“रब्बी पिकांची काढणी”
रब्बी हंगामातील पिके व्यवस्थापनास चांगला प्रतिसाद देतात कारण रब्बी हंगामातील हवामान पीक वाढीसाठी अनुकूल असते. त्यामुळे व्यवस्थापनाचे इतर घटक योग्य वेळी, योग्य प्रमाणात अवलंबले गेले तर कुठल्याही पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळविणे सहज शक्य होते. मात्र अलिकडच्या काळात हवामान बदलामुळे थंडीत सातत्य नसणे किंवा अवकाळी पडणारा पाऊस यामुळे रब्बी पिकांचेही अपेक्षित उत्पादन मिळविणे अवघड होत चालले आहे. रब्बी पिकांची काढणी योग्य वेळी, योग्य प्रकारे करणे गरजेचे असते जेणेकरुन महद्प्रयासाने जोपासलेल्या पिकांचे अपेक्षित उत्पादन पदरात पडण्यास मदत होते.
रब्बी ज्वारीचे पीक जातीपरत्वे ११० ते १३० दिवसात काढणीस तयार होते. ज्वारी काढणीच्या वेळी कणसातील दाणे टणक होतात.दाणे खाऊन बघितल्यास प्रथम फुटताना टच आवाज येतो आणि ज्वारी पिठाळ लागते. त्याचप्रमाणे ज्वारीचे बारकाईने निरिक्षण केल्यास दाण्याच्या टोकाकडील भागाजवळ काळा ठिपका आढळून येतो. ही लक्षणे दिसताच ज्वारीची काढणी करावी. ज्वारी काढणीनंतर ८ ते १० दिवस कणसे उन्हात वाळवून मळणी करावी. धान्य उफणणी करुन तयार झाल्यानंतरच त्याला पुन्हा साठवणुकीपुर्वी उन्हात वाळवावे.
साधारणपणे १३० ते १३५ दिवसात करडईचे पीक पक्व होते. पाने व बोंडे पिवळी पडतात. पिकाची काढणी सकाळी लवकर करावी. हवेत आर्द्रता जास्त असल्याने दाणे गळत नाहीत व हाताला काटे टोचत नाहीत. कापणीनंतर झाडांची कडपे रचून पेठे करावीत. ते पुर्ण वाळल्यानंतर काठीने बडवून काढावेत व नंतर उफणणी करुन बी स्वच्छ करावे. करडई काढणीसाठी एकत्रित काढणी व मळणी यंत्राचा प्राधान्याने वापर करुन खर्च व वेळ वाचवता येतो.
हरभरा पीक ११० ते १२० दिवसांमध्ये तयार होते. पीक ओलसर असताना काढणी करु नये. घाटे कडक वाळल्यानंतर मगच हरभरा पिकाची काढणी करुन मळणी करावी. यानंतर धान्यास ५-६ दिवस कडक उन दयावे. हरभरा कोठीमध्ये साठवून ठेवावा. त्यामध्ये कडुलिंबाचा पाला घालावा त्यामुळे साठवणूकीत कीड लागत नाही.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .