“ठिबक व तुषार संचातील अडचणी व उपाय”
भविष्यातील शेतीसाठी पाण्याची उपलब्धता लक्षात घेता पिकांसाठी ठिबक व तुषार सिंचन पद्धतींचा वापर करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, त्यामुळे यापुढेही पिकांना पाणी देण्याच्या आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर वाढत जाणार आहे मात्र तांत्रिक ज्ञानाच्या अभावामुळे या पद्धती वापरताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात आणि या अडचणी सोडवता आल्या नाहीत तर कित्येक वेळा शेतकरी संच वापरणे बंद करतात. ठिबक सिंचनः
गाळण यंत्रणा हे ठिबक सिंचन संचाचे हृदय आहे असे म्हटले तर फारसे चुकीचे होणार नाही कारण वाळूची तसेच धातूची गाळण टाकीमधून गाळून जाणारे पाणी कोणत्या प्रतीचे आहे यावरून ठिबक सिंचन संचाची कार्यक्षमता ठरते. ठिबक संचातून खारवट पाण्याचा वापर, अयोग्य पद्धतीने व असंतुलित प्रमाणात खताची मात्रा दिल्याने तसेच पाण्यात काडीकचरा व शेवाळे असणे व गाळण यंत्रणा सक्षम नसल्याने ठिबक संचातील तोट्या अंशतः किंवा पूर्णतः बंद पडू शकतात. यावर क्लोरीन व आम्ल प्रक्रिया करून संच पुन्हा कार्यरत करता येतो परंतु या प्रक्रिया वारंवार कराव्या लागू नयेत म्हणून खालील प्रमाणे खबरदारी घ्यावी.
एक गोष्ट मात्र या ठिकाणी लक्षात घ्यावी ती म्हणजे कुठल्याही परिस्थितीत गाळण यंत्रणा ते उपनळीवरील शेवटची तोटी यामध्ये पाण्याच्या प्रवाहाचे पतन १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.
ठिबक सिंचन संचाची गाळण यंत्रणा नेहमी स्वच्छ व कार्यक्षम ठेवावी, शक्यतो दररोज संच सुरू करताना गाळण यंत्रणा स्वच्छ करावी.
खते देण्याची यंत्रणा, दाबमापक यंत्र, पाणी मोजण्याचे मीटर आणि मुख्य पंप नियमित तपासावेत.
# महिन्यातून एकदा ठिबकच्या तोट्या साफ कराव्यात.
उपनळयांची शेवटची तोंडे एकदा उघडून पाणी जास्त दाबाने सोडावे म्हणजे उपनळया व तोट्या स्वच्छ होतील. # शिफारस केलेली रसायने व खतेच ठिबक संचाद्वारे द्यावीत.
हंगाम संपल्यानंतर ठिबक सिंचन संच पुन्हा उपयोगात आणण्यापूर्वी त्यास जरुरीनुसार आम्ल व क्लोरीन प्रक्रिया करावी मात्र या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संच पाण्याने स्वच्छ करावा.
स्प्रिंकलर व्यवस्थित फिरत नसल्यासः
दाब निर्मिती योग्य प्रमाणात नसेल, त्यासाठी स्प्रिंकलर नोझल तपासावे, त्यामध्ये काही अडकले असल्यास लाकडी काडीने साफ करावे.
स्प्रिंकलर बेअरिंग तपासाव्यात व त्या व्यवस्थित बसवाव्यात.
स्प्रिंकलर नोझलच्या स्प्रिंग आर्मचे टेन्शन तपासून तो व्यवस्थित बसवावा. फिटिंग अथवा कपलरद्वारा पाणी गळती होत असेलः
कपलर अथवा फिटिंग्सचे वायसर तपासून त्या व्यवस्थित बसले आहेत याची खात्री करावी.
कपलरच्या थ्रेडमध्ये घाण असल्यास ती साफ करून पुन्हा सिलिंग रिंग बसवावी. कपलरला जोडलेले पाईपचे शेवटचे तोंड वाकडे झाले असल्यास व्यवस्थित करून घ्यावे.
पाणी सर्वदूर समप्रमाणात न बसणेः
साधारणपणे वाऱ्याचा वेग जास्त असल्यास तुषार सिंचनाने पाणी व्यवस्थित बसत नाही त्यासाठी विशेषतः उन्हाळी हंगामात तुषार सिंचन संच सकाळी किंवा संध्याकाळी, ज्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी आठ किलोमीटर प्रति तास पेक्षा कमी असतो अशावेळी चालवावा. पंपसेट द्वारे योग्य दाब निर्माण होत नसल्यासः
सक्षम लिफ्ट तपासावा, सक्षम लिफ्ट प्रमाणाच्या बाहेर असेल तर पंप पाण्याच्या जवळ बसवावा म्हणजे सक्षम लिफ्ट कमी होईल व पंपाद्वारे दाब निर्मिती व्यवस्थित होईल.
सक्षम पाईपचे कनेक्शन, फ़िटिंग्ज तपासाव्यात, गळती असल्यास कनेक्शन आवळून घ्यावे.
फुट व्हॅाल्व ट्रेनर, डिलिव्हरी पाईप व त्यावरील गेट व्हाल्व तपासावा.
या लेखाचे लेखक डॉ कल्याण देवळाणकर हे सेवा निवृत्त कृषी शास्त्रज्ञ आहे.