पिकांना आवश्यक मुख्य अन्नद्रव्ये व त्यांचे कार्य
नत्र, स्फुरद व पालाश ही पिकांना आवश्यक असलेली मुख्य अन्नद्रव्ये असून प्रत्येक अन्नद्रव्याची पीक वाढीच्या निरनिराळ्या अवस्थेत पिकास त्याचा विकास तसेच उत्पादन वाढीसाठी गरज असते.
१. नत्र –
नत्र हा अन्नघटक पिकाच्या एकूण कालावधीनुसार पिकास २-३ हप्त्यात दिला जातो.नत्राचा पहिला हप्ता पेरणीच्या वेळी,दुसरा पेरणीनंतर तीस दिवसांनी आणि तिसरा व शेवटचा हप्ता पेरणीनंतर ४५ दिवसांनी दिला जातो. खरीप हंगामातील मका पिकास तीन हप्त्यात नत्र दिले जाते तर मूग /उडीद पिकांना नत्राची संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी दिली जाते. इतर पिकांना नत्र पेरणीच्या वेळी व पेरणीनंतर ३० दिवसांनी अशा २ हप्त्यात दिले जाते.
पिकास नत्राची गरज सुरुवातीच्या अवस्थेतच असते. त्याचप्रमाणे जमिनीत दिलेला नत्र पिकास लगेचच उपलब्ध होतो त्यामुळेच पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पिकास जसजशी गरज लागते त्यानुसार २/३ हप्त्यात नत्राचा पुरवठा करावा लागतो.
२. स्फुरद –
स्फुरद हे अन्नद्रव्य जमिनीत दिल्यानंतर प्रथम ते मातीच्या कणांना चिकटते व सुरुवातीला १८ – २० टक्के एवढ्या प्रमाणात पिकास उपलब्ध होते. स
स्फूरदची गरज पिकांच्या मुख्य वाढीच्या काळात असते आणि पेरणीच्या वेळी एकदाच दिलेला स्फुरद हा पिकांच्या मुख्य वाढीच्या काळात पिकास हळूहळू उपलब्ध होत जातो.
३. पालाश-
पालाश हा अन्नघटक जमिनीत दिल्यानंतर पिकास लगेच उपलब्ध होत नाही तर दिलेल्या अवस्थेतच पिकांच्या पुणरुत्पादन अवस्थेपर्यंत जमिनीत पडून राहतो. पालाशची पिकास प्रामुख्याने पुणरुत्पादनअवस्था म्हणजे दाणे लागताना / भरताना फळांची वाढ होताना आवश्यकता असते. पिकांच्या पेरणीच्या वेळी दिलेला पालाश पिकांच्या गरजेनुसार पुणरुत्पादन अवस्थेत पिकास उपलब्ध होतो.
युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट व म्युरेट ऑफ पोटॅश खतामध्ये अनुक्रमे १६,४६ व ५८% नत्र, स्फुरद व पालाश असते. पिकांना ही खते देताना शेतकरी बांधवांनी ढोबळ मानाने शिफारस केलेल्या नत्राच्या दुप्पट युरिया,स्फुरदच्या सहा पट सिंगल सुपर फॉस्फेट व पालाशच्या दुप्पट म्युरेट ऑफ पोटॅश हे प्रमाण लक्षात ठेवावे.
अलीकडे नत्र स्फुरद पालाश ही अन्नद्रव्ये वेगवेगळ्या प्रमाणात समावेश असलेली विद्राव्य खते पावडरच्या स्वरूपात उपलब्ध झाली आहेत. ही खते पाण्यात विरघळवून पिकांवर फुलोरा,दाणे भरण्याच्या(पुनरुत्पादन )अवस्थेत योग्य प्रमाणात फवारल्यास पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होते.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .