‘नगरी-नगरी’ फिरा मुसाफिर…

घर का रस्ता भूल गया…!

काल-परवाच आपली वेगवेगळ्या स्वभावाची आणि गुणी, अवगुण्यांची चर्चा झाली होतीच… काही माणसं लगेचच लक्षात येतात, तर काही असे जातवान असतात, की त्यांना आपण ओळखूच शकत नसतो… मात्र तो वेळेवर त्याची जात दाखवल्या शिवाय राहातच नसतो, येवढा तो जातवान असतो… काही माणसं फारच आतल्या गाठीची असतात, आणि अशांचीही आपली गाठ पडलीच तर ते त्रासदायकच ठरत असतात… त्यांच्या आतल्या गाठी अशा असतात की सोनोग्राफीतही त्यांची गाठ येत नसतेच… काही फारच नंगट असतात… जी माणसं नंगट असतात तीच माणसं बिनधास्त असतात… सगळं होत्याचं नव्हतं झालं आणि सगळं संपलं तरी ते माघार घेत नसतात… त्यांना समजून सांगणारे मरतील पण हे मरेपर्यंत सुधरतच नसतात…

एक असंच फार नंगट होतं… कधीच आयुष्यभरात देवधरम नाही, पूजापाठ नाही… एवढंच काय तर देवाचं नाव सुद्धा कधी घेतलंच नाही… पण देवाचं नाव सोडून साऱ्या गावाचं नाव घेऊन बसला होता… त्यामुळं त्याचं कधीच कोणी नाव घेत नव्हतं… सगळ्या गावाशी हुस्त्या घालून बसलं होतं… जीवनात कधीच कोणाशी तडजोड केली नाही, आणि माघारही घेतली नाहीच… शेवटी मरायला टेकलं तरी देवाचं नाव घेतलं नाहीच… इतर वेळी जरी कधीच देव आठवत नसला तरी पण मरणयातना सुरू झाल्यावर तरी माणूस देवाचं नाव घेतच असतो… पण स्वतःची बायको, मुलं जवळ बसून शेवटच्या क्षणी या इपितराला, ‘आता तरी देवाचं नाव घ्या…!’ म्हणून विनंती करीत होते… सगळ्यांनी बराच वेळ आग्रह केला पण हे नावच घेईना… घरातल्यांना वाटलं याची वाचा गेली की काय… त्यांचा आग्रह चालूच होता… शेवटी हे वाचा गेल्यासारखं वाटणारं सगळ्यांवर डाफरलं…

‘काय मला नाव घ्यायला सांगताय…? आजपर्यंत सगळं गाव मी जाम केलं होतं, पण तुम्ही मला पार वैतागून सोडलंय… अर्धा-एक तासात त्याच्यासोबतच जायचंहे तर त्याचं काय नाव तरी कशाला घेऊ…?’

तो आपल्या तत्वाशी ठामच राहिला…

फार पूर्वी आमचं शिंगव्याचं जनोबा पण असंच इब्लिस होतं… घरासमोर असलेल्या मंदिरात रोज जायचं, पण नुसतं हात जोडायचं… मात्र याची देवाकडं कधीच काही मागणी नाही… जवळजवळ वीस वर्ष हाच कार्यक्रम चालू होता… देव दररोज विचार करायचा…

‘येणारा प्रत्येक माणूस रोज नवनवीन मागण्या करतोय… जगात एवढं दुःख वाढलं, पापं वाढलेत, अपेक्षा वाढल्यात म्हणून तर माणसं माझ्यासमोर लोटांगण घेतात… अन हा आडमुठ्या जनोबा एवढा नंगट तरी कसा…? बरं हा फार सुखी आहे, असंही काही नाहीच… मग हा काही मागत का नाही…?’

शेवटी एक दिवस जनोबा मंदिरात आल्यावर देव समक्ष प्रकट झाला… देवानं हसत-हसतच जनोबाला विचारलं…

‘जनोबा… अरे गेले विस वर्षांपासून मी पाहतोय, तू नित्यनियमाने हात जोडायला तर येतोच, पण कधीच काही मागत का नाही…? प्रत्येक माणूस येथे मागणी घेऊनच येत असतो… या भूतलावर एकमेव तूच असा आहेस की कधीच काही मागितलं नाही… तुझा आमच्यावर विश्वास नाहीये का…?’

मग जनोबा देवाला हात जोडून हसत-हसतच म्हणाला…

‘देवा… विश्वास तर भरपूर आहे… पण मला खरं म्हटलं तर तुझी जीरवायचीच होती… तुला वाटत होतं सगळं जग लाचार असावं… पण मी तुला अजिबात खात नाही…!’

त्यानंतर देव जो गायब झाला तो आजपर्यंत कोणाच्या समोर आलाच नाही…

विनोदाचा भाग सोडा, पण खरं तर प्रत्येकाला आपलं कर्म करायचंच असतं… त्यातून कोणीच सुटत नसतो… खरा असो, खोटा असो, लबाड असो, पण प्रत्येकाला कर्म करावंच लागतं… पण कर्म करूनही प्रत्येकाच्या पदरी दुःख का पडतंय…? तर आपलं कर्मच प्रामाणिक नसतं… बोलायचं एक, दाखवायचं दुसरं अन करायचं तिसरच… लबाडी तर सगळीकडेच असते, पण देवाच्या पूजापाठाला सुद्धा वस्तू , फळं आम्ही वाटे घातलेलेच घेत असतो, म्हणून तर नेहमी आमच्या वाट्याला दुःखच येत असतं… माणसाच्या गरजा पूर्ण होत असतात, परंतु अपेक्षा कधीच पूर्ण होत नसतात… अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात आपण जे नाहीये तेच शोधण्याचा प्रयत्न केला, तर जे जवळ आहे ते पण निघून जात असतं… म्हणूनच जीवनात आहे त्या व्यवस्थेत माणसानं आनंदानं जगावं, आणि आनंदानं जगण्यासाठी माणसाला प्रामाणिक राहावंच लागतं… हाच खरा भक्तिमार्ग समजावा…

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *