्रमाणात विस्तारली जातात आणि जमिनीतील ओलावा पुरेशा प्रमाणात शोषून घेऊ शकतात. याउलट सूक्ष्मनळ्या किंवा तोट्यांद्वारे दिलेले पाणी एकाच जागी पडून झाडांची मुळे विशिष्ट भागातच गोळा होतात व मुळांना जमिनीत घट्ट रोवण्याचे क्षेत्र कमी मिळते. त्यामुळे मोठ्या वादळात फळझाडे उन्मळण्याची शक्यता असते.
ठिबक सिंचन पद्धतीस लागणारा खर्च ज्यांना परवडत नाही त्यांनी फळझाडासाठी मडका सिंचन पद्धती अवलंबण्यास हरकत नाही. या पद्धतीत झाडाच्या मुळाच्या कक्षेत सुमारे १५ ते २० सें.मी. खोल, साधारणपणे आठ लिटर क्षमतेचे, झाडाच्या चारही बाजूस प्रत्येकी एक मडके बसवावे. मडक्याचे तोंड जमिनीच्या पृष्ठभागाच्या समपातळीत राहील अशा तऱ्हेने त्याची मांडणी करावी. मडके जमिनीत गाडण्यापूर्वी मडक्याच्या खालील बाजूस छोटेसे छिद्र पाडून त्यात कापडाची चिंधी बसवावी. त्यामुळे मडक्यातून थेंबाथेंबाच्या स्वरूपात पाणी जमिनीत पडेल. सर्वसाधारणपणे संध्याकाळच्या वेळी या मडक्यांमध्ये पाणी भरून फळझाडांची आवश्यक ती गरज भागवता येते. विपरीत परिस्थितीत फळझाडे किमान जगवण्यासाठी मडका सिंचन पद्धत निश्चितच उपयोगी आहे.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत