तुषार व ठिबक या पिकास पाणी देण्याच्या आधुनिक सिंचन पद्धतीत प्रचलित पाणी देण्याच्या पद्धतींच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होते. मात्र या दोन्ही सिंचन पद्धतींसाठी सुरुवातीचा भांडवली खर्च जास्त येतो. शेतकऱ्यांनी या पद्धती मोठ्या प्रमाणावर वापराव्यात म्हणून केंद्र व राज्य शासन प्रोत्साहनपर अनुदान देते असे असले तरी या पद्धतींचा पिकासाठी जास्तीत जास्त काळ वापर व्हावा याकरिता दोन्हीही पद्धतींची निगा व देखभाल करणे आवश्यक असते. योग्य प्रकारे ठेवलेल्या निगेमुळे किंवा केलेल्या देखभालीमुळे या पद्धतींचे फक्त आयुष्यच वाढत नाही तर त्याचबरोबर या सिंचन पद्धतीतून पिकास योग्य प्रकारे पाणीपुरवठा होऊन पिकाचे चांगले उत्पादनही मिळते.

तुषार सिंचन संचाची निगा व देखभालः

# तुषार सिंचन संच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेताना संचाचे सर्व भाग व्यवस्थितरित्या सुटे करून पुन्हा नवीन ठिकाणीजुळवावेत.

# तुषार पाईप जोडताना एका पाईपचे टोक दुसऱ्या पाईपच्या कपलरमध्ये टाकताना त्याला माती किंवा कचरा लागणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा कपलरची रिंग खराब होण्याची शक्यता असते.

# सततच्या वापराने कपलरची रबरी रिंग बदलावी लागते. ती बदलताना तिची दिशा योग्य असणे आवश्यक असते. यदाकदाचित रिंग उलटी बसली गेली तर दोन पाईपच्या मधून पाणी गळत राहते.

# तुषार संचास पुरवायचे पाणी स्वच्छ नसल्यास सक्शन पाईपच्या व्हॅाल्वला बारीक छिद्राची जाळी गुंडाळावी. एक हंगाम संपून दुसऱ्या हंगामासाठी संच वापरण्यापूर्वी सुरुवातीला लॅटरल पाईपचे बुच काढून त्यातून काही वेळासाठी पाणी बाहेर पडू द्यावे, म्हणजे पाईप मधील कचरा किंवा इतर गोष्टी निघून जातील.

# संच वापरात असताना तो नेहमी जोडलेल्या अवस्थेत ठेवावा. जेणेकरून उंदीर किंवा इतर किडे पाईपात जाऊन तुषार तोटीत अडकणार नाहीत.

# तुषार तोटीतील वॉशर झिजले अथवा खराब झाले असल्यास ते बदलावे.

# तोटीच्या स्प्रिंगचा ताण कमी झाल्यास तोटीचा फिरण्याचा वेग कमी होतो, तेव्हा स्प्रिंग थोडी ताणून तिचा ताण वाढवावा किंवा स्प्रिंग बदलावी.

# संचातील सर्व फिटिंगचे नट व बोल्ट वेळोवेळी घट्ट करावेत.

# स्प्रिंकलरला कधीही ग्रीस अथवा ऑइल लावू नये, स्पिंकलरसाठी पाणी हेच वंगण असते.

# वापरात नसताना तुषार संचाच्या विविध भागाच्या रबरी रिंग कपलरमधून काढून थंड जागेत काढून ठेवाव्यात त्याचप्रमाणे तुषार तोट्या कोरड्या जागेत ठेवाव्यात.

ठिबक सिंचन संचाची निगा व देखभालः

# ज्या पाण्यात लोहाचे प्रमाण ३ ते ४ पीपीएम एवढे असते असे पाणी ठिबक संचातून वापरल्यास तोट्या किंवा सूक्ष्मनलिका बंद पडण्याचा धोका असतो, त्यासाठी असे पाणी शक्यतो ठिबक संचातून वापरू नये.

# तोट्या, सूक्ष्मनलिका तसेच गाळण टाक्या, मातीचे किंवा वाळूचे कण, काडीकचरा इ. अडकून बंद पडतात, यासाठी वाळूच्या गाळण टाकीत साचलेली घाण पाणी उलट दिशेने वळवून बाहेर काढून टाकावी. धातूच्या गाळण टाकीत असलेल्या स्टेनलेस स्टील व प्लॅस्टिकच्या चाळण्या बाहेर काढून ब्रशच्या साह्याने स्वच्छ कराव्यात. मुख्य पंपसेट, दाबमापक यंत्रे, खत देण्याची यंत्रणा व गाळण यंत्रणा नियमित तपासाव्यात. दररोज संच सुरू करण्यापूर्वी वाळूची यंत्रणा पाण्याची दिशा उलट मार्गे वळवून साफ करावी व धातूच्या गाळण्या किमान आठवड्यातून एकदा ब्रशच्या सहाय्याने साफ कराव्यात.

# आठवड्यातून एकदा मुख्य व उपमुख्य नळीच्या शेवटच्या टोकाची थ्रेड कॅप काढून नेहमीपेक्षा सव्वा ते दीडपट जास्त दाबाने पाणी संचात सोडून साफ कराव्यात. याच पध्दतीने उपनळयांची शेवटचे तोंडे उघडून त्या साफ कराव्यात.

# पाण्यातील वेगवेगळ्या क्षारांची एकमेकांशी रासायनिक प्रक्रिया होते आणि त्यापासून पांढऱ्या, तांबड्या अथवा काळया रंगाचे थर ठिबक संचाच्या विविध भागात तयार होतात व त्यामुळे तोट्या बंद पडतात. रासायनिक प्रक्रियेमुळे ठिबक सिंचन संच बंद पडल्यास आम्ल प्रक्रिया करावी.

# साधारणपणे सहा महिन्याच्या अंतराने उपनळयांवरील बंद पडलेल्या तोट्या एक टक्का आम्लाच्या पाण्याने साफ कराव्यात. पाण्यातील जिवाणूमुळे लोह व गंधकाचा थर संचात तयार होतो तसेच पाण्यात सल्फेटचे प्रमाण जास्त असल्यास जिवाणू सेंद्रिय गंधक तयार करतात व त्यामुळे पांढरा रंगाचा थर संचात तयार होतो. जैविक कारणाने ठिबक सिंचन संच बंद पडल्यास क्लोरीन प्रक्रिया करावी. ही प्रक्रिया साधारणपणे सहा महिन्याच्या अंतराने करावी.

# आम्ल व क्लोरिन प्रक्रियेनंतर संपूर्ण संच पाण्याने स्वच्छ करणे आवश्यक असते. दुसऱ्या हंगामासाठी संच उपयोगात आणण्यापूर्वीही आम्ल/क्लोरिन प्रक्रिया करावी.

या लेखाचे लेखक डॉ कल्याण देवळाणकर हे सेवा निवृत्त कृषी शास्त्रज्ञ आहे.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized with PageSpeed Ninja