‘नगरी-नगरी’ फिरा मुसाफिर…
घर का रस्ता भूल गया…।’
कितीही मोठ्या तत्त्ववेत्यांच लिखाण असेल, कितीही मोठ्या संतांचे ग्रंथ असतील, त्यातील शिकवण ही मानवी जीवनाच्या कल्याणाचाच विषय असेल… म्हणून तत्त्वज्ञान आणि ग्रंथ वाचून किंवा त्यातील श्लोक, ओवी, अभंग पाठ करून जीवनात बदल होईलच असं अजिबात म्हणता येणार नाहीच… मुळात चांगलं काय अन वाईट काय, हे प्रत्येकालाच कळत असतं… पाप आणि पुण्य समजण्यासाठी माणसं शिकलेली आणि पदवीधरच असावीत असं काहीच नसतं… उलट काल-परवाच मी सांगितलं होतं की, जेवढा जास्त शिकलेला आणि जेवढा मोठ्यात मोठ्या पदावर बसलेला असेल, तेवढा तो सरळ आणि स्वच्छ नसतोच… जितका अधिकार असेल तेवढं तो ओरबडण्याचा प्रयत्न करणारच असतो… हजारात एखादा स्वच्छ जगणारा आणि चांगला विचार करणारा अपवाद असू शकतो… बाकी माणसं पदाच्या आणि अधिकाराच्या जोरावर पापकर्मात अखंड बुडालेली दिसतात… मग अशा प्रवृत्तींना ग्रंथ, संत आणि विचारवंत उकळून जरी पाजले तरी त्यांच्यावर काहीच परिणाम होणार नसतो…
चांगलं आणि वाईट फक्त माणसांनाच कळतं असं नाहीच, तर पशुपक्ष्यांना सुद्धा याचं चांगलं ज्ञान असतं… स्वतःचं आणि आपल्या परिवाराचं संरक्षण करण्याचं ज्या पशुपक्षांना कळतं ते ज्ञानी असतातच… आकाशात घार दिसली की कोंबडी सुद्धा आपल्या पिलांना आडोशाला घेऊन पंखाखाली लपवत असते… पण माणसात काही नमुने असे असतात की त्यांना परिवाराचही काहीच घेणं-देणं नसतं… देशीसम्राट तर असे जायेल असतात की, पायलीभर बाजरी दळायला घेऊन येतात तरी त्यातली शेरभर दुकानदाराला विकून पिल्याशिवाय घरी जात नसतात, एवढे ते जातवान असतात… हा झाला अडाणी आणि बधिरांचा विषय… पण ज्यांनी ग्रंथ पाठ करून ठेवलेत, ओव्या आणि श्लोका शिवाय बोलतच नाहीत, त्यांनी कीर्तनात रडूनगागून काहूर करायचा तडखाच लावलेला असतो… सुदाम्याची गरिबी सांगून आपली श्रीमंती वाढवायची ते हायगयच करीत नसतात… अशा फेट्यावाल्यांनी कोरोना काळात दुसऱ्या महाराज लोकांच्या गाड्या गहाण ठेवून घेतल्या आणि त्यांना व्याजानं पैसे दिले होते… असे हे ज्ञानी भंगलेले आहेत… काय करता यांच्या पाठांतराला…?
रामायण सांगायचं, भागवत सांगायचं, ज्ञानेश्वरीवर चिंतन करायचं, लोकांना गळे काढून रडायला लावायचं, मग लोकांनाही वाटतं महाराज फारच भावनाप्रधान आहेत… दर मिनिटाला भाऊक होतात… पण महाराज नेमका किती गंड्याचा आहे, ते फक्त पांडुरंगालाच माहीत असतं…
मानवी जीवनात प्रत्येकालाच आपल्या पापकर्माची शिक्षा भोगूनच इथून सुटका करून घ्यावी लागते… माणूस हाच एकमेव प्राणी असा आहे जो मेल्यानंतरही जिवंत असतो… नाहीतर ते चारशे वर्षानंतरही मोठमोठ्या किल्ल्यांमध्ये बांगड्या वाजवत बसलंच नसतं… आता ते भूतं स्वतःच्या बांगड्या वाजवतात की, दुसऱ्या भुतनीच्या बांगड्या फोडतात, हे त्यांचं त्यांनाच माहीत… अर्थात यावर फार विश्वास ठेवायचं कारणच नाही… पण असे भुताडं असू शकतात हे थोडेफार आवाज ऐकल्यावरच माणसं विश्वास ठेवतात… मेल्यावर माणसांची भूतं होतात की नाही ते माहित नाही… पण मी तर जिवंतपणातल्या हाडळणी आणि भूतं बरेचदा अनुभवलेले आहेत… अपघाती गेलेल्या किंवा काही अतृप्त आत्म्यांचे भूतं होत असतात असं मी अनेकदा ऐकलेलं आहे… माणूस हाच एकमेव अतृप्त आत्मा असेल असं वाटतं… नाही तर दररोज एकाच गल्लीत एकाच जागेवर मोक्कार कोंबड्या आणि बकरं कापतात, त्यांचं भूत अजूनही कोणत्याच खाटकाला भेटलं नाही… साला तोच हरामखोर जिवंत भूत आहे तर त्याला भूत भेटेलच कसं…?
असो… आपला विषय चालला होता ज्ञान अज्ञानाचा आणि पाप पुण्याचा… शेवटी संत, ग्रंथ आणि तत्त्वज्ञान आपापल्या जागेवरच असतं… मुळात माणसांच जीवन हाच एक फार मोठा ग्रंथ आणि अध्याय असतो… त्याची पानं आपल्याला स्वतःलाच नीट वाचता आली तर आपण सहज पापकर्मातून वाचू शकतो… नाहीतर ग्रंथांचे अभ्यासू आपल्या पाप-कार्मानं शेवटी धोतरात बुळकंडूनच मरणार असतात… मग काय करायचं ते पुस्तकी ज्ञान, जे पाठांतरात असूनही माणसांना जगायचंच कळलं नाही…
लोकांचे व्यवहार पाहून हल्ली मी फार सुन्न झालो आहे… त्यासाठीच एकांतात राहावे असे मला नेहमी वाटते… आजपर्यंत अनेक धार्मिक माणसं, आणि सज्जन पणाच्या गप्पा मारणारे शहाजुक माणसं मी अनुभवलेत, आणि जे नुसतेच अनुभवले नाही, तर चांगले भोवलेले आहेत… आणि म्हणून एकच वाटतं… नकोच या बरबटलेल्या विचारांच्या माणसांमध्ये माणूसकी आणि पुण्यकर्म शोधायला… आपला एकांतच आपला चांगला मित्र असू शकतो, जो आपल्याला आपलीच ओळख करून देत असतो …
‘मेरी खामोशी को मेरा घमंड मत समझना…
कुछ ठोकरे ऐसी खाई है,
कि अब बोलने का मन भी नहीं होता…।’
सच्चिदानंद… शिर्डी…