पिकास दिलेली खते एकाच वेळी जास्त प्रमाणात दिल्याने पिकाच्या मुळांच्या कक्षेच्या खाली निचऱ्याद्वारे किंवा जमिनीच्या पृष्ठभागावरून वायुरूपात मोठ्या प्रमाणात नाश पावतात. खताची उपयुक्तता जास्तीत जास्त मिळविण्यासाठी ठिबक सिंचन संचातून विद्राव्य खतांचा वापर हा एक चांगला पर्याय होऊ शकतो.
ठिबक संचातून विद्राव्य खते दिल्याने होणारे फायदेः
सर्व परिस्थितीत अचूक व समप्रमाणात खतांचा वापर शक्य. कारण गरजेएवढीच खते देता येतात व ही खते तोट्यांमधून पाण्याबरोबर झाडाजवळ पडत असल्यामुळे प्रत्येक झाडास खते समप्रमाणात दिली जातात.
खताची कार्यक्षमता वाढते. कारण ठिबक सिंचन पद्धतीने पिकास पाणी दिल्याने जमिनीचा ठराविक भाग ओला होतो व दिलेली खते या भागातच पसरतात. त्यांचा निचऱ्याद्वारे -हास होत नाही. शिवाय या ओलाव्याच्या भागातच पिकाची कार्यक्षम मुळे असल्याने दिलेली अन्नद्रव्ये चांगल्या रीतीने पिकास लगेच उपलब्ध होतात व खताच्या मात्रेत जवळपास २५ टक्के बचत होते. पर्यायाने खतावरील खर्च कमी करता येतो.
पिकाच्या खताच्या गरजेच्या संवेदनक्षम अवस्थांनुसार आवश्यक तेवढी खताची मात्रा पिकाच्या एकूण वाढीच्या कालावधीत अनेक वेळा देता येतात. त्यामुळे पिकाची वाढ जोरदार होऊन उत्पादनात १५ ते २५ टक्के वाढ होते.
पारंपारिक पद्धतीने खते देताना जमीन तुडवली जाऊन ती घट्ट होते व मुळांची वाढ योग्य होत नाही. हा प्रकार ठिबक संचातून खते दिल्याने टाळता येतो.
पारंपरिक पद्धतीत खते फोकून देताना त्यातला काही भाग पिकाच्या पानावर पडून पाने जळतात. ठिबक संचातून खते दिल्याने हा प्रकार होत नाही.
ठिबक संचातून विद्राव्य खते देण्याचे तोटेः
खते देण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांचा खर्च वाढतो.
दिलेल्या खताची पाण्याबरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन काही प्रमाणात तोट्या बंद पडण्याची शक्यता असते.
संचातील यंत्रणेत काही त्रुटी असल्यास खतमिश्रित पाणी विहिरीत अथवा पाण्याच्या साठ्यात परत जाण्याची शक्यता असते. असे पाणी जनावरांनी किंवा माणसांनी प्यायल्यास त्यांना इजा होऊ शकते.
ठिबक संचातून पिकांना द्यावयाची विद्राव्य खतेः
अ.नत्रयुक्त विद्राव्य खतेः
नत्र खताची उपलब्धता ही जमिनीत कमी असते. नत्र वायुरूपात वाया जाते किंवा जमिनीत घट्ट धरून ठेवले जाते. युरिया (४६%), युरिया सल्फेट (३५%), युरिया अमोनियम नायट्रेट (३०%), अमोनियम सल्फेट (२१%), अमोनियम नायट्रेट (३३%), कॅल्शियम नायट्रेट (१५%), इत्यादी, नत्रयुक्त खते आहेत. यापैकी युरिया खत हे पूर्णतः विरघळणारे असल्याने व त्याचे पाण्याशी कोणत्याही प्रकारचे संयुग तयार होत नसल्यामुळे हे खत ठिबक संचातून देणे फायदेशीर ठरते.
ब. स्फुरदयुक्त विद्राव्य खतेः अमोनियम सल्फेट (१६ः२०ः००), मोनो अमोनियम फॉस्फेट (११ः४८ः००) व डाय अमोनियम फॉस्फेट (१८ः४६ः०० ) यासारखी स्फुरदयुक्त खते पूर्णतः विरघळणारी असल्याने त्यांचा ठिबक संचाद्वारे द्रवरूप स्वरूपात वापर करता येतो. इतर स्फुरदयुक्त खतांपेक्षा फॉस्फरिक आम्ल (५२%) ठिबक संचाद्वारे पिकास देणे केव्हाही उपयुक्त ठरते.
क.पालाशयुक्त विद्राव्य खतेः पोटॅशियम क्लोराईड (60%), पोटॅशियम सल्फेट (50%), पोटॅशियम नायट्रेट १३ः००ः४५), पोटॅशियम फॉस्फेट (००ः४४ः६६) या पालाशयुक्त खतांचा वापर ठिबक संचाद्वारे सुलभरीत्या करता येतो.
ठिबक संचातून विद्राव्य खते देताना लक्षात घ्यावयाच्या बाबीः
निचऱ्याद्वारे होणारा अन्नद्रव्यांचा -हास कसा कमी होईल हे बघावे.
गरजेपेक्षा जास्त खते देणे टाळावे.
खतापासून निर्माण होणाऱ्या साक्यामुळे तोट्या बंद पडणार नाहीत याची काळजी घ्यावी.
प्लास्टिक नळ्या व पाईप नरम पडणार नाहीत अशी खते वापरावी.
खते शेतात वापरायला सुरक्षित असावीत.
खते पाण्यात पूर्णतः विरघळणारी असावीत.
पाण्याच्या कणांबरोबर खतांची रासायनिक प्रक्रिया होणार नाही अशा प्रकारे खते व क्षारयुक्त पाण्याचा वापर करावा.
विद्राव्य खते शेतात सर्व ठिकाणी समप्रमाणात दिली जावीत यासाठी खते एकसारखी मिसळावीत व पाण्याचा प्रवाह लक्षात घेऊन पाणी व खते समप्रमाणात द्यावीत.
