उन्हाळी हंगामात पीक उत्पादनाच्या निरनिराळ्या घटकांपैकी पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. नेमक्या याच घटकाची उन्हाळ्यात कमतरता असते. अशा परिस्थितीत पाण्याची बचत करणाऱ्या ठिबक, तुषार किंवा रेनगन यासारख्या आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर निश्चितच उपयुक्त ठरतो.
ऊस, केळी आणि इतर फळझाडे, जास्त अंतरावरची भाजीपाल्याची पिके तसेच उन्हाळी बागायती कापसासाठी ठिबक सिंचन पद्धत फायद्याची असते. ठिबक सिंचन संचाचा सुरुवातीचा भांडवली खर्च जास्त असतो. हा खर्च प्रामुख्याने उपनळया आणि तोटया यावर होत असतो. ऊस केळी किंवा भाजीपाल्याच्या जास्त अंतरावरील पिकास प्रत्येक ओळीत ठिबकची एक उपनळी न टाकता पिकातील लागवडीचे अंतर कमी करून जोड ओळीत म्हणजे पिकाच्या दोन ओळीत ठिबकची एक उपनळी टाकावी आणि जमिनीच्या प्रकारानुसार त्या उपनळीवर ६० ते ९० सें.मी. अंतरावर तोट्या बसवाव्यात. असे केल्याने ठिबक सिंचन संचातील उपनळया आणि तोट्याच्या एकूण संख्येत तसेच खर्चातही सरसकट ५० टक्के बचत करता येते. जोडओळ पद्धतीचा वापर केल्याने हेक्टरी झाडांची संख्या कमी होत नाही कारण जोड ओळीच्या वापराने ज्या ठिकाणी दोन ओळीत जास्त अंतर असते ते कमी करून प्रत्येक दुसरी ओळ पहिल्या ओळीकडे सरकावी लागते आणि तिसरी ओळ आहे त्याच ठिकाणी ठेवल्याने एकूण ओळीची संख्या कमी न होता प्रत्येक दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीत पट्टा सुटला जातो. ज्यामधून जोड ओळीत टाकलेल्या उपनळीची देखभाल करता येते तसेच हा पट्टा पिकांवर औषध फवारण्याकरताही वापरता येतो.
उन्हाळी हंगामात घेतली जाणारी कमी अंतरावरची आणि कमी उंचीवरची पिके म्हणजे घास, बरसाम यासारखी चारा पिके किंवा उन्हाळी भुईमुगासाठी तुषार सिंचन पद्धत अतिशय उपयुक्त असून या पद्धतीत पाण्याची जवळपास ३० ते ३५ टक्के बचत होते. तुषार सिंचन संच हाताळण्यासाठी सोपा म्हणजे पोर्टेबल असून शेतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवता येतो. त्यामुळे शेतातील पिकांचे एकूण क्षेत्र टप्प्याटप्प्याने भिजवता येते आणि शेतकरी उन्हाळी हंगामात त्यांच्याकडे असलेल्या केवळ एकाच तुषार सिंचन संचाने पाण्याच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त क्षेत्र भिजवू शकतात. मात्र त्यासाठी शेतात ठिकठिकाणी पाईपलाईनचे जाळे पसरून जास्तीत जास्त ठिकाणी सायफन काढणे जरुरीचे असते. अशा सायफन केलेल्या ठिकाणी तुषार संचाचे पाईप जोडले की त्या ठिकाणच्या क्षेत्राचे ओलीत करणे सहज शक्य होते. एकंदरीत ठिबक सिंचन पद्धतीच्या तुलनेत तुषार सिंचन पद्धत वापरावयास सोपी असून केवळ एकाच संचात खूपच जास्त क्षेत्र भिजवता येते.
वाऱ्याचा वेग जास्त असल्यास तुषार तोटीतून पडणारे पाणी सर्व क्षेत्रावर समप्रमाणात पडत नसल्याने काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी आवश्यकतेपेक्षा कमी पाणी पडते आणि त्यामुळे तुषार सिंचन पद्धतीवर घेतलेल्या पिकाची वाढही कमी जास्त होऊन त्याचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे तुषार तोटीतून पाणी पावसाच्या थेंबाच्या स्वरूपात पिकाच्या पानांवर सारखे पडत असल्याने आणि वातावरणातल्या आर्द्रता निर्मितीमुळे पिकांवर काही प्रमाणात रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्याकरिता शक्यतो सकाळच्या वेळी वारा शांत असताना तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. उन्हाळी हंगामात वाऱ्याचा वेग जास्त असतो त्यामुळे तुषार सिंचन संच सकाळीच चालवणे फायद्याचे असते.
रोनगन ही पद्धत देखील तुषार सिंचन पद्धती सारखीच उपयुक्त असून कमी अंतरावरची, कमी उंचीच्या पिकांबरोबरच अगदी उसासारख्या उंच पिकासाठीही सुरुवातीच्या काही कालावधीपर्यंत ही पद्धत अतिशय कार्यक्षमतेने वापरता येते. त्याचप्रमाणे अलीकडे उसावर आलेली लोकरी मावा ही कीड रेनगनच्या वापराने काही प्रमाणात नियंत्रित होते असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. तुषार सिंचन संचातील पाईपाचा उपयोग करून ही पद्धत शेतकरी अगदी अल्प खर्चात वापरू शकतात. एका रेनगनमधून पडणाऱ्या पाण्यामुळे एकावेळी किमान अर्धा एकर क्षेत्र भिजवले जाते. ज्या शेतकऱ्यांकडे अगोदरच तुषार सिंचन संच असेल अशा शेतकऱ्यांनी त्यांनी घेतलेल्या पिकानुसार आणि प्रत्यक्ष परिस्थितीनुसार काही वेळा तुषारच्या तोट्यांद्वारे तर काही वेळा रेनगन तोटीद्वारे आपले क्षेत्र भिजवल्यास तुषारच्या तोटया आणि रोनगन तोटीच्या वापरासाठी तुषार संचाचे पाईप्स आहेत तसे किंवा थोडासा फेरबदल करून सहज वापरता येतात. अशा प्रकारे शेतकऱ्यांनी त्यांनी घेतलेल्या उन्हाळी पिकांसाठी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षमतेने वापर करण्याच्या दृष्टिकोनातून ठिबक, तुषार किंवा रेनगन या पद्धतींचा जरूर वापर करावा.