यंदा बाजारात उशिराने येणार कांदा .
नाशिक, प्रतिनिधी| अतिवृष्टी आणि हवामानातील बदलामुळे लाल कांद्याच्या रोपावर मावा, करपा आणि पिळ रोगाचे आक्रमण झाले असून कांदापात पिवळी पडल्याचे दिसून येत आहे. नवा कांदा खराब होत असून महागडी औषधे आणून पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
नाशिकच्या द्राक्षा पाठोपाठ लाल कांद्याचे उत्पादन ही घटण्याची शक्यता कृषि क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यात बाजार समितीत कांद्याला तीनशे ते चारशे रुपये प्रति क्विंटल भाव असल्याने उत्पादन खर्च निघणे कठीण झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
दसऱ्याच्या आस पास लाल कांदा बाजारात येत असतो, मात्र यंदा लाल कांदा बाजारात आला नाही बंगलोर येथील किरकोळ लाल कांदा आवक वगळता राज्यातील कांदा उशिराने बाजार समितीत दाखल होईल. यंदा अतिवृष्टीचा फटका उन्हाळा कांदा आणि शेतीत असलेल्या लाल कांद्याच्या पिकाला बसला आहे. अतिवृष्टी आणि त्यानंतरच्या ढगाळ वातावरण तसेच अधून मधून पडणाऱ्या पावसामुळे कांदा उत्पादनात घट होण्याची शक्यता शेती क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. शेवटच्या टप्प्यात जो उन्हाळा कांदा आहे, त्याला लासलगाव मार्केट कमिटीत १६ ऑक्टोबर रोजी किमान ४०० ते कमाल १४०० क्विंटल तर सर्वसाधारण १० रुपये क्विंटल इतका भाव होता. दिवाळीमुळे लासलगाव समिती एक आठवडा बंद आहे. येथे लाल कांद्याची आवक नव्हती. शुक्रवारी बाजार समिती सुरू होईल. लाल कांद्याची इतर बाजार समितीत थोड्याफार प्रमाणात आवक आहे. एकंदरीत जे काही लाल कांद्याचे उत्पादन हाती लागेल त्याला भाव मिळेल का? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
