उन्हाळी चारा पिकांचे व्यवस्थापन
कुठल्याही पिकाचे भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी त्या पिकाचे व्यवस्थापन तंत्रशुद्धरित्या करणे अतिशय गरजेचे असते. पीक व्यवस्थापनात जमिनीची पुर्वमशागत व
आंतरमशागत, सुधारित जातींचा वापर, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन व पीक संरक्षण या प्रमुख पाच बाबींचा (याला पीक व्यवस्थापनाची पंचसूत्री असेही म्हणतात) समावेश होतो. उन्हाळी हंगामात घ्यावयाच्या चारा पिकांची लागवड करण्यासाठी शिफारस केलेल्या वाणांबाबतची माहिती आपण गेल्या लेखात जाणून घेतलेली आहे.
उन्हाळी हंगामात चारा पिकांची लागवड करण्यापुर्वी एक नांगरणी व त्यानंतर दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पीक ३० ते ३५ दिवसांचे होण्यापुर्वी पिकात एक कोळपणी व एक खुरपणी करून पीक तणविरहित ठेवावे. पीक पेरणीपूर्वी बियाणास अॅझेटोबॅक्टर जिवाणु संवर्धनाची २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
पेरणीसाठी ज्वारी, बाजरी व मका या पिकाचे प्रति एकरी अनुक्रमे १६, ४ व ३० किलो बियाणे वापरावे.
खत व्यवस्थापनात ज्वारी पिकास पेरणी करताना प्रति एकरी २० किलो नत्र, २० किलो स्फुरद व १६ किलो पालाश द्यावे, पेरणीनंतर ३० दिवसांनी उर्वरित २० किलो नत्र द्यावे. बाजरी पिकास पेरणीच्या वेळी प्रति एकरी १८ किलो नत्र, १६ किलो स्फुरद व १२ किलो पालाश द्यावे, पेरणीनंतर ३० दिवसांनी उर्वरित १८ किलो नत्र द्यावे. मका पीक पेरताना प्रति एकरी २० किलो नत्र, २० किलो स्फुरद व २० किलो पालाश द्यावे, पेरणीनंतर ३० दिवसांनी उर्वरित २० किलो नत्र द्यावे.
शिफारस केलेल्या नत्राच्या मात्रेच्या दुप्पट युरिया, स्फुरद मात्रेच्या सहापट सिंगल सुपर फॉस्फेट व पालाश मात्रेच्या दुप्पट म्युरेट ऑफ पोटॅश ही खते द्यावीत.
उन्हाळी हंगामात घेतलेल्या पिकांना जमिनीच्या प्रकारानुसार ७ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .