“पीक उत्पादनवाढीच्या दृष्टिकोनातून जमीन आणि पाण्याचे महत्व”
पीक उत्पादनात जमीन आणि पाणी या दोन घटकांना अतिशय महत्त्व आहे. पीक हे जमिनीत वाढत असल्याने पीक वाढीचे जमीन हे मूलभूत माध्यम आहे. पिकांची मुळे जमिनीत विस्तार पावतात, जमिनीत खोलवर जाऊन घट्ट राहतात आणि झाडांना आधार देतात तसेच जमिनीतील पाणी व त्यात विरघळलेली अन्नद्रव्ये शोषण करून पिकास पुरवतात त्यामुळे पीक जोमाने वाढते व त्यापासून अधिक उत्पादन मिळते.
वनस्पतीच्या किंवा पिकाच्या सर्व शारीरिक क्रिया केवळ पाण्यामुळेच घडू शकतात. झाडांच्या पेशीमध्ये ९५% पेक्षा जास्त पाणीच असते. याचाच अर्थ असा की जमिनीत जर पाणी नसेल किंवा पुरेसा ओलावा उपलब्ध नसेल तर पिकांना जगणेच अशक्य होईल म्हणूनच पीक उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जमिनीबरोबरच पाण्यालाही अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
जमिनीवरील पिकांची वाढ ही प्रामुख्याने जमिनीखालील मुळांच्या वाढीवर अवलंबून असते. मुळे ही सजीव असल्याकारणाने पिकवाढीच्या काळात ती पाणी शोषून घेत असतानाच श्वसनही करत असतात मात्र त्यासाठी जमिनीत पाणी व हवा यांचे योग्य संतुलन असणे आवश्यक असते. जमिनीतील हवा व पाण्याचा समतोल जमीन वापशाला असताना योग्य तऱ्हेने साधला जातो. त्यावेळी पिकाची वाढ चांगली होते. पिकास योग्य प्रमाणात पाणी मिळते. जमिनीत पाणी भरपूर प्रमाणात असेल परंतु पिकास ते शोषून घेता येत नसेल तर पिकाची पाने पिवळी पडतात व त्यांची वाढ खुंटते उदा. पाऊस पडून गेल्यानंतर ठीकठिकाणी पाणी साठते, त्या ठिकाणी पीक असेल तर पिकास पाणी उपलब्ध होत नाही. याउलट जमिनीत पाणी कमी राहिले तर केवळ हवा जास्त प्रमाणात होते व पिकास पाण्याची कमतरता भासते, पाने कोमेजू लागतात.
जमिनीची खोली हाही पीक उत्पादनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक आहे. जमिनीची खोली जेवढी अधिक तितक्याच जास्त प्रमाणात पिकांना पाणी व अन्नद्रव्ये पुरवली जातात, त्यामुळे उथळ व कमी खोलीच्या जमिनीत पिकांची वाढ कमी होते व उत्पादनही मर्यादित मिळते. ज्या जमिनी कमी खोलीच्या किंवा उथळ असतात, ज्यांची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी असते, अशा जमिनींना वारंवार कमी मात्रेत पाणी द्यावे लागते. ज्या जमिनी खोल असतात व पाण्याचा साठा ज्या जमिनीत बराच काळ राहू शकतो अशा जमिनींना पाणी उशिरा दिले तरी चालते. एकंदरीत बागायती पिकांसाठी जमिनीची निवड करताना जमिनीची खोली तसेच जलधारणाशक्तीचा विचार करणे गरजेचे असते कारण त्याचा संबंध पुढे पीक वाढीशी, पर्यायाने पीक उत्पादनाशी असतो
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहे.