“हरभरा पिकासाठी आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर”
हरभरा हे पीक पाण्यासाठी अतिशय संवेदनशील असे पीक आहे. जमिनीत पिकाच्या मुख्य वाढीच्या काळात ओलावा नसेल तर पिकाची वाढ योग्यरीत्या होत नाही, योग्य प्रमाणात फांद्या फुटत नाहीत, फुले लागत नाहीत परिणामी घाट्यांची संख्या कमी राहून अतिशय कमी उत्पादन मिळते. याउलट जास्त पाणी दिले गेल्यास पीक उभळण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे जमिनीत फार काळ पाणी साचून राहिल्यास
मूळकुजव्या रोग होऊ शकतो. त्यामुळे बागायती हरभरा पिकास प्रत्येक पाण्याच्या पाळीत योग्य प्रमाणात म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार ६ ते ८ सेंटिमीटर उंचीचे पाणी द्यावे. हरभरा पिकाची संपूर्ण हंगामातील पाण्याची गरज सुमारे २५ ते ३० सेंटीमीटर एवढी असते. हरभरा पिकाची पाण्याची ही गरज पिकाच्या वाढीच्या विशिष्ट अवस्थेत पिकास पाणी देऊन भागवावी. त्यासाठी पहिले पाणी पिकास फांद्या फुटताना म्हणजे पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी आणि दुसरे पाणी घाटे भरताना म्हणजे पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी द्यावे. दोन पेक्षा जास्त पाणी उपलब्ध असेल तर जास्तीचे एखादे दुसरे पाने हरभरा पिकाच्या फुलोऱ्याच्या काळात द्यावे.
प्रचलित पाणी देण्याच्या पद्धतीबरोबरच हरभरा पिकासाठी तुषार किंवा ठिबक सिंचन पद्धतींचा अवलंब केल्यास उपलब्ध पाण्यात जास्त क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते तसेच या आधुनिक सिंचन पद्धतीने पाहिजे तेवढ्याच प्रमाणात पाणी दिल्याने उत्पादनातही वाढ होते. हरभरा पिकासाठी तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करताना हरभरा पिकाची लागवड सरी-वरंबा पद्धतीत दोन सऱ्यांमध्ये ३ फूट अंतर ठेवून सरीच्या दोन्ही बगलेस सुमारे वीतभर अंतरावर बी टोकून करावी. नेहमीच्या सारे पद्धतीतही तुषार सिंचन पद्धत उपयुक्त असून हरभरा लागवडीअगोदर तुषार सिंचनाने जमीन ओलवून टोकण पद्धतीने लागवड केल्यास पिकाची चांगली उगवण होण्यास मदत होते. प्रचलित पद्धतीने जेवढ्या अंतराने आपण हरभरा पिकास पाणी देतो तेवढ्याच अंतराने तुषार सिंचनानेही पिकास पाणी द्यावे. मात्र पीक फुलोऱ्यात असताना तुषार सिंचनाने पाणी देण्याचे टाळावे कारण तुषार तोटीतून पावसाच्या स्वरूपात पडणाऱ्या पाण्याने फुलोरा धुवून जाण्याची शक्यता असते. काही शेतकऱ्यांना असे वाटते की तुषार सिंचनाने पाणी दिल्याने हरभऱ्याची आंब धुऊन जाते व त्यामुळे उत्पादनात घट येते. परंतु हा समज चुकीचा आहे कारण आपण हरभरा पिकास तुषारने दररोज पाणी देत नाही आणि आंब ही दररोज होणारी प्रक्रिया आहे. तेव्हा तुषार सिंचनाने हरभरा पिकास पाणी दिल्याने पिकाच्या उत्पादनात निश्चितच वाढ होते.
हरभरा पिकासाठी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संच खरेदी करणे परवडणारे नाही हे जरी खरे असले तरी ज्या ठिकाणी खरीप हंगामात दुसऱ्या कुठल्या नगदी पिकासाठी संच वापरलेला असेल आणि रब्बी हंगामात पाण्याची उपलब्धता कमी असेल अशावेळी रब्बी हंगामात हरभरा पिकाच्या लागवड पद्धतीत बदल करून ठिबक संचाचा वापर करणे सहज शक्य आहे. प्रचलित लागवड पद्धतीत हरभऱ्याच्या दोन ओळीत ३० सेंटीमीटर व दोन झाडात १० सेंटीमीटर अंतर ठेवले जाते. ठिबक सिंचन पद्धतीत हरभऱ्याच्या लागवडीसाठी सर्वप्रथम शेतात ९० सेंटीमीटर रुंदीच्या सऱ्या पाडाव्यात आणि वरंब्याच्या दोन बगलेस दोन ओळीत ४५ सेंटीमीटर अंतर राखून दोन झाडात ७ ते ८ सेंटीमीटर अंतर ठेवून हरभऱ्याची लागवड करावी. असे केल्याने प्रचलित लागवड पद्धतीएवढीच हेक्टरी रोपांची संख्या कायम राहील. हरभऱ्याच्या दोन ओळीसाठी म्हणजेच सरीच्या वरंब्यावर एक उपनळी टाकावी. वरंब्यावरून उपनळी घसरू नये म्हणून सुमारे १० ते १५ सेंटीमीटर रुंदीचा वरंबा सपाट करावा. असे केल्याने वरंब्यावर उपनळी व्यवस्थित राहील तसेच पिकाच्या दोन्ही ओळीसही व्यवस्थित पाणी बसेल. हरभऱ्याच्या दोन ओळीसाठी एका उपनळीचा वापर करताना दोन उपनळयात ९० सेंटीमीटर तर जमिनीच्या प्रकारानुसार उपनळीवरील दोन तोट्यात ६० ते ७५ सेंटिमीटर अंतर ठेवावे. तोट्याचा प्रति तास प्रवाह ४ किंवा ८ लिटर असावा. हरभऱ्याचे जास्त उत्पादन देणारे वाण लागवडीसाठी निवडून ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्यास निश्चितच हरभरा पिकाचे भरघोस उत्पादन मिळेल.
या लेखाचे लेखक डॉ कल्याण देवळाणकर हे सेवा निवृत्त शास्त्रज्ञ आहे.