“ठिबक सिंचन पद्धतीत पाण्याची गरज”
कुठल्याही पिकासाठी ठिबक सिंचन संच बसविल्यानंतर ठिबक सिंचन संचातून पिकास नेमके किती पाणी द्यावे आणि त्यासाठी संच किती वेळ चालवावा याबाबत बरेचसे शेतकरी अनभिज्ञ असतात. त्यामुळे अनेक वेळा शेतकरी प्रचलित पाणी देण्याच्या पद्धतीप्रमाणे भरमसाठ प्रमाणात पाणी देण्यासाठी तासन्तास ठिबक सिंचन संच चालू ठेवतात व दोन पाणी देण्यात अंतरही काही दिवसांचे ठेवतात, असे केल्याने ठिबक सिंचन पद्धतीतील पाण्याच्या बचतीचा उद्देश सफल तर होत नाहीच परंतु मोठ्या प्रमाणात पाणी देऊन पाणी देण्यातील मोठ्या अंतरानंतर जमीन कोरडी असताना खारी, डुक्कर व इतर प्राण्यांकडून संचाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचे प्रकार घडतात. ठिबक सिंचन पद्धतीत पिकाच्या पाण्याच्या गरजेनुसार दररोज अथवा एक दिवसाआड पिकास पाणी देऊन जमीन नेहमी वापसा पद्धतीत ठेवली जाते आणि त्यामुळे गरजेनुसार पाणी मिळाल्यामुळे पिकाची वाढ जोमदार होऊन पीक उत्पादनातही वाढ होते. शेतकऱ्यांना पिकांना ठिबक पद्धतीत नेमके किती पाणी द्यावे हे माहीत नसल्याने हाही उद्देश सफल होत नाही. त्याकरीता शास्त्रीय दृष्टीने ठिबक सिंचन पद्धतीत भाजीपाला पिकाची पाण्याची गरज कशी काढावी हे जाणून घेऊया. भाजीपाला पिकाची दररोजची पाण्याची गरज प्रामुख्याने भाज्यांच्या प्रकारानुसार, हवामानानुसार तसेच पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार बदलते. यासाठी कुठल्याही भाजीपाल्याच्या पिकाची दररोजच्या पाण्याची गरज काढण्यासाठी खालील सूत्रांचा वापर करावा. दररोजची पाण्याची गरज (लि/प्रति दिवस) = दररोजचे बाष्पीभवन (मि.मी.) X बाष्पीभवन पात्र गुणांक (०.७) X पीक गुणांक X दोन उपनळयातील अंतर (मी.) X दोन तोट्यातील अंतर (मी.) X ओलित क्षेत्र गुणांक (०.४) बाष्पीभवन पात्र व प्रत्यक्ष शेतातून होणारे पाण्याचे बाष्पीभवन यात फरक असल्याने बाष्पीभवन पात्र गुणांक जवळपास ०.७ एवढा घेतला जातो. त्याचप्रमाणे पीक वाढीच्या अवस्थेनुसार पीक गुणांकातही बदल होतो. प्रचलित सिंचन पद्धतीत पिकाचे १००% क्षेत्र ओलित होते. भाजीपाल्याच्या पिकाच्या बाबतीत ठिबक सिंचन पद्धतीत हे क्षेत्र ४० टक्के गृहीत धरल्यास ओलीत क्षेत्र गुणांक ०.४ एवढा येतो. पाण्याचे दररोजचे बाष्पीभवन हे दररोजच्या हवामानातील बदलांवर अवलंबून असते. दररोजच्या बाष्पीभवनाची माहिती उपलब्ध नसल्यास जवळच्या हवामान केंद्राच्या मागील १० ते १५ वर्षाच्या सरासरी आकडेवारीवरून प्रत्येक आठवड्याची अथवा महिन्याची सरासरी आकडेवारी गृहीत धरावी. त्याचप्रमाणे पावसाळी हवामानात दररोजचे सरासरी बाष्पीभवन ६ ते ७ मि.मी., हिवाळी हंगामात ४ ते ५ मि.मी. आणि उन्हाळी हंगामात १० ते १२ मि.मी. एवढे असते. त्यानुसार साधारणपणे ७ मि.मी. सरासरी बाष्पीभवन लक्षात घेऊन काकडी पिकाची दररोजची पाण्याची गरज खालील प्रमाणे काढता येईल. दररोजचे बाष्पीभवन- ७ मि.मी., पात्र गुणांक- ०.७, पीक गुणांक-१.०, दोन उपनळयातील अंतर- ३ मी., दोन तोट्यातील अंतर- ०.५ मी., ओलीत क्षेत्र गुणांक- ०.४
काकडी पिकाची पाण्याची दररोजची गरज (लि/दिवस) = ७ X ०.७ X १.० X ३ X ०.५० X ०.४० = २.९४
संच चालविण्याचा कालावधी – पिकाची प्रत्येक दिवसाची पाण्याची गरज काढल्यानंतर ती गरज भागवण्याकरता सिंचन संच नेमका किती वेळ चालवावा हे खालील सूत्रावरून काढता येते.
ठिबक संच चालवण्याचा कालावधी (तास) = दिवसाआड एकूण पाण्याची गरज/तोटीचा प्रवाह प्रति तास X २ = ०.७४ तास
काकडी पिकासाठी पावसाळी हंगामात पाऊसमान विचारात घेऊन फक्त ४५ मिनिटे ठिबक सिंचन संच एक दिवसाआड चालवावा.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत