‘नगरी-नगरी’ फिरा मुसाफिर…

घर का रस्ता भूल गया…!’

आज प्रत्येकाच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत… समस्या निर्माण करणारेही आम्ही स्वतःच असतो, परंतु समस्यांवर उपाय सांगणारे मात्र आम्हाला दुसरेच आवडत असतात… मग लोकांच्या समस्या वाढल्यात म्हणून त्यावर उपाय सांगणारेही भरपूर तयार झालेले आहेतच… अगदी वेग-वेगळ्या प्रकारच्या रोगांच्या डॉक्टरांपासून तर बाकीच्याही अडी-अडचणींवर सल्ला देणारांची आज कमतरता नाहीच… बरं सल्ला देणारांना समस्या नसतात असेही नाहीच, पण त्यानं दिलेल्या सल्ल्यामुळे आमच्या अडचणी जरी सुटत नसल्यात तरी सल्लागारांच्या अडचणी बऱ्यापैकी सुटत असतात… सल्लागारांच्या जेवढ्या स्वतःच्या अडचणी मोठ्या असतात, तेवढाच तो आपल्याला जास्त गोत्यात आणत असतो…

*’आऊचं भ्याव बुवाला…*

*अन बुवाचं भ्याव*

*साऱ्या गावाला…’*

आज आपल्याकडे अनेक प्रकारचे सल्लागार भेटतात… त्यात बाबा, बुवा, तांत्रिक, मांत्रीक, पूजाविधी करणारे, सांगणारे, नराच्या नारायणाला नागबळी करून बळी पाडणारे, घरं बांधण्यात मदत करणारे, घरांच्या दिशा बदलणारे, नवीन घरं तोडायला लावणारे, नावात बदल करणारे, कपड्यांचा रंग ठरवणारे असे अनेक विविध रताळं बाजारात आलेले आहेत… आणि आमच्यातले बधिर येडे तेच रताळं विकत घ्यायला जातात… उपाय सांगणारा फार चतुर किंवा बुध्दीमान नसतोच, पण तो सल्ला घ्यायला जाणारा पेक्षा नक्कीच हुशार असतो… त्याला एकच माहिती असतं, की हा इथपर्यंत आलाय म्हणजे सहजासहजी नाही आला…

बायकोबरोबर पटत नाही म्हणून माणसं बाबाकडं सल्ला घ्यायला जातात… मग आपल्या बायकोशी आपलं पटत नाही हा आपला प्रॉब्लेम आहे की बाबाचा प्रॉब्लेम आहे…? बरं बाबाच्या बायकोशी बाबाचंच पटलं नाही, म्हणूनच तर तो बाबा झालाय ना…? आणि नसल बाबाकडं बायको, पण आपलं बायकोशी पटणारच नाही हा आत्मविश्वास असल्यानंतरच तो ब्रह्मचारी राहिला असेल ना…? आणि ब्रह्मचारी जरी असला तरी त्याला याबाबतीत चारही दिशा मोकळ्याच असतात ना…? तो साऱ्या जगाला गरका मारून येतो, तरी ब्रह्मचारीच… आणि तिथं आम्ही जातोय आमचे प्रश्न मांडायला…

‘महाराज… बायकोशी अजिबात पटत नाही… काय करू सांगा ना…!’

बाबा जर ध्यानवर असला तर ठीक… मग तो सांगू शकतो…

‘तू एकटाच का आला…? येतानी तिला बरोबर घेऊन यायचं ना… पण तरी काही हरकत नाही… हा तावीत घेऊन जा… तिच्या गळ्यात बांध… ती नक्कीच शांत होईल…!’

*बायको कधी शांत होत असते का…?*

पण बाबानी जर कडक गांजा लावलेला असेल, आणि आम्ही जर सल्ला घ्यायला गेलोच…

बाबाला प्रश्न विचारला…

‘बाबा… बायकोशी अजिबात पटत नाही…!’

मग तर बाबा आपल्यावर उखडलाच म्हणून समजा…

‘तू मला विचारून लग्न केलं होतं का सरणफुक्या…? आणि नुसतं तिचं काय सांगतोय… तुझ्यात काय किडा आहे ते पण सांग ना… एका हातानं टाळी वाजत असती का…?’

चांगली चंपी करून घेतली, अन आलं तोंड झोडीत परत…

एकानं शेजाऱ्याला सांगितलं… अगदी जीवाचा होता म्हणून बरं का… नाही तर या गोष्टी काय सांगण्यासारख्या असतात का…?

‘मी नर्मदा परिक्रमेला जाणार आहे… परिक्रमा हे फक्त निमित्त आहे… खरं तर जातानाच हिला कुठेतरी ढकलून देणार आहे… त्यानंतर मग मी दाढी वाढवून सन्यास घेणार आहे…!’

यानं ज्याला सांगितलं ते पण वैतागलेलंच होतं… मग ते म्हणालं…

‘असं जर असेल तर मग माझी पण घेऊन जा… तिला पण ढकलून दे…!’

हा सन्यास घेण्याच्या तयारीतला म्हणतो…

‘मी तिला घेऊन जायला तयारच आहे… पण तिला येताना ढकललं तर चालेल का…?’

पहा डोकेबाज… कोण कुठं डोकं लावील त्याचा नेमच नाही…

सृष्टीची निर्मिती झाली आणि ब्रह्माच्या समोर एक दहा मार्काचा प्रश्न आलेला होता…

*’जोड्या लावा…!’*

या दहा मार्काच्या प्रश्नात ब्रह्माला फक्त दोनच मार्क पडलेले असावेत… आठ जोड्या चुकीच्या लावल्या आणि झाला देव मोकळा… बायकोशी कोणाचंच पटत नसतं, आणि जिच्याशी पटत नसतं तिलाच बायको म्हणायचं असतं…

साहेब… सगळेच वैतागलेले आहेत… त्या समस्या सगळीकडेच आहेत… आलेलं आहे नशिबात ते स्वीकारावंच लागतंय… कुठं बाबाच्या नादी लागताय, आणि कुठे संन्यास घेण्याचा विचार करताय… या न सुटणाऱ्या समस्या असतात…

‘पत्थर की एक कमी है,

ओ कभी पिघलता नहीं…

लेकिन उसकी एकही खुबी है,

ओ कभी बदलता भी नहीं है…’

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *