‘नगरी-नगरी’ फिरा मुसाफिर…

घर का रस्ता भूल गया…!’

पाप आणि पुण्याच्या आम्ही फार गप्पा मारतो, परंतु प्रत्यक्षात पुण्यकर्म करण्याची आम्हाला नेमकी आतून ओढ किती असते…? पुण्यकर्म किंवा सत्कर्म करण्याची आमची नेमकी मानसिकता असते का…? आणि जे काही चांगलं काम आम्हाला करायचं असतं ते अगदी सहजपणे आमच्या हातून घडत असतं का…? कारण गीतेचा नेमका बोध आम्ही लक्षात घेतला तर फळाची अपेक्षा न करता कर्म करणे, हाच आमचा उद्देश असला पाहिजे… पण झाडाला दगड मारायचं म्हणलं तरी फळाची अपेक्षा असतेच ना…?

पाप करण्याची सगळ्यांची मनापासून तयारी असते, परंतु पापाची शिक्षा मिळू शकते या भीतीपोटी पापकर्मातून माणूस स्वतःला थोडासा सावरत असतो… आणि सत्कर्म करताना फळाची अपेक्षा ठेवूनच सत्कर्म केलं जात असतं, त्यात शंकाच नाही… कुठल्याही झाडाचं फळ खाण्याची इच्छा झाली तर झाडाला दगड मारावाच लागेल, तर फळ मिळू शकेल… मग हे इच्छेने निर्माण केलेलं कर्म आहे, याला सत्कर्म किंवा पापकर्म तरी कसं म्हणता येईल…? परंतु स्वतःची इच्छा नसतानांही दुसऱ्या कोणाची फळ खाण्याची इच्छा झालीय, म्हणून आपण ते झाडावरून काढून देण्याचे कर्म केलं असेल तर ते नक्कीच सत्कर्म होणार, यात कुठलाच अपराध किंवा दगड मारल्यानं पाप होणार नाहीच… परंतु पापकर्म करणाऱ्या काही खोडीच्या औलादी अशा असतात की, कुत्रं झाडाखाली गुपचूप झोपलेलं आहे, तर मग त्याला दगड मारायची काही गरज होती का…? पण मारलाच औलादीनं दगड… अन त्याच्या नेमक्या पायावरच दगडाचा फटका बसला, आणि ते पाय उचलून लंगडतच क्यांव-क्यांव करीत पळालं की याला मनस्वी आनंद होतो… या ज्या प्रवृत्ती असतात हेच लोकं वाढवा कामं करण्यात फार पटाईत असतात… आणि हेच खरं पापकर्म असतं…

काही ठिकाणी मतलबी सत्कर्मी असतात… लग्नकार्यात पंगतीला वाढायला जातील… मुद्दाम गुलाबजाम किंवा बुंदीची टोकरी वाढायला घेतील… पण गल्लीतली रंभा ज्या पंगतीत बसलीय, तिथंच गुलाबजाम वाढायला जातील… मुद्दाम ती नको म्हणाली तरी चार गुलाबजाम जास्तच टाकतील… पंगत दुसऱ्यांचीच, पण आग्रह करून चार गुलाबजाम टाकून फळाची अपेक्षा करतोय ना…? हा धुर्त सत्कर्मी म्हणावा लागेल…

माणसांना रिकामे उद्योग फार चांगले जमत असतात… काहींना त्यातच मनस्वी आनंद मिळतो… काहींना बोलण्यात आनंद मिळतो, तर काहींना प्रत्यक्षात कृती करण्यातच आनंद मिळतो… पापकर्म केवळ कृतीतूनच घडत असतं असं नाहीच, तर आपली वाणी जरी गढूळ असली तरी ते पापकर्मच घडत असतात… बरं एखाद्या बद्दल गरज नसतानाच आणि फक्त त्याला बदनाम करण्यातच आसूरी आनंद मानणाऱ्यांचीही येथे कमतरता नाहीच ना… आणि एकदा ही सवय लागली की ती जीभ आयुष्यभरात कधीच थांबत नसते… गटारीचा ढापा उघडला की दुर्गंधी यावी, तसं यांचं तोंड उघडलं की सुरुवात होत असते…

याचं त्याला सांग, त्याचं याला सांग… फक्त कुटाळं करत राहणे, हा काहींचा स्वभावच असतो… कलियुगात याच *मंथरा ब्रँड* असतात… आपण दुसऱ्यांबद्दल वाईट बोललो त्याचं त्यांना कधीच वाईटही वाटत नसतं… तो त्यांच्या आनंदाचा एक भागच असतो… मग या पापकर्मांची शिक्षा तर आपल्याला वेळोवेळी मिळत असतेच, पण ते आम्ही लक्षातच घेत नसतो… हिच माणसं अशा मानसिकते मुळे कायमच रोगाटलेली असतात… कारण आपण सी.बी.आय. सारखी बारीक-सारीक माहिती गोळा करून ती परत इतरत्र पसरवतो, एवढी कला किंवा हुशारी ज्यांच्यात असते त्यांना आपण हे काम चुकीचं करतोय, याचीही त्यांना चांगलीच अक्कल असते… आणि या अपराधाची सल त्यांच्या मनात कायम असल्यामुळे आजाराचं खरं कारणही तेच असतं… परंतु एकदा जिभेला आणि स्वभावाला वळण पडलं की माणसं आयुष्यभरात याबाबतीत थांबत नसतात… आणि त्याचाच परिणाम एवढा घातक येत असतो की आयुष्याच्या शेवटी ही माणसं कायम वायफळच बडबड करत असतात, हीच त्यांच्या कर्माची खरी फळं असतात… त्यांच्याजवळ कोणी ऐकायला असो किंवा नसो, त्यांचा बडबडीचा तडाखा सारखा चालूच असतो… आणि मग माणसं म्हणतात…

*’त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय…!’*

मग हा परिणाम आजच झालाय का…? नाही हे त्यांच्या आयुष्यभरातील पापकर्माचं फळ असतं… जशी प्रवृत्ती तसेच रोग वाट्याला येत असतात…

आयुष्यभर साधं, सरळ, स्वच्छ जीवन जर आपण जगलो तर प्रगतीची गती कमी असू शकते, परंतु अशी अधोगती मात्र नक्कीच होणार नसते… या माणसांनी बाकीचं बरंच काही वाचलेलं असतं, पण स्वतःला कधी नीट वाचलंच नाही… म्हणून ही माणसं नियतीच्या म्हणा, किंवा परमेश्वराच्या शिक्षेतून वाचतच नाही… आणि मग शेवटीशेवटी तर काहींची वाचाही जातेच… अशा पापकर्मातून कोणीच सुटू शकत नाही… आणि मग चांगले सुजल्यावर माणसं कन्हत बसतात… शेवटी नियती किंवा परमेश्वर कधीच कोणाला सोयीचं सोडत नसतो… आणि मग शेवटीशेवटी स्वतःला वाचायला सुरुवात करतो… सहज केळ्याच्या सालावरून पाय घसरून पडला, किंवा जिन्यातून पाय सरकून पडलाय, आणि मग पाय मोडल्यावर मग टाळक्यात विचार येतो…

*कुत्र्याला दगड मारायची गरज नव्हती…*

या सृष्टीत कुठलीच घटना विनाकारण घडत नसते… प्रत्येक गोष्टीला एक बेस असतोच…

*’युं तो अलग नहींं होते,*

*अंदाज चेहरों के…*

*लेकिन लोग ऐसे भी नहीं होते,*

*जैसे नजर आते है…!’*

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *