केळी, ऊस, हळद, इतर फळझाडे तसेच हंगामी भाजीपाल्यांची पिके किंवा कापूस या नगदी पिकांची वाढ खरीप हंगामादरम्यान व्यवस्थित होण्यासाठी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या व्यतिरिक्त आवश्यकतेनुसार या पिकांना बाहेरूनही पाणीपुरवठा करावा लागतो. पावसाळी हंगामात पिकांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध असेल तरी दीर्घ कालावधीच्या या पिकांना पावसाळ्यानंतरही पाणीपुरवठा करणे गरजेचे असते म्हणून पावसाळी अथवा खरीप हंगामातच या पाण्याचा काटकसरीने वापर करून शिल्लक राहिलेले पाणी येणाऱ्या हंगामात वापरून पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळविणे शक्य होते. अर्थातच पाण्याचा काटकसरीने वापर करावयाचा ठरल्यानंतर निदान नगदी पिकांसाठी तरी ठिबक, तुषार व रेनगण यासारख्या आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर करणे अनिवार्य ठरते.
सर्वसाधारणपणे कमी अंतरावरील व कमी उंचीच्या पिकांसाठी तुषार सिंचन पद्धत योग्य असते. जास्त अंतरावरची व कितीही उंचीची पिके आपण ठिबक सिंचन पद्धतीने भिजवू शकतो, तर उसासारखी कमी अंतरावरची व जास्त उंचीच्या पिकांसाठी रेनगन ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे. उसासाठी रेनगण पद्धतीचा वापर केल्याने उसावर पडणाऱ्या लोकरी माव्याचे नियंत्रण करणे सोपे जाते. तुषार सिंचन पद्धतीचा वापर करताना ही पद्धत पिकाच्या फुलोऱ्याच्या काळात वापरणे टाळावे नसता पिकाच्या फुलोऱ्याच्या काळात ही पद्धत वापरली तर तुषारच्या स्वरूपात पडणाऱ्या पाण्याच्या थेंबांमुळे पिकांचा फुलोरा काही प्रमाणात घडून जाण्याची शक्यता असते आणि त्याचा विपरीत परिणाम पुढे पीक उत्पादनावर होतो. त्याचप्रमाणे ठिबक सिंचन पद्धतीचा भांडवली खर्च जास्त असतो आणि पिकाच्या प्रत्येक ओळीला ठिबकची एक उपनळी टाकणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरत नाही. त्याकरिता हेक्‍टरी रोपांची संख्या कायम ठेवून पिकांची जोड ओळीत लागवड करावी व जोड ओळीतील दोन ओळींमध्ये ठिबकची एक उपनळी टाकावी.

केळीः केळी लागवड साधारणतः १.५ x १.५ मीटर अंतरावर करतात. जोड ओळ पद्धतीमध्ये केळीच्या झाडातील अंतर ०.९० x १.५ मीटर ठेवून लागवड करणे सोयीस्कर ठरते. यासाठी शेतामध्ये प्रथम ९० सें.मी. अंतरावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने सरसकट सऱ्या पाडून घ्याव्यात. त्यानंतर लगतच्या दोन सरींमध्ये १.५ मीटर अंतरावर केळीची रोपे लावावीत व त्या दोन सऱ्यांमधील वरंब्यावर ठिबकची उपनळी टाकून त्यावर १.५ मीटर अंतरावर ठिबकच्या तोट्या बसवाव्यात. अशा प्रकारे दोन ओळीसाठी फक्त एकच उपनळी व दोन समोरासमोरील झाडांसाठी एकच तोटी वापरून ठिबकच्या खर्चात निम्म्याने बचत करता येते. दोन सऱ्यांत केळीची लागवड केल्यानंतर पुन्हा दोन सऱ्या मोकळ्या सोडाव्यात व नंतरच्या दोन सऱ्यांमध्ये पुन्हा वरील प्रमाणे केळीची लागवड करावी. अशा प्रकारे केळीची ठिबक सिंचन पद्धतीवर जोड ओळीत लागवड करताना दोन उपनळयांमधे ३.६० मिटर, दोन ओळीत २.७० मिटर आणि दोन तोटयांमधे १.५ मिटर अंतर राहते.

ऊसः ठिबक सिंचन पध्दत उसासाठी अतिशय उपयुक्त असून या पध्दतीच्या वापराने प्रचलित सरी-वरंबा पध्दतीपेक्षा ऊसाचे २० ते २५ टक्के उत्पादन वाढते तसेच पाण्याच्या वापरातही जवळपास ५० ते ६० टक्के बचत होते. उसासाठी ठिबक सिंचन पध्दतीच्या जोड ओळ व सोडओळ (४ ओळीनंतर १ ओळ सोडणे) या दोन पध्दती विकसित केलेल्या आहेत. जोड ओळ पध्दतीत ऊसाची लागवड करताना ७५ सें.मी. रुंदीच्या स-या तयार केल्या जातात. लगतच्या दोन सऱ्यांमध्ये उसाची लागवड करून तिसरी सरी मोकळी सोडली जाते. नंतर पुन्हा लगतच्या दोन सऱ्यात लागवड केली जाते. उसाच्या दोन ओळीतील वरंब्यावर उपनळी ठेवून त्यावर ७५ सें.मी. अंतरावर तोट्या बसवल्या जातात. सोडओळ पद्धतीत सऱ्यांची रुंदी ९० सें.मी. ठेवली जाते. सलग चार सऱ्यांमध्ये ऊस लागण करून नंतर एक सरी मोकळी ठेवून पुन्हा चार सऱ्यांमध्ये उसाची लागवड करावी. प्रत्येक दोन ओळीसाठी एक उपनळी टाकून त्यावर ७५ सें.मी. अंतरावर तोट्या बसवाव्यात. या पद्धतीत ऊस वाढल्यानंतर कडेच्या दोन ओळी आतील बाजूस दाबल्यास मधल्या दोन ओळीतील ऊस सरळ वाढतो व त्यास दोन्ही बाजूने आधार मिळाल्याने ऊस लोळत नाही.

अशा प्रकारे कापूस,भाजीपाला आणि हळद पिकासाठीसुद्धा आपल्याला जोड ओळ पद्धतीचा अवलंब करुन ठिबक सिंचन पध्दतीचा वापर करता येतो.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized with PageSpeed Ninja