“पाणी मोजण्याची साधने”
पीक उत्पादनात जमीन, सेंद्रीय खते, रासायनिक खताच्या वापराबरोबर पाण्याचा योग्य पद्धतीने तसेच योग्य प्रमाणात वापर करणे गरजेचे असते. यासाठी पाणी मोजण्याच्या विविध पद्धती आहेत.
बागायती क्षेत्रात भारी काळया जमिनीत घेतलेल्या पिकांसाठी पाण्याचा अतिरिक्त वापर केला गेल्याने जमिनी खारवट किंवा क्षारपट बनल्याचे दिसून येत आहे. पाण्याचा अतिरिक्त वापर पिकांसाठीही फायदेशीर नसून उलट अशा जास्तीच्या दिलेल्या पाण्याने जोपर्यंत जमिनी वाफशावर येत नाही तोपर्यंत त्या जमिनीतून पीक पाणी शोषून घेऊ शकत नाही आणि त्यामुळे पिकाला अन्नद्रव्यांची ही उपलब्धता होऊ शकत नाही. एकंदरीत बागायती पिकांनाही तेवढ्या विशिष्ट काळासाठी उपासमारीला तोंड द्यावे लागते. पिकांना जमिनीच्या प्रकारानुसार योग्य मात्रेत पाणी दिले गेल्यास निश्चितच पिकांची चांगली वाढ होऊन अपेक्षित उत्पादन मिळण्यास मदत होते. पिकाला योग्य मात्रेत म्हणजे विशिष्ट उंचीचे पाणी देण्यासाठी पाण्याचे मोजमाप होणे आवश्यक असते. पाणी जेव्हा शेतचारीतून किंवा पाईपद्वारे वाहते त्यावेळी पाण्याचा ताशी प्रवाह, आकारमान व वेळ यावरून ठरवतात. उदा. घनमीटर प्रति सेकंद किंवा लिटर प्रति सेकंद, लाभक्षेत्रात घनफूट प्रति सेकंद म्हणजे क्युसेक हे परिमाण प्रचलित आहे. एक क्युसेक म्हणजे सुमारे २८ लिटर प्रति सेकंद प्रवाह होय.
पाईप द्वारे पाणी मोजण्याच्या पद्धतीः १. हौदाच्या सहाय्यानेः पाईपातील पाण्याचा प्रवाह मोजण्याकरिता सोपी पद्धत म्हणजे हौदाच्या साह्याने पाणी मोजणे. त्यासाठी पाण्याने हौद भरण्यास लागणाऱ्या वेळेची नोंद करावी लागते. हौदाची लांबी, रुंदी व खोली यावरून हौदाचे आकारमान काढावे. हौदाच्या आकारमानावरून त्यात किती लिटर पाणी बसते हे काढता येते. आकारमान व वेळ यावरून पाण्याचा प्रति सेकंद प्रवाह विशिष्ट सूत्राने काढता येतो. ज्यांच्याकडे हौद नसेल त्यांनी तेलाचे साधारण २०० लिटर क्षमतेचे बॅरल वापरले तरीही पाण्याचा प्रवाह मोजणे शक्य होते.
२. पाईपद्वारे वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह मोजमापः पंपास जोडलेल्या पाईपद्वारे वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह विशिष्ट सूत्राच्या साह्याने काढता येतो.
३. जलमापक यंत्र (वॉटर मीटर) च्या साह्यानेः पाईपमधून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह या जलमापक यंत्राने मोजता येतो. त्यासाठी हे यंत्र ब”पाईपास जोडावे लागते. या यंत्रावर एक तबकडी असून त्यावर निर्देशक काटा असतो. हा काटा पाईपमधून किती पाणी वाहते त्याची आकडेवारी दर्शवितो. पाटाद्वारे अथवा चारीद्वारे वाहणाऱ्या पाण्याचे मोजमाप विशिष्ट आकाराच्या खाचांद्वारे उघड्या पाटातून अथवा चारीतून वाहणारे पाणी कायम वाहत राहिल्यास या खाचेवर विशिष्ट ठिकाणी वाहणाऱ्या पाण्याची उंची मोजली जाते. या उंचीचा उपयोग करून खाचांसाठी तयार केलेल्या विशिष्ट सूत्राने पाण्याचा प्रवाह मोजला जातो. या खाचा लोखंडाच्या बनविलेल्या असून त्रिकोणी किंवा चौकोनी आकाराच्या असतात.
१. त्रिकोणी खाचः या खाचेतील दोन्ही बाजूमधील कोण ९० अंशाचा असल्यामुळे या खाचेला “९० अंश व्ही नॅाच” असे म्हणतात. या खाचेने लहानातला लहान प्रवाह विशिष्ट सूत्राने मोजता येतो.
२. समलंब चौकोनी खाचः या खाचेच्या बाजूंना १ः४ (१ आडवा, ४ उभा) उतार असतो. या खाचेतून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह विशिष्ट सूत्राने काढतात.
३. पार्शल फ्लूमः पार्शल फ्लूम तीन भागात मोडते.
अ. प्रवाह वाहिनीचा संकुचित भाग
ब. घळ भाग अथवा गळ्याचा भाग
क. विस्तारित भाग. प्रवाह वाहिनीमधून पाणी वाहत असताना त्या पाण्याची उंची व घळ भागाची रुंदी मोजणे गरजेचे असते. त्यानंतर प्रवाहात प्रवाहात पाणी पडत असते तेव्हा पाण्याची उंची घेणे आवश्यक असते.
पार्शल फ्लूमचे माप तिच्या गळ्याच्या भागाची रुंदी किती आहे यावर अवलंबून असते. पार्शल फ्लूमने १ ते १०० क्यूसेक्सचा प्रवाह मोजता येतो.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत