‘नगरी-नगरी’ फिरा मुसाफिर…
घर का रस्ता भूल गया…!’
बरेच वेळा माझे बिगरभूलीचे सामाजिक ऑपरेशन लोकांना मानवतच नाहीत… अनेक व्याख्यानांमध्ये बाबागिरीवर बोललो, की कधीकधी बाबांचे काही अनुयायी जवळ येऊन मला सरळ विचारतात…
‘तुम्ही बाबा लोकांच्या एवढे का मागे लागता…?’
म्हणजे बाबाच्या मागे लागणारा हाच, आणि तो मला विचारतोय, ‘बाबाच्या तुम्ही का मागे लागता…?’
बरं एवढ्यावरच त्याचं भागत नाही, तर तो बाबाची काय पावर आहे आणि कसे चमत्कार घडतात ते मला समजून सांगतो… मग त्यानं बाबाच्या चमत्काराचा एक खुलासा मला तिथच सांगितला…
‘एकदा बाबा माझ्या गाडीत होते, अन पोलिसांनी गाडीला हात दिला… नेमके कागदपत्र मी घरी विसरलो होतो… पोलीस कागदपत्रांशिवाय गाडीच सोडीना… तसे ते काही पण कारणं काढून गाड्या धरू शकतात… मग बाबा मला म्हणाले… तुझ्या सीटच्या मागच्या पॉकेटमध्ये कव्हर मध्ये बघ पेपर आहेत का…? मी बघितलं तर खरंच गाडीची कागदपत्रं गाडीतच सापडले… कधीकधी आम्ही कन्फ्युज होतो की हे घडतंच कसं…? तुम्ही आमच्या बाबांना एकदा भेटाच…!’
माझं आडलं काय तुझ्या भोंदूबाबाला भेटण्या वाचून…? पण माणसं कोणत्या भ्रमात जगतात तेच मला नेमकं कळत नाही… या देशात बाबागिरी, नेतागिरी आणि गुंडगिरीला कधीच मरण नाही… जोपर्यंत असे अनुयायी आणि सतरांच्या उचलणारे कार्यकर्ते आहेत तोपर्यंत कोणालाच धक्का सुद्धा लागणार नाही…
काही अगदी जवळची माणसं सुद्धा बाबाकडं हेलपाटे मारतात… आम्ही जर समजून सांगायला गेलो तर ते आम्हालाच समजून सांगतात…
‘तुम्हाला नाही कळणार त्यातलं काही…!’
बरं झालं तुला कळलं… मग चार-सहा वर्षांनी बाबाचा फोटो पेपरला आल्यावर ते आपल्याला सफाई देतंय…
‘माझं तसं काही नव्हतं बर का… पण हिचाच लई विश्वास होता बाबावर… मी तर बरेच वेळा टाळायचो पण ही एकटीच निघून जायची…!’
बरं झालं तिला जाऊ दिलं एकटीला… तरच चांगला चमत्कार पाहायला मिळत असतो…
आणि कदाचित तिने बाबाचा चमत्कार पाहिलाही असेल, पण तुला तरी काय माहित…
मागे एका बाबानं कोर्टात जाताना शक्ती प्रदर्शन केलं होतं… विरोधात निकाल गेला तर जाळपोळ करा, म्हणून भक्तांना आदेश दिला होता… त्याला त्याचा स्वतःचा निकाल अगोदर कळला नाही, पण हे अनुयायी स्वतःचा निकाल लावून घ्यायला दोनशे गाड्या घेऊन गेले… निकाल विरोधात गेल्यावर काहींनी स्वतःच्याच गाड्या पेटवून दिल्या, आणि झाले मोकळे… काही मुळव्याध सुजस्तोवर फटके खाऊन घरी आले, अन पंधरा दिवस टिंगरंच शेकवत बसले… खरंतर बाबाला अन हनीला सोडून यांनाच आत टाकायला पाहिजे होतं… यांचे चांगले बाचके हाणल्याशिवाय हे ठिकाणावर येणारच नाहीत…
आपल्या परिसरातले सुद्धा बरेच नमुने बाबा लोकांच्या नादी लागून पावत्या गोळा करीत फिरतात… अन मंदिराचा जिर्णोद्धार करताकरता स्वतःचेच बंगले बांधून बसलेत… अन हेच मला बऱ्याच बाबांचा धाक दाखवतात…
‘बाबाच्या मनात आलं तर ते काहीही करू शकतात…!’
मग त्याला आडवलं कोणी…? चंद्रास्वामीच्या बैठकीत बसून दीड तास त्याच्याशी गप्पा मारल्या होत्या, तेव्हाच ते सुद्धा म्हणालं होतं…
‘जो दिल के झुटे होते है, जिनके मन मे लोभ, लालच, कपट होता है, वो लोग हमसे डरते है… तुम्हारा हम कुछ नही कर सकते…!’
एका मोठ्या शहरात एक मोठ्या नातेवाईकाकडं अचानक जाणं झालं होतं, आणि त्यावेळेला स्वामीजी तिथे आलेले होते, म्हणून योगायोगाने भेट झाली… तसं माझं काही त्याला भेटण्यापासून आडलेलं नव्हतंच… परंतु चर्चा सुरू झाल्यानंतर त्याला माझ्या बोलण्यातून काही विषय आवडत गेले, आणि चांगल्या गप्पा रंगल्या होत्या… परंतु तेवढ्या वेळात त्याच्या एकंदरीत हालचालीवरून मलाच अंदाज आला होता की हा एक दिवस आत गेल्याशिवाय राहणार नाहीच, आणि पुढे तीन-चार वर्षांनी गेलेच आत… कारण त्याला मानणारा वर्ग सगळा चोर भामटा आणि धुर्त, लबाड व राजकारणी होता… त्याच्या डोळ्यात समोरच्याला आकर्षित करण्याची किंवा थोडक्यात हिप्नोटाईझ करण्याची कला होतीच… पण त्याच्याकडे मलमपट्टी करून घ्यायला येणारे घायाळ जखमी फार काही सोयीचे नव्हतेच… खरंतर संत महात्मा कधीच चुकीच्या गोष्टीचं समर्थन करीत नसतात, आणि चुकीचे सल्लेही देत नसतात… चंद्रास्वामींच्या बोलण्यात मृदू अहंकार होता… यांना कदाचित ‘सायलेंट किलर’ हाच शब्द उपयुक्त ठरू शकेल… दुसऱ्यांना संपवून एखाद्याचा बरं कसं करता येईल, अशा मनोवृत्तीचे तांत्रिक आजही भरपूर आहेत… परंतु आपण जर सरळ, स्वच्छ विचारांचे असाल तर आपल्याला यांची गाठ घ्यायची गरजच पडत नसते… आपली भावना, विचार, व्यवहार आणि वाणी शुद्ध ठेवाल तर आपलं भविष्य सुद्धा पाहायची आपल्याला गरजच पडणार नाही…