आरोग्य सेवेचे वास्तव
पुणतांबा ग्रामीण रुग्णालय देत आहे ,अनेक समस्याना तोंड
राहाता तालुक्यातील पुणतांबा गावाला व परिसराला आरोग्य सेवा पुरविणारी सरकारी संस्था म्हणजे “पुणतांबा ग्रामीण रुग्णालय “याठिकाणी दिवसाकाठी पस्तीस चाळीस रुग्ण येतात. यातील आठ दहा रुग्ण हे काही तास दाखल होणारे असतात.किंवा त्यांना उपचारासाठी इथे दाखल करून घ्यावे लागते. सोमवारी याच रुग्णालयात बाह्य रुग्ण संख्या ही सुमारे सव्वाशे ते दीडशे इतकी असते. ही संपूर्ण आरोग्य सेवा इथे शेलार नावाच्या एक महिला डॉक्टर दोन नर्स व इतर चार पाच कर्मचारी देत आहे.
वास्तव काय आहे ?
डॉक्टर शेलार या एम बी बी एस ,डी जी.ओ आहेत. त्यांच्या या उर्जेचा इथे उपयोग करून घेतला जात नाही. कारण इथे शस्त्रक्रिया करण्यासाठी पुरेसी साधन सामुग्री नाही. याशिवाय अनेक निर्बंध हेही आरोग्य सेवेतील अडथळे आहेत. आज मितीला या एकट्याच महिला डॉक्टर 24 तास सेवा देत आहे. इथे एक्सरे मशीन आहे ,पण तंत्रज्ञ आठवड्यातून एक दिवस उपलब्ध आहे. रक्त ,लघवी तपासणीस उपलब्ध आहे. या सोबत महा लॅबच्या माध्यमातून दिवसाला आठ दहा रुग्णांच्या महागड्या रक्त तपासण्या या मोफत केल्या जातात. यासोबत एड्स बाबत जागरूकता , समुपदेशन हे सुरू असते. इथे आरो आहे. पण त्याला जोडणी करून वापरायचे म्हटले तर बोरवेलचे क्षारयुक्त पाण्यात ते टिकत नाही.या परिसराला ग्रामपंचायतीची नळ जोड हि अनेक दिवसापासून बंद आहे.ग्रामपंचायतीने ती पूर्ववत करून दिल्यास इथे निवासाला असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल.
इमारतीची अवस्था काय आहे ?

पुणतांबा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीतील स्वच्छता गृहाची अवस्था वाईट झालेली आहे. पाण्याअभावी एक वार्ड बंद करून ठेवावा लागत आहे. त्याच कारणांनी इथले स्वच्छता गृहाच्या फारशा फुटलेल्या आहेत . दरवाजे खराब झाले आहे. रुग्णालय प्रशासनाने कोपरगाव सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा पत्रव्यवहार केलेला आहे. असे असूनही या डोळे झाकून बसलेल्या विभागाला जाग येत नाहीय.वास्तविक पाहता सरकारी इमारतीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हे या विभागाने करून देणे अपेक्षित आहे. याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते हे समाजाभिमुख असावे लागतील. टेबलवर बसून ठेकेदारांना साथ देणारे या बाबत कसे गंभीर असतील हा अनुत्तरित प्रश्न आहे.

रुग्णालयाला वार्षिक किती पैसे येतात
प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाला सरासरी रुग्ण कल्याण समितीला १ लाख,वार्षिक देखभाल दुरुस्ती १ लाख , अबाधित निधी १० ते वीस हजार असा निधीची उपलब्धता करून दिली जाते.हा सर्व निधी हा तुंटपुजा आहे.किंवा अनेकदा हा निधी खर्च करताना अनेक लालफिती लिगाडे अडथळा निर्माण होतात. परिणामी उपलब्ध निधीचा उपयोग हा योग्य होणे कठीण होते असा मत प्रवाह या प्रशासनात काम करणाऱ्याचा आहे.
काय अपेक्षित आहे ?
आरोग्य सेवा म्हटलं कि , आजार कुणाला पूर्वसूचना देऊ येणार नाही.तेव्हा पुरेसा कर्मचारी वर्ग , रुग्णालय तिथे चोवीस तास वैद्यकीय अधिकारी असणे अपेक्षित आहे. पण एक मेडिकल ऑफिसर दिवसातील किती तास काम करू शकतो याचा विचार या मंत्रालयाच्या मुख्य सचिवांनी केला पाहिजे. महिन्याभरातुन एखादे वेळेला जिल्हा शल्य चिकित्सकाची रुग्णालयाला भेट देण्याने इथल्या अडचणी सुटायला मदत होईल. एकीकडे शिक्षित बेरोजगार वाढत आहे. तर दुसरीकडे कर्मचारी तुटवड्याचं ग्रहण सरकारी यंत्रणेला लागलेलं आहे. हा विरोधाभास सामान्य नागरिकाला वेठीस धरणारा आहे.