*’नगरी-नगरी’ फिरा मुसाफिर…*
*घर का रस्ता भूल गया…!’*
रूढी परंपरा किंवा प्रथा आणि या गोंडस शब्दांच्या नावाखाली जो देण्या-घेण्याचा किंवा हक्काने मागून घेण्याचा जो प्रकार असतो, तो फक्त मतलबी आणि भामट्या लोकांनीच टिकवून धरला असावा, असं मला वाटतं… खास करून लग्नाकार्यात तर या शब्दांचा वापर करून भिकार औलादीची माणसं आपल्या मागण्या मान्य करून घेतच असतात… रुढी आणि प्रथा निर्माण करणारा जर माणूसच होता, तर त्याच माणसांना आता या प्रथा कालबाह्य करायला काय हरकत आहे…?
समोरच्या माणसाच्या परिस्थितीचा विचार करायचा नाही… त्याचं कितीही वाटोळं झालं तरी चालेल पण आमच्या पोळीवर तूप पडलंच पाहिजे… या मनोवृत्ती मुळेच आज मुलींची संख्या घटलीय, आणि तिस-पस्तीस वर्ष वयाचे सांड आता फक्त दुसऱ्यांच्या नवरदेवापुढे नाचायलाच शिल्लक राहिलेले आहेत… मग या प्रथा आपल्याला आता किती घातक ठरल्या आहेत त्याचा विचार करायलाच कोणी तयार नाही…
बरेच ठिकाणी लग्न जमेपर्यंत माणसं फार शहाजुकीच्या गप्पा मारतात…
*आम्हाला फक्त मुलगी द्या… कोणाचं काही दिल्या घेतल्यानं कुठं माणूस मोठा होत असतो का…? आणि ते कधी कोणाला पुरत असतं का…?*
मग मग सुपारी फुटली, साखरपुडा झाला आणि लग्नाची तारीख जवळ आली की या शहाजुकीनं बोलणाऱ्या भिक्कारचोटांची यादी तयार व्हायला लागते… मग आमच्या मानकरनीं पासून सुरूवात झाली, तर आमच्या स्वतःला वस्तू काय-काय घ्यायच्या, तिथपर्यंत मुलाची आई यादी करत बसली… सुरुवातीला पंधरा-वीस मानकरनींची यादी तयार झाली होती, तर ती थेट साठ-सत्तर आवदासां पर्यंत जाऊन पोहोचली… वस्तूच्या बाबतीत तर विचारूच नका…
‘बाई तुम्हाला जर द्यायचं आसन तर जरा चांगलं आन ब्रॅण्डेड घ्या बरं का हो… उगाच काहीतरी द्यायचं म्हणून घेऊ नका… आमच्या ह्यांना तर हे अजिबात आवडत नाही, पण कसं आहे… आम्ही पण आमच्या मुलीसाठी केलं होतंच ना…!’
मग बरं झालं तू बदला घ्यायला बसलीय… तुझ्या बापाची यांच्याकडं ठेवंच ठेवलेली होती… तु घे आता वसुली करून… तुझ्या पोरीचे तीन राहाडे मिटल्यावर तू लग्न केलं होतं… मग सून पण राहाड्यातलीच बघायची ना… तिची तर फार बारीक चौकशी केली तू… सगळ्याच बाबतीत बरोबरीतलं पाहायचं ना…
मग ते लग्न कार्यालयातलं भांड्या-कुंड्याचं आणि वस्तूचं प्रदर्शन पाहायचं… फ्रिज काय, कपाट काय, वॉशिंग मशीन काय… यांना फक्त यांचे मेंदूच वॉश करता आले नव्हते…
दुपारी चार वाजता मग त्या मानकरीची पंगत बसली… नुसत्या भिकारणी बसल्यात एकमेकींचे थोबाडं पाहात… मग यांना वाढायला सुरुवात झाली… अगोदर भरपूर चेळून बसल्या होत्या तरी वाढून घ्यायची हायगयच केली नाही… कारण प्रथाच आहे ना… त्यानंतर माना-पानासाठी घेतलेल्या वस्तू वाटायला सुरुवात झाली… साडीच्या घडी पासून तर ताट, वाटी, तांब्या, समई हळूहळू एक एक वस्तू यांच्यासमोर ठेवली… जिच्या समोर ठेवलं जातं होतं ती बारीक हसायची… समोरच्या पंगतीत अजून वाढायचं बाकी होतं… तर त्या पण यांना न्याहाळत बसल्यात…
‘आमचं येतं का नाही काय माहित बाई… त्यात समया ठेवताना शेवटच्या दोन-तीन भिकारणी राहिल्यात… त्यांच्या यादीप्रमाणे सगळ्या वस्तू बरोबर आणल्या होत्या, पण त्या बाकीच्या गचपणात कुठं लवकर सापडायला उशीर झाल्यानंतर यांच्या मनात काहूर सुरू झालं…
‘बाई आपली बसतानाच जागा चुकली का काय…?’
आणि जोपर्यंत समया येत नाहीत तोपर्यंत नुसते एकमेकींना भामट्यासारख्या न्यायाळीत बसल्यात… मग तीन समया हातात घेऊन येणारी बाई दिसली… आत्ताशी कुठं जीवात जीव आला बाबा, नाही तर गेलीच असती… आता यांचा समई न पेटवता चेहरा उजळून निघाला…
अरे काय चाललंय आणि काय नाही… किती ही लाचारी… कधी थांबणार तुम्ही या रूढी आणि परंपरेतून… एकीकडे शहाजुकीच्या बाता मारायच्या, की ‘कष्टाचा पुरत नाही तर फुकटच कसं पुरणार हो…!’
मग हे फुकटचं उचलून नेतांना लाजा नको वाटायला..? काही तर असे शहाजुकी करतात की ते म्हणतात,
‘आमची काही इच्छाच नव्हती बरं का… पण त्यांनी बळंच दिलं हो…!’
असा पोत्यात घालून हाणला पाहिजे…
जोपर्यंत आपल्यात स्वाभिमान नाही, स्वच्छ जगण्याचा अभिमान नाही, कोणीतरी बसा म्हणलं की बसल्याच थोबाडं घेऊन… लाज नाही, लज्जा नाही… मुलीचा बाप कर्जबाजारी झाला तरी चालेल पण आमचा भिकारचोटपणा आम्ही कमी करणारच नाही… कशाला करायची देवपूजा, आणि कशाला झिजवायचे देवळांचे उंबरे… जेथे आपली मानच आपल्या खांद्यावर नाही तेथे आपली धार्मिकता काय कामाची…? स्वकष्टातून, स्वच्छ व्यवहारातून काय मिळवायचं ते मिळवा… तेच टिकाऊ ठरत असतं… फुकटचं कितीही उचलून आणा, त्याच्या डबल किमतीचे दवाखान्याचे आणि मेडिकलचे बिलं तयार होणार आहेत… वरून दिड महिना कन्हत बसावं लागेल तो बोनसच समजायचा… बरं आम्ही कितीही ओरडलो तरी नालायकांना काय फरक पडणार आहे…? ते त्यांचे पापकर्म हेच स्वतःचा सर्वात मोठा फायदा समजत असतात… परंतु कुठल्याही कर्माची परतफेड केल्याशिवाय इथून सुटकाच होणार नाही, हे मात्र कोणीच विसरू नये…
लेखक : भाऊ थोरात हे या नगरी नगरीचे लेखक आहेत त्यांची समाज जागृती करिताची अनेक पुस्तके आहे .