महाराष्ट्रातील विदर्भ, खानदेश, मराठवाड्याचा काही भाग आणि सोलापूर जिल्ह्यात उन्हाळी हंगामात ४५ ते ४७ अंश सेंटीग्रेड तापमान आता नित्याचे झाले आहे. हा भाग संपूर्णतः बागायती नसला तरी पाण्याच्या उपलब्धतेनुसार काही क्षेत्रात उन्हाळी पिके घेतली जातात. राज्याच्या इतर भागातही रब्बी हंगामाच्या शेवटी धरणातील तसेच स्वतःच्या शेतातील विहिरीमधील शिल्लक पाण्याचा अंदाज घेऊन उन्हाळी हंगामात शेतकरी पिकाची पेरणी करतात. मात्र त्यानंतर उन्हाळी हंगामातील जास्तीच्या तापमानामुळे किंवा पाण्याचा इतरत्र वापर केला गेल्याने पिकासाठी पाण्याची उपलब्धता फारच कमी होते. अशा परिस्थितीत घेतलेली पिके कशी वाचवावीत, त्यांची जपणूक कशी करावी अशी संभ्रमावस्था निर्माण होते. त्यासाठी पुढील उपाययोजना करून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षमतेचा वापर करता करावा व उन्हाळी पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळवावे.
प्रत्येक पिकाच्या वाढीच्या काही महत्त्वाच्या अवस्था असतात. अशा संवेदनक्षम अवस्थेत पिकास पाणी दिले गेले नाही तर उत्पादनात घट येते. कुठल्याही पिकाचा फुलोरा ते दाणे भरण्याचा काळ हा पाण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो म्हणून उन्हाळी हंगामात उपलब्ध असलेले पाणी पिकाच्या संवेदनक्षम अवस्थेत द्यावे.
उन्हाळी हंगामात जास्तीच्या तापमानामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते. जमिनीच्या पृष्ठभागावरून बाष्पीभवन होऊन वाया जाणारे पाणी आच्छादनाचा वापर करून थोपवता येते. कोणत्याही प्रकारचे आच्छादन हेक्टरी ५ टन या प्रमाणात पीक ३ ते ४ आठवड्याचे झाले असताना शेतात टाकावे.
पाण्याचा अंदाज घेऊन उन्हाळी हंगामात पिकाची लागवड केल्यानंतर पाण्याचा इतरत्र वापर केल्यामुळे अथवा अन्य काही कारणांमुळे पिकासाठी पाण्याची उपलब्धता अत्यल्प असते. अशावेळी पिकाची एका आड एक सरी भिजवावी. दुसऱ्या पाण्याच्या वेळी पहिल्यांदा जी सरी भिजवली नसेल ती भिजवावी. असे केल्याने पाण्यात ३० ते ४० टक्के बचत होते तसेच उन्हाळी हंगामात आपले पिकही वाचवता येते.
कुठलेही पीक स्वतःच्या जडणघडणीसाठी जमिनीतून शोषून घेतलेल्या एकूण पाण्यापैकी केवळ १ ते २ टक्केच पाणी वापरत असते. उर्वरित ९८ ते ९९ टक्के पाणी पीक पानांच्या माध्यमातून वातावरणातील तापमान नियंत्रित करण्यासाठी वातावरणात सोडत असते. उन्हाळी हंगामात वातावरण उष्ण असते. तापमान नियंत्रित करण्यासाठी पानांद्वारे बाष्पनिष्कासनही मोठ्या प्रमाणात होते. मात्र उन्हाळी हंगामात पाण्याचा तुटवडा असल्यामुळे पिकास पाण्याची उपलब्धता कमी असते. अशावेळी पिकाच्या शेंड्याकडील नवी पाने ठेवून खालच्या बाजूची पाने काढून टाकावीत.
पानांद्वारे होणारे बाष्पनिष्कासन कमी करण्यासाठी केओलीन (चुन्याची भुकटी) चे द्रावण ८ टक्के (१० लिटर पाण्यात ८०० ग्रॅम) या प्रमाणात पानांवर फवारावे. केओलीनच्या पांढऱ्या रंगामुळे सूर्यकिरण परावर्तित होतात. पानांची उष्णता कमी होऊन बाष्पनिष्कासनाचे प्रमाणही कमी होते.
उन्हाळ्यातील उष्ण वाऱ्यामुळे पीक कोमेजून जाते व पीक उत्पादनात घट येते. त्यासाठी पिकाच्या कडेने वाऱ्याच्या दिशेने आडवे असे दुसरे आडोसा देणारे पीक दाट लावावे. शेवरी, धैंच्या यासारखी पिके २ ते ३ ओळीत लावल्यास चांगला आडोसा होतो.
उन्हाळी हंगामात पिकास सकाळी किंवा दुपारी पाणी दिले तर वाढत्या उन्हाच्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन लवकर होते. त्यामुळे पिकास जास्त प्रमाणात पाणी द्यावे लागते. त्याकरीता शक्यतो पिकास सायंकाळी पाणी द्यावे. सायंकाळी पाणी दिल्याने थंड होणाऱ्या तापमानामुळे पाण्याचा अपव्यय टाळता येतो. उष्णतामान कमी असल्यामुळे पाणी पुरेशा प्रमाणात जमिनीत मुरते आणि जमिनीतून पिकास पाण्याची उपलब्धता योग्य प्रमाणात होते.
शेतातील चारीत सततच्या ओलाव्यामुळे तणांची वाढ झालेली असते. चारीतून सोडलेल्या पाण्याचा बराचसा भाग ही तणे शोषून घेतात. त्याचप्रमाणे चारीतून वाहणाऱ्या पाण्यास तणांमुळे अडथळा निर्माण होतो. तणांबरोबरच चारीत पडलेल्या भेगा तसेच उंदराच्या बिळांमुळेही पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होतो. त्याकरीता ठराविक कालावधीनंतर चारीची स्वच्छता करणे तसेच भेगा व बिळे बुजवणे गरजेचे असते.
उन्हाळी हंगामात पाण्याचा तुटवडा लक्षात घेता प्रचलित पाणी देण्याच्या पद्धती ऐवजी पिकास ठिबक, तुषार किंवा रेनगनसारख्या आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर केल्यास उपलब्ध पाण्याचा कार्यक्षमरीत्या वापर करणे शक्य होते. त्यासाठी ज्यांना शक्य असेल अशा शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात घेतलेल्या पिकांसाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा प्राधान्याने वापर करावा.
अशाप्रकारे वरील सर्व मुद्दे विचारात घेऊन शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील पिकांसाठी योग्य त्या प्रकारे पाण्याचे नियोजन करून पिकाची जपणूक करावी.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत