“खरीप पिकांसाठी योग्य प्रकारची रानबांधणी करणे जलसंधारणासाठीही फायद्याचे”
पिकांना पाणी देण्यासाठी योग्य रानबांधनी करणे अतिशय गरजेचे असते. या रानबांधनीचा उपयोग खरीप हंगामातील पिकांना योग्य प्रमाणात पाणी देण्यासाठी तर होतोच परंतु पडणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीवरून वाहून न जाता पडलेल्या ठिकाणी मुरवण्यासाठीही रानबांधणी करणे उपयुक्त ठरते.
सारे पद्धत: ज्या ठिकाणी जमिनीला ०.२ ते ०.३ टक्के उतार असेल त्या ठिकाणी सारे पद्धतीचा अवलंब करावा. त्यासाठी उताराच्या बाजूने ३ मीटर रुंदीचे सारे पाडून साऱ्याच्या दोन्ही बाजूस सुमारे २२ सें.मी. उंचीचे वरंबे तयार करावेत. जमिनीच्या प्रकारानुसार हलक्या जमिनीत ५० ते ६० मीटर, मध्यम जमिनीत ७० ते ८० मीटर तर भारी जमिनीत ९० ते १०० मीटर एवढी साऱ्यांची लांबी ठेवावी.ही पद्धत ज्वारी, बाजरी, भुईमूग, चारा पिके व कडधान्याच्या पिकांसाठी योग्य आहे.
वाफे पद्धत :
जमिनीला जास्त प्रमाणात उतार असेल अथवा उंच सखलपणा मोठ्या प्रमाणात असेल किंवा एकसारखा उतार नसेल अशावेळी पिकास पाणी देण्यासाठी वाफे तयार करावेत.
वाफे साधारणतः
१०×४.५ मीटर आकारमानाचे असावेत. वेगवेगळ्या पिकांसाठी गादीवाफे किंवा आळे पद्धतीचा अवलंब केला जातो. गादीवाफा पद्धत रोपे तयार करण्यासाठी तसेच हळद, आले व स्ट्रॉबेरी या पिकांसाठी उपयुक्त आहे. गादीवाफ्याची रुंदी १ मीटर पर्यंत आणि उंची जवळपास १ फुटापर्यंत असावी. रुंदी जास्त असल्यास वाफ्याच्या मधल्या भागापर्यंत ओल पोहोचत नाही. आळे पद्धत वेलभाज्यांना आणि सर्व प्रकारच्या फळझाडांना उपयुक्त असून या पद्धतीत फक्त झाड अथवा वेलीभोवतालचा विशिष्ट आकाराचा भागच भिजतो.
सरी – वरंबा पद्धत:
सरी वरंबा पद्धत ऊस, कापूस, भाजीपाला व फुलझाडांसाठी उपयुक्त असून जमिनीच्या प्रकारानुसार आणि पिकानुसार स-यांची लांबी ७५ ते ९० से.मी. घेऊन उंची जास्तीत जास्त ३० से.मी. ठेवावी. ०.१५ ते ०.२० टक्के उताराच्या जमिनीत उताराच्या दिशेने १०० मीटरपर्यंत सऱ्यांची लांबी ठेवावी. हलक्या जमिनीत सऱ्यांची लांबी व रुंदी कमी ठेवावी. या प्रकारची रानबांधणी जी पिके एकापेक्षा जास्त हंगामात वाढतात व पक्व होतात अशा पिकांसाठी वापरावी.
सम पातळीत सारे अथवा सरी पद्धतः
या पद्धतीची रानबांधनी करण्यापूर्वी जमिनीवरील समपातळीवरील बिंदू शोधून ते जोडावेत. समपातळीवरील बिंदू जोडल्यानंतर पाण्यास पुढे जाण्याकरता ढाळ मिळावा म्हणून साऱ्यांना अथवा सऱ्यांना ०.४ टक्के म्हणजे १०० मीटर लांबीत ४० से.मी. ढाळ ठेवावा. याप्रमाणे संपूर्ण शेताची रानबांधणी केल्यानंतर पीक पेरताना १० ते १५ मीटर अंतरावरील वरंब्यावर पिकाबरोबर सुबाभूळ लावावी म्हणजे दरवर्षी समपातळीवरील बिंदू शोधण्याची गरज पडत नाही. पिकानुसार सुबाभळीच्या ओळींना समांतर असे सारे अथवा सऱ्या दरवर्षी तयार कराव्यात.
सुबाभळीची उंची ६० से.मी. ठेवून वेळोवेळी छाटणी करावी. या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी सुरुवातीला तज्ञांचे मार्गदर्शन घेणे जरुरीचे असते.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहे.