‘नगरी-नगरी’ फिरा मुसाफिर…
‘घर का रस्ता भूल गया…!’
कळतंय पण वळत नाही, अशी जुनी माणसं म्हणायची… मग नेमकं काय कळत नाही, किंवा काय वळत नाही, असा प्रश्न आम्हाला लहानपणी पडायचा… नेमकी गाडी वळत नाही, की बैलांच्या लक्षात येत नाही, की शेजारचं नामदेवतात्या त्याची जनावरं वळत नाही…? असंच काहीतरी आम्हाला वाटायचं… काही शब्दांचे संदर्भ वेगळे असायचे, पण त्या वयात आम्हाला ते कळत नव्हतं… मग कळायला लागल्यावर आम्हाला थोडंफार कळलं की एखाद्या बधिराबद्दल चर्चा करताना ही माणसं असा संदर्भ देत असायची… त्याला कळतं सगळंच पण कृतीत काहीच नाही, किंवा मुद्दाम येड्याचं पांघरून घेऊन सांगितलेलं काम टाळायचं…
‘ते मला जमल का…?’ असं म्हणत तोंड वासून उभं राहायचं... अशा नमुन्यांच्या बाबतीत कदाचित अशी वाक्य वापरली जात असावीत…
आजही अनेक माणसांना काहीच कळत नाही… आपल्याला कळत नाही, हे पण त्यांना कळत नाही… काहींना इतकं कळतं की त्यातलं नेमकं काय कळायला पाहिजे होतं, तेच कळत नाही… काहींना कळलं तरी ते तसं दाखवत नाही… कळलं असं दाखवून उगाच कशाला जबाबदारी वाढवून घ्यायची…? ज्याला चांगलं कळतं त्याच्यावरच भरपूर जबाबदाऱ्या टाकल्या जातात… त्याला कामात चुकारपणा करायचं कळतच नाही… अन काहींना कामचुकारपणा करून फक्त टुकारपणा करायचंच कळत असतं… त्याला कामाच्या बाबतीत काहीच कळत नाही असं नसतंच… खरं तर त्यालाही भरपूर कळत असतं, पण तो तसं दाखवत नाही म्हणून त्याला कळत नाही… काही नुसतेच गैताने असतात… एक काम करतील पण चार कामं वाढवून ठेवतील… काही बधिर काम असे करतात की, ‘धड्याच्या दुकानाचा इदोस’ करून ठेवतात… काही तर अशी आव्हानात्मक कामं करतात की हातानं आपली फाडून घेतात… जुने लोकं म्हणायचे…
‘येरे बैला अन घाल कुठं पण शिंग…’
बरं बैल पण ध्यानावर पाहिजे ना…? तो काय जागा पाहून थोडाच हुंदडत असतो…? आणि खरंतर हे वाढवा उद्योग करणारेच याबाबतीत गोत्यात येत असतात…
पूर्वी मी एका वृत्तपत्रात एक विनोदी सदर लिहीत होतो… त्यात जनोबा आणि बहिरोबा असे दोन पात्र होते… जनोबा अतिशय चतुर तर बहिरं एकदम बधिर… जनोबाची तब्येत आणि बोलणं चालणं म्हणजे पूर्वीच्या पिंजरा चित्रपटातील निळू फुलेच… याउलट बहिऱ्याची परिस्थिती होती… धोतर, नेहरू शर्ट, कडक टोपी, गळ्यात उपरणं… वजन एकशेवीस किलो अन ढेरपाट साठ किलोचं… चालायचा तर धापा टाकीतच, पण बोलायचा सुंबार (सुमार) नाहीच… मनात येईल ते फटकन बोलून मोकळं व्हायचं… हे बहिरं गावात चौकात बसलं होतं… बाहेरगावची एक जीप आली त्यात पाच सहा टघे बसलेले… याला चौकातच एका टघ्यानं विचारलं…
‘या गावातला सरपंच कोणहे…?’
बहिरा म्हणतो,
‘तुम्हाला मी कोण वाटतो…?’
‘तू सरपंच्याहे का…? खरं सांग…!’
‘माह्यावाला रुबाब पाहिल्याबरूबर तुम्हाला कळायला पाहिजी व्हतं ना, मी सरपंचहे म्हणून… तू माला इचारायची सुद्धा गरज नव्हती…!’
गाडीतले अडदांड तीन-चार टगे खाली उतरले, आणि हे बहिरं तीन मिनटात मोक्कार बदकवलं, आणि पळूनही गेले… इकडं जनोबाला कोणीतरी फोन करून सांगितलं, ‘तुझ्या जोडीदाराला मोकार हाणलय…!’ जनोबा वस्तीवरून सायकल घेऊन धावपळ करीतच गावात आला, तर हा बहिरा चौकात सगळ्यांना चहा पाजत बसला होता… जनोबानं बहिऱ्याला विचारलं…
‘तुला का बरं वाजवलयरे त्या लोकांनी…? कोण व्हते ते…? आन एवढा मार खाऊन तू यांनला काम्हून चहा पाजीत बसलाय…?’
‘जनुबा… ते कोण व्हते माला माहित न्हाई, पण त्येंनी माला सरपंच समजून हाणलं, म्हणून मी यांनला पार्टी देऊन राह्यलो…!’
जनोबानं कपाळावर हात मारून घेतला…
‘आरे तू सुदरायचं तरी कव्हा… भायेरचे लोकं येऊन तुला धोपटून गेले, अन तू खुशाल चाहा पाजीत बसलाय… तुला काही लाजलज्जा हाये का नही…?’
असे बहिऱ्यासारखे काही गैताने असतातच… यांना बैलाचा अंदाजच येत नाही… असे हे बैल गेन जयेल असतात…