‘नगरी-नगरी’ फिरा मुसाफिर…
घर का रस्ता भूल गया…!’
तसं पाहिलं तर कळत कोणालाच काही नाही, पण जे काही थोडेफार भांडवल आहे त्याचं भूषण दाखवल्याशिवाय माणूस राहतच नाही… आमच्याकडे काय आहे ते दुसऱ्यांना दाखवून समोरच्या माणसांकडे याची कमतरता आहे, हे भासविण्याचा प्रयत्न करणाऱ्या घमेंडी माणसांची दिवसें-दिवस संख्या वाढतच चाललेली आहे… कोणाकडे वस्तूंचं भांडवल असेल, कोणाकडे मोठ-मोठ्या घरा-दाराचं भांडवल असेल, तर कोणाकडे कपडे आणि दाग-दागिन्यांचं भांडवल असेल… पण या सर्व वरवरच्या व्यवस्था असतात… समाजाला तुमच्या या दिखाव्याचं काहीच घेणं नसतं… पण ज्यांच्याजवळ यातलं थोडंफार काही असेल त्याला या गोष्टींचं फार भूषण आणि इतरांना दाखविण्याचा एक वेगळाच किडा असतो… अनेक बोलणारे वक्तेही असेच असतात… भांडवल छटाकभर पण किडा टनाच्या हिशोबातच दाखवतील…
*तेच तिकीट अन तोच तमाशा…*
खरं पाहिलं तर आपल्याकडे असलेल्या वस्तूंचा, व्यवस्थेचा किंवा विचारांच भांडवल हे या सृष्टीतील व्यवस्थेच्या, विचारांच्या अथांग महासागरातील एका थेंबा एवढं सुद्धा नसतं… परंतू त्या थेंबालाच आम्ही मोठा जलाशय समजत असतो… वास्तविक पाहता आपल्याकडे असलेल्या व्यवस्थेचा केवळ दुसऱ्यांना भूषण म्हणून दाखविण्यासाठीच वापर करायचा नसतो, तर त्या व्यवस्थेचा कुठेतरी समाजपयोगी वापर करायचा असतो… अगदी कालपरवाच बँकेच्या एका लॉकरमध्ये नोटांच्या बंडलांना वाळवी लागल्याची बातमी बघितली… त्या पैशांना वाळवी लागणेही गरजेचेच होते… कारण तुमचा तो बेहिशोबी पैसा होता म्हणूनच लॉकरमध्ये ठेवावा लागला होता… नाहीतर सरळ खात्यावर जमा केले असते ना…? मग बँकेत एकदा तुमच्या नावावर नोंद झाल्यानंतर त्याला वाळवी लागू द्या, नाहीतर त्यावर दरोडा पडू द्या, तुमच्या खात्यातून ते कमी झालेच नसते… आणि अशा सडत पडलेल्या व्यवस्थांचा शेवटही असाच होत असतो, आणि तो व्हायलाच पाहिजे… कुजक्या मनोवृत्तीची माणसं शेवटी कुजूनच मारतात… कधीच कोणासाठी अशी माणसं झिजत नसतात, आणि कधीच आपल्या खिशाला हे नालायक झळ लागू देत नसतात… खरंच यांना जीवन जगण्याचा अर्थ कळला असेल का…?
माणसानं आयुष्यभर आपलं कर्म केलंच पाहिजे, परंतु ते कर्म प्रामाणिक असावं आणि अगदी स्वच्छ व सरळ असावं… मागे सोशल मीडियावर एक अतिशय छान प्रसंग मी बघितला होता… जगद्गुरु तुकोबांना छत्रपती शिवाजी महाराज आणि काही मावळे भेटतात… ते तुकोबांना ओळखत नसतात… राजांचा एक शिपाई तुकोबांनाच विचारतो…
‘येथे तुकोबा नावाचा कोणी संत राहतो म्हणतात… तू ओळखतो का त्यांना…?’
मग तुकोबाच हसून म्हणतात…
‘अहो तो कसला आलाय संत…? त्याला कधी कोणी पूजापाठ करतांना पाहिले नाही… कधी कुठले होमहवन आणि यज्ञ करतांना पाहिले नाही… तो फक्त लोकांना चांगलं वागण्याचा सल्ला देत फिरत असतो… तो कसला आलाय संत…?’
हे ऐकताच महाराज स्वतः घोड्यावरून खाली उतरतात, आणि तुकोबांपुढे नस्तमस्तक होतात… सोबतचे मावळे अवाक होतात… सहजपणे मावळा शिपायाच्या तोंडातून महाराजांची ही कृती पाहून शब्द निघतात…
‘अहो महाराज…’
तेव्हा राजे खुलासा करतात…
‘अहो ज्यांच्याबद्दल तुम्ही विचारपूस करत होतात ना तेच हे… तुकोबा…!’
हा प्रसंग अगदी लहानसा आहे, पण येथे या पात्रांची उंची गगनाला गवसणी घालणारी आहे… हिंदवी स्वराज्याचे साम्राज्य उभारणारा राजा शब्दांच्या आणि बोलण्याच्या ताकतीवरून तुकोबांना ओळखतात… या फकीरासारख्या अनवाणी असणाऱ्या तुकोबांच्या पायावर राजा नतमस्तक होतो… तुकोबाचं विचारांच भांडवल इतकं मोठं की आजही त्यावर आम्ही फक्त विचारच करतो… आमच्याकडे छटाकभर विचार आणि तेच ते चारच वाक्य… चार ओव्या आणि सहा अभंग… रचनाकार झाले संत आणि आम्ही दीड दमडीचे चाळीस लाखाच्या गाडीत फिरणारे झालो महंत… वरून आम्ही आमचीच एक स्वतंत्र नंबर प्लेट बनवली…
श्री श्री श्री 1008…
त्यांना कधी विचारलंच, की ही नेमकी काय भानगड आहे…? तर तेच महंत म्हणतात…
‘नक्की सांगता येणार नाही… हा आमच्या आखाड्यानं दिलेला आमचा सन्मान आहे…!’
आम्ही नुसत्याच पदव्या घेऊन बोंबलत फिरतोय, अकलेचा मात्र पत्ता नाही… आमच्याकडे तुकोबांसारखे विचार नाही, राजांसारखी माणूस ओळखण्याची ताकदही नाही आणि नम्रताही नाही… जगाच्या पाठीवर असे फार सखीचे लाल होऊन गेलेत पण तरीसुद्धा आम्ही फार अक्कल पाजळत फिरतोय ते यासाठीच की,
‘आमची लाल करा…!’