“पिकांना पाणी देण्याच्या प्रवाही पद्धती”
पिकांना पाणी देण्याच्या पद्धतीत प्रचलित प्रवाही पद्धत आणि ठिबक, तुषार व रेनगन यासारख्या आधुनिक सिंचन पद्धतीचा समावेश होतो. पिकांना पाणी देण्याच्या प्रवाहित पद्धतीत पिकासाठी योग्य रानबांधणी करण्याचा समावेश होतो. रब्बी हंगामात घ्यावयाच्या बागायती पिकांना योग्य प्रमाणात पाणी देण्यासाठी तसेच दिलेल्या पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी योग्य रानबांधणी करणे गरजेचे असते. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी रानबांधणी करत नाहीत असे नाही परंतु जमिनीचा प्रकार, खोली, उतार तसेच विशिष्ट रानबांधणीच्या प्रकारात पाण्याचा प्रवाह नेमका किती असावा, पिकासाठी पाणी देण्याकरता योग्य रानबांधणीची निवड करताना या बाबींचा विचार करणे गरजेचे असते. जमिनीची नेमकी कोणत्या पद्धतीत रानबांधणी करावी यासाठी त्या जमिनीचा उतार ०.६ टक्के असल्यास रब्बी पिकासाठी सारे पद्धतीचा आणि जमिनीचा उतार ०.६ ते १ टक्का असल्यास वाफे पद्धतीचा पिकास पाणी देण्यासाठी अवलंब करावा. याव्यतिरिक्त पिकाच्या प्रकारानुसार रानबांधणीच्या वेगवेगळ्या प्रकारात सरी-वरंबा पध्दत व समपातळीत सारे अथवा सरी पद्धतीचा समावेश होतो.
सारे पद्धतः ज्या ठिकाणी जमिनीला ०.२ ते ०.३ टक्के उतार असेल त्या ठिकाणी पिकास पाणी देण्यासाठी सारे पद्धतीचा अवलंब करावा. त्यासाठी उताराच्या बाजूने ३ मीटर रुंदीचे सारे पाडून साऱ्याच्या दोन्ही बाजूस सुमारे २२ सेंटीमीटर उंचीचे वरंबे तयार करावेत. जमिनीच्या प्रकारानुसार साऱ्यांची लांबी हलक्या जमिनीत ५० ते ६० मीटर, मध्यम जमिनीत ७० ते ८० मीटर व भारी जमिनीत ९० ते १०० मीटर एवढी ठेवावी. जमिनीच्या उतारानुसार जमिनीस ०.२ टक्के एवढा उतार असल्यास प्रति सेकंद ६ लिटर तर ०.३ टक्के उतार असल्यास प्रति सेकंद ९ लिटर असा पाण्याचा प्रवाह साऱ्यात सोडावा. सारा पद्धत ही रब्बी हंगामातील कमी अंतरावरची गहू, ज्वारी, हरभरा, चारा पिके, इत्यादी पिकांसाठी योग्य अशी रानबांधणीची पद्धत आहे.
वाफे पद्धतः जमिनीला जास्त प्रमाणात उतार असेल किंवा उंच सखलपणा मोठ्या प्रमाणात असेल किंवा जमिनीला एकसारखा उतार नसेल अशावेळी सारे पद्धत न वापरता पिकास पाणी देण्यासाठी शेतात वाफे तयार करावेत. वाफे साधारणपणे १० x ४.५ मीटर आकारमानाचे असावेत. वेगवेगळ्या पिकांसाठी निरनिराळ्या पद्धतीत गादीवाफे किंवा आळे पद्धतीचा अवलंब करावा. गादीवाफे पद्धत प्रामुख्याने भाजीपाला पिकांची रोपे तयार करण्यासाठी वापरली जाते. त्याचप्रमाणे रुंद गादीवाफ्यांचा वापर रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या भुईमुगाच्या पिकासाठी इक्रिसॅट पद्धतीत केला जातो. आळे पद्धत वेलवर्गीय भाजीपाल्याच्या पिकांसाठी तसेच सर्व प्रकारच्या फळझाडांसाठी वापरली जाते. सारे पद्धतीच्या तुलनेत वाफे पद्धतीत जास्त जमीन वरंब्याखाली वाया जाते आणि रानबांधणीवरचा खर्चही तुलनेत जास्त येतो. जमिनीला आडवा उतार जास्त असेल तर रुंदीच्या दिशेने वाफे सपाट करावेत. वाफ्यास पाणी देताना पाण्याचा प्रवाह प्रति सेकंद ६ लिटर एवढा ठेवावा.
सरी-वरंबा पद्धतः सरी-वरंबा पद्धत रब्बी हंगामातील भाजीपाला, फुलझाडे, हरभरा तसेच पूर्व हंगामी उसासाठी उपयुक्त असून जमिनीच्या प्रकारानुसार आणि पिकातील अंतरानुसार स-यांची रुंदी ७५ ते ९० सेंटीमीटर ठेवून उंची मात्र जास्तीत जास्त ३० सेंटिमीटर ठेवावी. ०.१५ ते ०.२० टक्के उताराच्या जमिनीत उताराच्या दिशेने १०० मीटरपर्यंत स-यांची लांबी ठेवावी. प्रति सेकंद २ लिटर प्रवाहाने सऱ्यांमध्ये प्रत्येक पाण्याच्या पाळीत ८ ते १० सेंटिमीटर उंचीचे पाणी सोडावे. या प्रकारची रानबांधणी जी पिके दोन किंवा जास्त हंगामात वाढतात आणि पक्व होतात अशा पिकांसाठी जास्त फायदेशीर असल्याची आढळून आली आहे.
समपातळीत सारे अथवा सरी पद्धतः ज्या जमिनीला उभा आडवा उतार जास्त असतो तेथे या पद्धतीचा उपयोग करता येतो. समपातळीवरील बिंदू जोडून सारे किंवा सरी तयार केल्यास पाण्याला पुढे नेण्यासाठी ढाळ मिळत नाही म्हणून या साऱ्यांना ०.४ टक्के ढाळ दिल्यास पाणी देणे सोपे जाते. यासाठी पीक पेरताना पिकाबरोबर १० ते १५ मीटर अंतरावर, वरंब्यावर सुबाभूळ लावावी म्हणजे दरवर्षी संपातळीवरील बिंदू शोधण्याची तसेच त्याला ०.४ टक्के ढाळ देण्याची गरज पडणार नाही. दरवर्षी पिकानुसार सुबाभूळच्या ओळींना संमातर सारे किंवा सरी तयार कराव्यात. सुबाभळीची उंची जास्त वाढल्यास जमिनीपासून ६० सेंटिमीटरवर सुबाभूळ छाटून ती त्याच जमिनीत टाकल्यास त्याचा सेंद्रिय खत म्हणून चांगला फायदा होतो.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .